पिकविम्यासाठी ऐन दिवाळीत उपोषण: उस्मानाबादेत आ. कैलास पाटलांचे आंदोलन; भाजपला राग का येतोय?, खासदार ओमराजें… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
2020च्या खरिपाचा पीकविमा न मिळाल्याने तसेच यावर्षीही अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरिपाच्या पिकांची प्रचंड नासाडी झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, सरकारकडून तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी ऐन दिवाळीत उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
भाजपची टीका
दरम्यान, या उपोषणावर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी टीका केली आहे. त्यावर खासदार ओमराजे यांनी प्रत्युत्तर देताना आमचे आंदोलन विमा कंपनीच्या विरोधात असताना भाजपला राग का येतोय?, असा खोचक सवाल विचारला आहे. तर, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनीही काळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आमदार कैलास पाटील यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
ठाकरे गटाचा हल्लाबोल
भाजप जिल्हाध्यक्ष काळे यांनी या उपोषणाला नौटंकी म्हणत खिजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जोरदार हल्ला करण्यात आला असून खासदार ओमराजे म्हणाले, विमा कंपनीकडून दलाली मिळणार नाही, या भीतीपोटी भाजपचा पोटशूळ उठला आहे. विमा कंपनीकडून भरपाई मिळू नये, यासाठी काही मंडळींचा खटाटोप सुरू आहे.
…तर शेतकरी माफ करणार नाही
माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनीही भाजपच्या नेत्यांवर संधान साधले. ते म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. अशा काळात भाजप नेते आणि पदाधिकारी विमा कंपनीच्या बाजूने गळा काढत आहेत, हे क्लेशदायक आहे. आमचा लढा विमा कंपनीच्या विरोधात असताना कुणी कंपनीची पाठराखण करत असेल तर शेतकरी अशा नेत्यांना माफ करणार नाहीत.
शेतकऱ्यांसाठी भांडतोय
श्याम जाधव यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांना प्रत्युत्तर देणारे पत्रक काढले असून,त्यात म्हटले आहे की, आम्ही शेतकऱ्यांसाठी भांडतोय कंपनीसाठी नाही. नितीन काळे यांनी मालकांच्या सांगण्यावरुन लोकनियुक्त आमदारांवर बोलायच्या भानगडीत पडु नये. तुमचे मालक कोणासाठी भांडले हे जिल्ह्याला माहिती झाले आहे. तुम्ही ज्या कैलास पाटलांवर बोलत आहात, त्यानी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे केले आहे. तुम्हाला यातना का होत आहेत?
भाजपला कंपनीची काळजी
नितीन काळे यांनी अडीच वर्षांत शेतकऱ्यांशी बेईमानी केल्याचा आरोप श्याम जाधव यांनी केला. या अडीच वर्षात आमदारांनी काय केले हे ऐकायचे असेल तर एका व्यासपीठावर येऊन चर्चा करु, असे आव्हानच श्याम जाधव यांनी दिले आहे. जाधव म्हणाले, अजुनही शेतकऱ्यांची नाही तर कंपनीचीच काळजी करताय हेच तुमच्या बोलण्यावरुन समोर येऊ लागले आहे. स्क्रिप्ट वाचताना जरा आपल्या अंर्तमनाला प्रश्न विचारला असता म्हणजे खर उत्तर मिळाले असते. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खरीप 2020 मध्ये शेतकरी संकाटात असताना स्वतः बांधावर येऊन शेतकऱ्यांना धीर दिला. त्यांना भरघोस मदत देऊन आधार दिला याचा विसर तुम्हाला पडलेला दिसतो आहे.
फडणवीसांनी शब्द पाळला नाही
श्याम जाधव म्हणाले की, देवेंद्र फडणवीस केंद्राकडुन मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा शब्द याच जिल्ह्यात देऊन गेले होते. 2020 सालापासुन आतापर्यंत केंद्राची मदत का मिळाली नाही. ती तर सोडाच पण तुमचे सरकार राज्यात येऊनही तुम्हाला मदत देता आली नाही. तुमच्या एकाही मंत्र्याला अशा आपत्तीच्या काळात जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांची वेळ काढता आला नाही. शेतकऱ्यांशी असलेली ही बेईमानी आहे. त्याच शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीपुजन असतानाही शेतकऱ्यांसाठी आमदार रस्त्यावर उतरुन निकराचा लढा देत आहे. त्याला तुम्ही बेईमानी म्हणत असाल तर हा शेतकरी तुम्हाला व तुमच्या नेत्याला कधीच माफ करणार नाही.
भाजपचा शेतकऱ्यांविरोधात लढा
अमुक विमा तमुक अनुदान आल्याचा बोबाटा करताना खात्यावर किती पडले हा साधा प्रश्न शेतकरी उपस्थित करत असताना तुम्ही स्क्रिप्टच्या बाहेर बघायलाच तयार नसल्याचा खोचक टोला शाम जाधव यानी लगावला. आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणुन काम करत असल्याने शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत कंपनीच्या बाजुने लढणाऱ्यानी शेतकऱ्यांच्या विरोधात लढा उभारला तर आश्चर्य वाटणार नसल्याचे श्याम जाधव यानी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares