दीपावली विशेष: एका दिव्याने उजळे दुसरा… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
भारतात सर्वाधिक उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दीपावली. इतर कुठल्याही सणांच्या तुलनेत जशी दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते, तसे इतर कुठल्याही सणांच्या तुलनेत सामाजिक भान जपण्याचा संस्कारही या सणाच्या निमित्ताने अधिक दृढ होतो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे, पारधी पाडे आणि सीमेवरील जवानांसाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दिवाळीसाठी पाठवल्या जाणाऱ्या भेटवस्तू, वंचित घटकातील कुटुंबांसाठी वर्षभर केली जाणारी आरोग्य, शिक्षण इत्यादींसंदर्भातली मदत ही त्याचीच प्रचिती नव्हे काय..?
पा वसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, अाश्विन व कार्तिक महिन्यांच्या संधिकालात येणारा सण म्हणजे दिवाळी. अाश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा जवळजवळ आठवडाभर चालणाऱ्या नि हजारो वर्षे जुना इतिहास असणाऱ्या या सणास, सणांचा राजा म्हटलं तरी हरकत नाही. इतर कोणत्याही सणाला कुटुंब एकत्र एका ठिकाणी नसलं तरी चालेल, परंतु दिवाळीतील आनंदोत्सवाला मात्र सगळ्यांनी आलं पाहिजे, अशी अपेक्षा असते. शेतकरी, दुकानदार, कारखानदार, कंपन्या, इतकेच नव्हे तर सरकारसुद्धा आपापल्या अखत्यारीतील सगळ्या कर्मचाऱ्यांना, नोकरचाकरांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी खास तरतूद करतात. दीपावलीच्या या प्रकाशपर्वातील प्रत्येक दिवसाचे वेगळेपण आहे. अाश्विन वद्य द्वादशी म्हणजे गोवत्सद्वादशीला वसुबारसदेखील म्हणतात. वसू म्हणजे द्रव्य, त्यासाठीची ही बारस. कृषिप्रधान भारतीय संस्कृतीत गायीची पाडसासह पूजा करण्यामागे घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे हाच हेतू आहे. दिवसभर उपवास करून तो बाजरीची भाकरी खाऊन सोडणाऱ्या महिला आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य व सुख लाभो अशी प्रार्थना करतात. देवदानवाच्या समुद्रमंथनातून अमृतकुंभ घेऊन निघालेल्या वैद्यराज धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. ‘आरोग्यं धनसंपदा’ या अर्थाने धन्वंतरीची म्हणजे पर्यायाने धनाची पूजा चालते. नरक चतुर्दशीचा संबंध नरकासुरवाशी लावतात. ब्रह्मदेवाकडून अवध्यत्वाचा वर प्राप्त करून निरंकुश बनलेल्या नरकासुराने विविध राजांचा पराभव करीत १६,१०० स्त्रियांना पळवून नेऊन बंदीवासात टाकले होते. या नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने स्त्रियांना बंदीवासातून मुक्त केले, तो हा दिवस. आधुनिक संदर्भात आपल्या प्रत्येकातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट करून अहंकाराचे उच्चाटन करण्याचा हा दिवस होय. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होण्याच्या या दिवशी वही-खात्यासह सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम यांची प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी पूजा केली जाते. लक्ष्मीचा संबंध स्वच्छतेशी जोडला असल्याने नवी केरसुणी विकत घेऊन, तिलाच लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी घालून हळदकुंकू वाहून या दिवशी घरात वापरण्यास घेतात. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये रुजवण्याचा हा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी उत्तरेत गोवर्धन पर्वताची पूजा करतात. विविध प्रकारची पक्वान्ने, खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे मांडणे व त्याचा नैवेद्य दाखवण्याला अन्नकूट म्हणतात. आपल्याकडे दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला औक्षण करून तिला हवी असलेली भेटवस्तू “पदरात’ पाडून घेते. कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता. द्वितीयेचा चंद्र आकर्षक, वर्धमानता दाखवणार आहे. आधी चंद्राला ओवाळून नंतर भावाला औक्षण करण्याच्या या दिवशी औक्षणकर्त्या भगिनींची ‘बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’ हीच भावना असते. बंधुभाव जोपासणाऱ्या या दिवसाचे महत्त्व आधुनिक संदर्भात केवळ बहीणभावापुरते न उरता व्यक्ती-व्यक्तीत संवादाचे, सौहार्दाचे वातावरण कसे निर्माण करता येईल या अर्थाने घेतले पाहिजे. सुख, समाधान, आनंद, उत्सव या साऱ्यांचं प्रतीक असलेली दिवाळी त्याच घरी साजरी होऊ शकते, जिथे शेत चांगलं पिकून धान्यांच्या राशी येऊन पडल्या आहेत. उद्योग-व्यवसायात तेजी येऊन बक्कळ पैसा हाती आला आहे. जिथे यापैकी काहीच नाही त्या घरी मात्र ऐन दिवाळीत भयाण वाटावा असा अंधार दाटलेला पाहायला मिळतो. प्रगतीच्या दिशेने एकही पाऊल पुढे न पडलेल्या वस्त्या, वाड्या, पोड, तांडे मोठ्या संख्येने आहेत अजून. म्हणूनच एकीकडे डोळे दिपून जावे अशी रोषणाई, बाजारात पाय ठेवायला जागा सापडू नये इतकी तुफान गर्दी आणि पंचपक्वान्नांच्या पंगती झडत असताना याच आपल्या देशात, नव्हे अगदी आसपाससुद्धा दिवेलावणीत घालायला तेलाचा थेंब असू नये, असेही चित्र पाहायला मिळते. कोणतेही संवेदनशील मन या दुसऱ्या भारताचे चित्र पाहून अस्वस्थ होणारच! या अस्वस्थतेतूनच जन्माला येतात स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे माणूसपण जपणारे प्रकल्प. ज्या समाजाने आपल्याला इतकं काही दिलं, त्याचं आपणही काही देणं लागतो या भावनेने लोक जिथे जिथे असतात, त्या शाळा-महाविद्यालयातून, सरकारी नि अ-सरकारी संस्थांतून मग ‘ज्यांची बात फुलून आली, त्यांनी दोन फुलं द्यावीत’ या ओळी आपल्या कृतीतून गुणगुणताना पाहायला मिळतात. दिवाळीतले सुखद चित्र डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे. आपण यांच्यामुळे इकडे सहकुटुंब मजेत दिवाळी साजरी करू शकतो ते वीर जवान त्यांच्या कुटुंबापासून दूर सीमेवर पहारा देत असतात. या जवानांच्या प्रति कृतज्ञता आणि विश्वास व्यक्त व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली प्रत्येक दिवाळी सीमेवरील सैनिकांसोबत साजरी करतात. तेव्हा त्यांची ही छोटीशी कृती उदाहरण घालून देणारी ठरते. सीमेवरील जवानांसाठी दिवाळीची शुभेच्छा पत्रे, फराळाचे साहित्य पाठवणाऱ्या व्यक्ती व संस्थांची संख्या दरवर्षी वाढते आहे.
शेतकरी हा तर जगाचा पोशिंदा. परंतु त्याच्यावरच उपासमारीची वेळ आली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे त्यानं घेतलेला आत्महत्येचा टोकाचा निर्णय. या वर्षीच्या अतिरिक्त पावसाने शेत खरडून नेलं, तसं प्रत्येक वर्षी नापिकी, भाव नसणे, कर्जबाजारीपणा अशा कुठल्या तरी कारणाने शेतकरी हवालदिल होतो. त्यानं ऐन दिवाळीच्या तोंडावर गळफास घेऊन स्वतःला संपवल्याच्या घटना सुन्न करून जातात. त्याच्या उघड्यावर आलेल्या कुटुंबात कसली आली दिवाळी? अशा वेळी यवतमाळातील “दीनदयाल सेवा प्रतिष्ठान’ पुढाकार घेऊन या कुटुंबास आधार देण्याचं कामगिरी सोळा वर्षे करत आलंय. संस्थेचे पदाधिकारी यवतमाळ, वाशिम व आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची माहिती घेऊन ऐन दिवाळीत कुटुंबीयांचे सांत्वन करायला जातात. मदत करायला नव्हे, तर भाऊ म्हणून आलो आहोत ही भावनाच त्या कुटुंबाचा विश्वास जिंकणारी ठरते. त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने एखाद्या ठिकाणी एकत्र करून औक्षण आणि ओवाळणी म्हणून साडी, मुलांसाठी मिठाई, फटाके, गृहपयोगी वस्तू देण्याचा कार्यक्रम होतो. या उपक्रमात समाजातील इतर प्रतिष्ठितांनाही आमंत्रित केले जाते. त्यांच्यातील दातृत्व विकसित होण्यासोबतच आपणही या कुटुंबाचे कोणी बंधू बांधव लागतो ही भावना निर्माण होते. दिवाळी भाऊबीजेच्या निमित्ताने आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांसोबत निर्माण झालेलं नातं दीनदयाल वर्षानुवर्षे जोपासत आलं आहे. त्यामुळेच आता संस्थेने दत्तक घेतलेल्या परिवारांची संख्या ४०० हून अधिक झाली. या परिवारातील प्रत्येकाचे शिक्षण, आरोग्य, शेतीसाठी बियाणे, शेतीपूरक व्यवसायासाठी मदत केल्यामुळे आज त्यापैकी ३०० परिवार चक्क आत्मनिर्भर झाले आहेत. दीनदयाल संस्थेतील परिवार संकल्पनेमुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची स्थिती “एक दिव्याने उजळे दुसरा, झगमग दीप अनेक’ अशी स्पृहणीय वाटू लागली आहे…
शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारांच्या आधीच संस्थेने, बेड्यांवर राहणाऱ्या पारधी या भटक्या समाजाचे प्रश्न आपले मानले. शिक्षण, आरोग्याच्या कुठल्याही सुविधा नसणारे बेडे पाहिले की तिथे राहणाऱ्यांना स्वतंत्र भारताचे नागरिक कसे म्हणावे, असा प्रश्न पडायचा. इथेही दिवाळीचे निमित्त साधून दीनदयालचे पदाधिकारी स्वच्छतेचे महत्त्व सांगू लागले. “जिथे स्वच्छता, तिथेच लक्ष्मी’ या व्यक्तीचा प्रत्यय आणून देण्यासाठी तिथल्या मुलांना आंघोळ घालून देण्यापासून शिक्षणासाठी विवेकानंद छात्रावासात आणण्यापर्यंत आणि शिकार व चोरीपासून परावृत्त करण्यापासून स्वयंरोजगार थाटण्यापर्यंतचा मोठा टप्पा गेली २५ वर्षे सातत्याने प्रयत्न करण्यातून गाठला गेला आहे. पारधी बेड्यावर दरवर्षी “स्वच्छ घर, सुंदर परिसर’ स्पर्धा चालते. आता तिथे आपापली झोपडी झाडून, अंगणात सडा टाकून, त्यावर रांगोळी रेखण्यापर्यंत महिलांची प्रगती झाली आहे. त्यांचं कौतुक करायला दीनदयालचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठितांना सोबत घेऊन जातात. त्यातून या वंचित समाजघटकाशी प्रतिष्ठितांचेही आपुलकीचे नाते तयार होऊ लागले आहे. विवेकानंद छात्रावासात राहून शहरातील उत्तम शाळेत शिकून मोठी झालेली, नोकरी-व्यवसायास लागलेली मुलं आता बेड्यांवरील वातावरण बदलू लागली आहेत. छात्रावासात आजवर ५०० हून अधिक मुलं शिक्षणासाठी राहून गेली. शिक्षणासोबतच देश आणि समाजभान जागवणारे संस्कार घेऊन ही मुलं कुठल्या अंधारात भटकणार नाहीत याची काळजी संस्था घेत आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यात खितपत पडलेल्या वंचितांसाठी आपल्या जवळचा छोटा का असेना, प्रकाश पोहोचवता येईल या विचाराने कार्यरत असणाऱ्या सर्व संस्था, त्यांचे कार्यकर्ते आणि सहकारी ज्ञानदेवांना अपेक्षित असलेला ‘विवेकदीप’ उजळीत आहेत, असेच म्हणता येईल.
विवेक कवठेकर संपर्क : 9423133930
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares