शरद पवार – एक-दोन अपवाद सोडले तर शिंदे गटातील 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही #5मोठ्याबातम्या – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. एक-दोन अपवाद सोडले तर 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही – शरद पवार
शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या 40 आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्र वेगळं असेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
"सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगलं काम केल्याचं ठिकठिकाणी ऐकायला मिळतं. प्रदेशाध्यक्षांनी सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे," अशी सूचना शरद पवार यांनी केली.
शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यांवरही भाष्य केल्याचं एबीपी माझानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा लढा आहे. स्त्री, पुरूष, आदिवासी, बिगर आदिवासी यामुद्द्यावरील हा लढा नाही. संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे, पण तरीही शिवसेनेने भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर आम्ही कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेत नाही, असंही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शिवसेनेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
"शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचं कारण सांगितलं आहे, पण त्यामागची शिवसेनेची खरी भूमिका शिवसेनेलाच माहिती आहे. त्याबद्दल आम्ही काय सांगणार?" असं थोरात म्हणाले आहेत.
"ज्या भाजपने संविधानाचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार पाडलं त्या भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देत असेल तर काय बोलावं? भाजपने शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे आणि त्याच शिवसेनेने भाजपला पाठिंबा देणे हे अनाकलनीय आहे," असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.
सकाळनं हे वृत्त दिलं आहे.
3. …तोपर्यंत राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्याला शपथ देऊ नये – शिवसेनेची मागणी
शिवसेनेच्या 39 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राज्यपालांनी एकनाथ शिंदे सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला शपथ देऊ नये, असं पत्र शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (12 जुलै) माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली.
फोटो स्रोत, ANI
हे सरकार काळजीवाहू आहे आणि कोणतेही लाभाचे पद किंवा शपथ देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल, असं शिवसेनेनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.
लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केलीये.
भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदावरून मुक्त केलं असल्याची पोस्ट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं पत्रही जोडलं आहे.
श्रीकांत वाघ यांचा बेडरूममधील व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये संबंधित महिला या माणसानं मला फसवलं असं म्हणत आहे.
फोटो स्रोत, Twitter
हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं वृत्त टीव्ही9 मराठीनं दिलं आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी म्हटलं की, संबंधित महिलेने पोलिस तक्रार करावी पोलिस त्यावर योग्य ती कारवाई करतील.
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 350 कोटींचे ड्रग्ज जप्त केलं आहे. कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ कंटेनरमध्ये हेरॉइन सापडले. या कारवाईत तब्बल 70 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंद्रा बंदरावरच तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. हे हेरॉईन अफगाणिस्तानातून आलं होतं.
टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares