दिव्य मराठी विशेष: भंडाऱ्यामध्ये जपली 300 वर्षांची थरारक गोधन पूजा, गुराख्याच्या अंगावरून धावल्या गायी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
जनावराचा साधा पाय पडला तरी मनुष्याला जखम होते. मात्र, जांभोरा येथे दीडशे गायींचा कळप अंगावरून जाऊनही गुराख्याला साधे खरचटले नाही. मंगळवारी मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे हा चित्तथरारक पूजनाचा कार्यक्रम पार पडला. ३०० वर्षांपासून ही परंपरा परतेकी कुटुंबाने जोपासली आहे.बलीप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने गोधनाची पूजा केली जाते. रानावनात गुरे चारण्यास नेण्याचे काम पूर्वापार आदिवासी समाजातील नागरिक करत आहेत. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो. गाईला अंघोळ घालून वाजतगाजत गावात मिरवणूक काढून अंगणातील शेणाचे गोधन गाईच्या पावलाने उधळले जाते. जमिनीवर पालथे झोपून अंगावरून संपूर्ण कळप चालवून घेण्याची अनोखी परंपरा जांभोरा येथे ३०० वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. मंगळवारी दुपारी १२ ते दोन वाजतापर्यंत या चित्तथरारक गोधन पूजेत जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी यांच्या अंगावरून शेकडो गाईंचा कळप धावत गेला. मात्र, ते निर्धास्त व सुखरूप होते. मोहाडी तालुक्याच्या पूर्व टोकावर पहाडाच्या कुशीत जांभोरा हे हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात १०० टक्के शेतकरी असून त्या सर्वांकडे मिळून दीडशे ते दोनेशे गायी आहेत. गावातील सर्व गाई चारायला जंगलात नेण्याचे काम पिढ्यानपिढ्या परतेकी कुटुंबाकडे आहे. ३०० वर्षांपूर्वी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरूच आहे. गावातील सर्व गायींना अंघोळ घातली जाते. शिंगे रंगवून व नवीन गेटे, दावे बांधून त्यांना सजविले जाते. तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर हे पूजन केले जाते.
आदिवासी ढालींची परंपरागावातील गुरे-ढोरे चारून चरिचार्थ करणाऱ्या आदिवासी गोवारी समाजासाठी दिवाळीचा पाडवा हा पर्वणी ठरली. सकाळी या जनावरांना लक्ष्मीसारखे सजवले गेले. सायंकाळी सर्व गायी-गुरे गावामधून फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाय हंबरेपर्यंत नाचविण्यात आल्या. तत्पूर्वी, दोन बाशावर फाडक्या बांधून पुरुष-ढाल म्हणजे गोहळा व स्त्री-ढाल म्हणजे गोहळी उभारण्यात आली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आदीवासी गोवारी नृत्याला प्रारंभ झाला. डफळी व मुरलीच्या निनादात दादऱ्याची मैफल रंगल्याने नृत्यात रंगत आली.
आम्ही या माध्यमातून गायींना क्षमा मागतो गोमातेनेच आम्हाला पोटापाण्याचे व जगण्याचे साधन दिले. आज तिच्या आशीवार्दामुळे आम्ही तुम्ही जिवंत आहोत. ही अंधश्रद्धा नाही. गोमातेवर असणारी निष्ठा व श्रद्धा आहे. यामुळे यातून कोणतीही धोका व इजा आजवर झाली नाही. गेल्या शेकडो वर्षांपासून पणजोबापासून ही प्रथा अखंडपणे सुरू आहे. वर्षभर आम्ही गायींना चारायला जंगलात नेतो. अनेकदा त्यांना काठीने मारतोही, यासाठी आम्ही गायींना या माध्यमातून क्षमा मागतो. -विनायक परतेती, गुराखी, जांभोरा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares