''स्वच्छ ओतूर, सुंदर ओतूर''ला हरताळ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
ओतूर, ता.२५ : येथील (ता.जुन्नर) कचऱ्याची समस्या प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे सुटण्याऐवजी गंभीर बनली आहे. ग्रामपंचायतीकडून ज्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे तेथील नागरिक दुर्गंधीच्या नाहक त्रासामुळे हैराण झाले आहेत. चुकीच्या नियोजनामुळे ''स्वच्छ ओतूर, सुंदर ओतूर, हरित ओतूर'' या घोषणेला हरताळ फासण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ओतूर येथे कचरा व्यवस्थापन व आरोग्याचा प्रश्न वारंवार सतावत असून, नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेली पाण्याची डबकी, त्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याकारणाने डासांची निर्मिती होऊन डेंगी, मलेरिया, टायफॉईड आदी साथींच्या आजारांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय? असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत. ओतूर येथील शेटेवाडी, पाथरटवाडी, मालकरवस्ती, बाबीतमळा, पानसरेवस्ती, वाकचौरे मळ्याकडे जाणाऱ्या पिंपळगावजोगे धरणाच्या कालव्या लगतच्या रस्त्यावर कचऱ्याचे मोठ- मोठे ढिगारे साठले असून, कचऱ्याचा ढीग कलव्याच्या रस्त्यावर आला आहे. त्यातील काही प्लास्टिक कचरा वाऱ्याने कालव्यात देखील पडला आहे. या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या येथील रहिवाशांना रस्त्यांवरून ये- जा करताना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, ओतूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी कचऱ्याच्या समस्येबाबत न बोलणे पसंत केले.
कचरा पेटवल्यामुळे प्रदूषणाचा त्रास
कचऱ्यामुळे मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट झाला असून येथील कचरा वाऱ्याने लगतचे शेतकरी काशिनाथ साबळे, गिरीश साबळे व शेतकऱ्यांच्या शेतात पसरत आहे. तसेच येथील कचरा पेटवल्याने त्यातून निघणाऱ्या धूरापासून प्रदूषणाचा त्रास येथील मुले, ज्येष्ठ नागरिक व आजूबाजूच्या घरांमधील परिसरातील नागरिकांना होत आहे. तसेच धुराचा व प्लास्टिकचा शेती पिकावरील परिणाम होत असल्याचे येथील शेतकरी त्रस्त झाले आहे

व्यवस्थापनावरील खर्च पाण्यात गेल्याने संताप
ओतूर ग्रामपंचायतीचा कचरा व्यवस्थापनावर लाखो रुपये खर्च दाखवला जात असताना देखील कचरा समस्या मात्र जैसे थे असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे रोगराई फैलावत असल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. कचरा व्यवस्थापनावर होणारा खर्च पाण्यात गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती बायोगॅस निर्मितीसाठी काही सेवाभावी संस्था व इतर ग्रामपंचायत ओतूर गावातील सर्व कचरा स्वखर्चाने घ्यायला तयार असताना देखील ओतूर ग्रामपंचायतीने यासाठी कुठलेही तयारी दर्शविली नसल्याने ओतूरकरांना या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे, असे येथील नागरिकाने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.
03370
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares