अग्रलेख : आनंदाचा शिधा – Dainik Prabhat

Written by

दसऱ्याची सांगता होते आणि दिवाळीची हळुवार आणि तेजोमय चाहूल लागते. पिवळीधम्मक झेंडूची फुले, अंगणातला पारिजातकाचा सडा आणि हिरव्यागार पानांमधून डोकावणारी शेवंतीची फुले ही जणू दिवाळीची हाक देत आनंदाने डोलत असतात. भारत हा कृषिप्रधान देश असून, शेतीसाठी गाय-बैल हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. दिवाळीचा कालचा पहिला दिवस नेहमीप्रमाणे वसुबारस म्हणून साजरा केला गेला. आश्‍विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. त्या दिवशी सुवासिनी संपूर्ण दिवस आपल्या मुलाबाळांसाठी उपवास करतात. आश्‍विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंतचे पाच दिवस दिवाळी साजरी करण्याची परंपरा भारतात आहे. 
जवळपास एक हजार वर्षांपासून भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सण म्हणून साजरा केल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांतून आढळतात. धनत्रयोदशीला स्त्रियांचे अभ्यंगस्नान, तर नरकचतुर्दशीला पुरुषांचे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जात असली, तरी सध्या सामान्यजनांकडे लक्ष्मीची वानवा आहे. पाडव्याला घराघरातून सरस्वती देवतेचे पूजन केले जाते; परंतु करोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले. पाडव्याला शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे होतात. सध्या भारतीय शेअर बाजारात तेजी असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरतेचे वातावरण असून, मंदीचे काळे ढग जमू लागले आहेत. भाऊबीजेला भावाबहिणीचे नाते जपण्याचा दिवस, असे मानले जाते. दिवाळीला उत्सवाचा राजा म्हटले जात असले, तरी यंदाच्या दिवाळीला महागाईची काळी किनार आहे.
दुधाचे भाव लिटरमागे दोन ते चार रुपयांनी वाढले असून, ग्राहकांची अक्षरशः लूटमार चालू आहे. भाज्या, कडधान्ये, डाळी, खाद्यतेल, अंडी, मिठाई या वस्तूंची चौफेर भाववाढ झाली असून, राजकीय पक्षांना याची पर्वा नाही. याचे कारण, दूधसंघात वा कृषी उत्पन्न बाजार समित्यांत राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. एमसीए असो किंवा बीसीसीआय असो, क्रिकेटमध्ये व्यावसायिक हितसंबंधांतून राजकारणी एकत्र येताना आपण बघत असतो. तेव्हा त्यांचे आपसातले मतभेद काही दिवसांतच संपुष्टात येतात. दहीहंडी, गणपती, नवरात्र, दिवाळी हे सर्व उत्सव जल्लोषात साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे, भारतीय जनता पक्षातर्फे तसेच अन्यही काही पक्षांतर्फे प्रचंड पैसा खर्च करून सार्वजनिकरीत्या दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. राज्यातील भूविकास बॅंकेचे कर्ज घेणाऱ्या 35 हजार शेतकऱ्यांचे 964 कोटी रुपयांचे थकित कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
वास्तविक तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातच ही घोषणा केली होती. त्या घोषणेची शिंदे-फडणवीस सरकार केवळ अंमलबजावणी करत आहे; परंतु जणू काही आपण नवीन क्रांतिकारक घोषणा करत असल्याचा आव आणला जात आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची झालेली हानी बघता, सरकारने तत्काळ मदतीचा हात दिला पाहिजे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शेतात काढलेले पिकाचे ढीग वाचवण्यासाठीही शेतकऱ्यांना उसंत मिळाली नाही. विदर्भातल्या शेतकऱ्यांचे यात सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीनचे पीक तर वायाच गेले. शेतकरी त्रस्त असताना दिवाळी भपकेबाज पद्धतीने साजरी करण्याचेही कारण नाही. दिवाळी म्हटली की, फटाके वाजतातच. प्रदूषणमुक्‍त दिवाळीचे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करून, तशी लहान मुलांसह शपथ घेतली आहे. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीत फटाक्‍यांच्या विक्री आणि वितरणावर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात दिल्लीतील फटाके व्यापाऱ्यांनी याचिका दाखल केली. परंतु त्याची तातडीने सुनावणी घेण्यास
सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लोकांना स्वच्छ हवा व श्‍वास घेऊ द्या, अशी कडक टिप्पणी न्यायालयाने केली आहे. नागपूरच्या रवींद्र भुसारी यांनी फटाक्‍यांवरील बंदीसाठी यापूर्वी एक याचिका केली होती. तसेच पुण्यातील सामाजिक कार्यकर्तेही राष्ट्रीय हरित लवादात याचिका करून, महाराष्ट्रात फटाकेबंदीची मागणी करणार असल्याची पूर्वी चर्चा होती. ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कली होती, त्या डॉ. महेश बेडेकर यांनी फटाक्‍यांच्या प्रश्‍नाबद्दल यापूर्वी सरकारबरोबर चर्चा केली होती. द लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधानुसार, जगभरात प्रदूषणामुळे एक कोटी लोकांचा मृत्यू होतो आणि जगातील दर सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होतो. मात्र, केवळ फटाकेबंदी घालून हा प्रश्‍न सुटेल, असे वाटत नाही. जनतेचे प्रबोधन केले, तरच लोक स्वतःहून फटाके वाजवणार नाहीत. शिवाय फटाक्‍यांवरील बंदीचा आणि धर्म व संस्कृतीचा काही एक संबंध नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रश्‍नावर कोणीही राजकारण करू नये. दिवाळीचे आणखी एक अंग म्हणजे दिवाळी अंक.
पश्‍चिम बंगालमध्ये जशी नवरात्रातील पूजा अंकांची परंपरा आहे, तशी महाराष्ट्रात दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. पहिल्या दिवाळी अंकाचा मान जातो, काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मुंबईहून प्रकाशित केलेल्या “मनोरंजन’ या अंकाकडे. राष्ट्राची उन्नती व्हावी अशी इच्छा असल्यास, स्त्रियांना सुशिक्षित करा, त्यांच्या हाती “मनोरंजन’द्या, असे आवाहन या अंकात करण्यात आले होते. “मनोरंजन’ मध्ये “करंज्यांतला मोदक’ ही लक्ष्मीबाई टिळकांची कविता प्रसिद्ध झाली होती. तसेच क्षमाताई राव यांनी स्त्रीपुरुष समानतेचा संदेश दणारा लेखही त्यात लिहिला होता. 1930 मध्ये “किर्लोस्कर’ मासिकात स्त्री कर्मचाऱ्यांना नोकरीतही सामावून घेण्यात आले होते. पूर्वी दसऱ्यापासूनच हवेत गारवा असायचा आणि दिवाळीत फराळाचा आनंद लुटण्यात मोठी मौज असे. हवामान बदलाच्या संकटामुळे केवळ फटाकेच सर्द झालेले नाहीत, तर सर्वसामान्य माणसाचीही तशीच अवस्था आहे. “आनंदाचा शिधा’ मर्यादित झाला आहे. पण मर्यादित असला, तरी दिवाळीनिमित्त जगण्याचा आनंद द्विगुणित होतो.
ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares