पारनेर: पुणेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात सहा शेळ्यांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण – MSN

Written by

पारनेर/कान्हूरपठार, पुढारी वृत्तसेवा: पुणेवाडी (ता.पारनेर) येथील शेतकर्‍यांच्या गोठ्यात मंगळवारी (दि.20) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामध्ये गोठ्यातील सहा शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत शेतकर्‍याचे सुमारे 75 हजारांचे नुकसान झाले. पुणेवाडीत गेल्या महिन्याभरापासून पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ले वाढत असून, आतापर्यंत सुमारे 25 ते 30 शेळ्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, वनविभागाने घटनेची पाहणी करून पंचनामा केला. परिसरात एक पिंजरा लावला, तर दुसरा पिंजरा लावण्याची व्यवस्था केली.
पुणेवाडी गावठाणात सोबलेवाडी फाटा रस्त्यावर शेखर सिताराम रेपाळे यांची वस्ती आहे. वस्तीलगत रेपाळे यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात 13 शेळ्या, दोन गाई, एक बैल, अशी जनावरे बांधली होती. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास शेळ्यांच्या ओरडण्याने रेपाळे यांचे वडील सिताराम रेपाळे चाबूक घेऊन गोठ्याकडे धावले. तोपर्यंत बिबट्याने हल्ला करून सहा शेळ्यांना ठार केले होते. यातील चार शेळ्या गाभण होत्या. रेपाळे यांना पाहताच बिबट्याने गोठ्याच्या जाळीवरून उडी मारून धूम ठोकली.
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनपाल प्रवीण सोनवणे, वनरक्षक फारख शेख, वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद रेपाळे यांनी शेळ्यांची तपासणी केली. पद्मावती मळ्यात वनविभागाकडून एक पिंजरा लावण्यात आला, तर गावालगत अजून एक पिंजरा लावण्यात येणार आहे. या पिंजर्‍यात भक्ष्य म्हणून शेळ्यांना ठेवले जाणार आहे. सातत्याने पुणेवाडी परिसरात बिबट्याचे हल्ले होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी दहशतीखाली आहेत. शेतकर्‍यांना शेतात काम करणेही अवघड झाले. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास मोठ्या स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
The post पारनेर: पुणेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात सहा शेळ्यांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares