चौपदरीकरणाच्या मोबदल्याची प्रतीक्षाच – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नवीद शेख : सकाळ वृत्तसेवा
मनोर, ता.२२ : पालघर जिल्ह्यातून अनेक विकास प्रकल्प जात आहेत, यासाठी भूसंपादन केले जाते. मात्र दीड वर्ष उलटूनही महामार्ग चौपदरीकरणाचे पैसेच हाती न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तुरुंगवास भोगून हक्काच्या मोबदल्यासाठी झगडावे लागत असल्याने सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असल्याचा सूर निघत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी राबवलेल्या भूसंपादन प्रक्रियेत महामार्गात जमीन जात असूनही हालोली व सातिवली गावाच्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नाही. तीन वर्षांपूर्वी महामार्गाच्या आरडब्लूमध्ये एमएमआरडीएकडून सूर्या प्रादेशिक जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले होते. पण याला शेतकऱ्यांनी विरोध करत पाणीपुरवठा योजनेचे काम बंद पाडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मनोर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या विरोधात पाणी बचाव संघर्ष समिती व शेतकऱ्यांचा मोर्चादेखील पोलिस ठाण्यावर धडकला होता.
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी राबवलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील तांत्रिक चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सातिवली व हालोली या दोन गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, पण शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून महामार्गालगत सुरू असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम रोखले होते. त्यानंतर नवीन भूसंपादन प्रक्रिया राबवली व मोबदला देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. डहाणूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रिया राबवून १५ जून २०२१ रोजी एक कोटी अडतीस लाख रुपयांच्या रकमेचा निवाडा घोषित केला होता.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे सक्षम प्राधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मोबदला अदा करण्यात दिरंगाई होत असल्याने बाधित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
——————
रुंदीकरणाचे काम अपूर्ण
शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने हालोली व सातिवली गावच्या हद्दीत महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अपूर्ण आहे. महामार्ग अरुंद असलेल्या ठिकाणी रस्ता धोकादायक ठरत असून अनेक अपघात झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग अधिनियमानुसार हालोली, सातिवली गावचे निवाडा घोषित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध झाला की नाही, याबाबत माहिती घेतली जाईल.
– अशिमा मित्तल, सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, डहाणू
———————
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग झाला आहे; परंतु नेमकी माहिती उपलब्ध नाही, आठवडाभरात याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
– सूरज सिंग, प्रकल्प संचालक, सुरत दहिसर टोल वे प्रकल्प
———————–
मोबदला मिळावा यासाठी आंदोलन केल्यानंतर तुरुंगवास भोगला. निवाडा घोषित होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला, पण तो अद्याप मिळाला नाही. मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, अन्यथा येत्या काही दिवसांत उपोषण करू.
– अविनाश पाटील, सदस्य, आदिवासी पुनर्वसन आंदोलन
———————–
मोबदला न मिळालेले शेतकरी
गणेश गोपीनाथ पाटील व इतर – ५५,८८,६३०
वसंत बाळू पाडोसा व इतर – ५,५२,८५४
कोंडू शिनवार पाडोसा व इतर – ५,६७,८७७
नरेश बाळकृष्ण पाटील व इतर – ७,१८,१०९
जीवन हरी डोंगरे व इतर – ४३,५९,०९२
मथुरा धाक्या म्हसे व इतर – २१,१२,२६२
एकूण १,३८,९८,८२४
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares