कर्नाटकचे रागरंग : ‘भारत जोडो’चा कर्नाटक काँग्रेसला ‘हात’ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो पदयात्रे’ला कर्नाटकात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षासाठी नवसंजीवनी देणारा आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो पदयात्रे’ला कर्नाटकात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षासाठी नवसंजीवनी देणारा आहे. राज्यात पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नेते आणि कार्यकर्त्यांचा विश्‍वास दुणावला आहे. त्याचा फायदा निवडणुकीत उठवण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.
तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरला काँग्रेसची महत्त्वाकांक्षी ‘भारत जोडो पदयात्रा’ सुरू झाली. त्याला गुरुवारी (ता. २७) ५० दिवस पूर्ण झाले. या काळात तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आता ही पदयात्रा तेलंगणमध्ये पोहोचली आहे. तब्बल दीडशे दिवस चालणारी १२ राज्ये, दोन केंद्रशासित प्रदेशांतून जाणारी आणि ३८०० किलोमीटर अंतराची ‘आसेतुहिमालय’ अशी ही पदयात्रा भारताच्या इतिसाहात एक विशेष घटना म्हणावी लागेल. देशात आतापर्यंत झालेल्या पदयात्रा, रथयात्रा, मूक मोर्चापेक्षा अतिशय वेगळी अशी ही पदयात्रा ठरत आहे. या पदयात्रेमुळे कर्नाटकचे अंतरंग ढवळून निघाले आहे.
तीन राज्यांत म्हणजे तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकात पदयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुढे तसाच राहील अशी चिन्हे आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी, मातब्बर आणि निवडक नेते तसेच इतर पक्ष, संस्था, पत्रकार, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे विशेष म्हणजे कर्तृत्ववान महिला, असे १५० जण पदयात्रेच्या पहिल्या दिवसापासून अखेरपर्यंत राहणार आहेत. त्यामुळे पदयात्रेला २४ तास कडक सुरक्षा पुरवावी लागली आहे. रोज दोन टप्प्यांत २४ किलोमीटर अशा गतीने गेल्या ५० दिवसांत या पदयात्रेने एक हजार किलोमीटर अंतर पार केले आहे.
केंद्र सरकार विशेष करून भाजपला लक्ष्य करत देशातील वाढणारा जातीयवाद, बेरोजगारी, महागाई आणि सत्तेचे केंद्रीकरण हे मुद्दे मांडत पदयात्रा सुरू आहे. ‘मिले कदम, जुडे वतन’, ‘महंगाई से नाता तोडो, मिलकर भारत जोडो’, ‘बेरोजगारी का जाल तोडो, भारत जोडो’, ‘संविधान बचाओ’ अशा नाऱ्यांनी पदयात्रा दुमदुमत आहे. याशिवाय गाणी, स्थानिक गीत, नृत्य, पथनाट्यांनाही ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रेची वेळ संपल्यानंतर राहुल गांधी इतर नेते स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. अगदी शेतकरी, शेतमजूर, कामगार, सफाई कामगार, महिला, मुले, विद्यार्थी यांच्याशी बोलत आहेत. संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून त्यांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पदयात्रेला सर्वच थरांतून प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधीही चिमुकल्या मुलीच्या बुटाची लेस बांधणे, इंदिरा गांधींची वेशभूषा केलेल्या चिमुरडीला खांद्यावर घेऊन चालणे, सोनिया गांधींच्या बुटाची लेस बांधायला आलेल्या सुरक्षा रक्षकाला बाजूला सारून स्वतः लेस बांधून देणे, भाताची साळी हातात घेऊन शेतकऱ्याची आपुलकीने चौकशी, अशा गोष्टींमुळे राहुल गांधी सोशल मीडियावर दिसत आहेत. आजीबाईंना मिठी मारून त्यांच्या छोट्या-छोट्या समस्या जाणून घेऊन भावुक झालेल्या राहुल गांधींच्या छायाचित्रांना प्रसिद्धी मिळत आहे.
दुसऱ्या बाजूला भाजप सरकार पदयात्रा अडवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी जोरदार टीका सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी केली. दोघांनी भाजप, तसेच सरकारवर घणाघातील टीका करताना एकही संधी सोडली नाही. मंत्र्यांकडून कंत्राटदारांकडे ४० टक्के कमिशनची मागणी, त्यातून मंत्र्याचा राजीनामा, मंगळूर जिल्ह्यात भाजपच्याच युवा नेत्याचा खून, पाठ्यपुस्तक पुनर्रचनेचा घोळ, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब, वादग्रस्त हिजाबबंदी, सिद्धरामय्यांवर अंडीफेक अशा विविध मुद्द्यांवर बॅकफूटवर गेलेला भाजप काँग्रेस नेत्याच्या टीकेमुळे घायाळ झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आपले काम चोख बजावताना विधिमंडळात आणि बाहेरही भाजपला घेरले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांत आत्मविश्‍वासाची फुंकर मारताना आता काँग्रेसला हत्तीचे बळ आले आहे.
भाजप सरकारकडून शालेय पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करताना शहीद भगत सिंग यांचा पाठ वगळणे, राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या पाठांमध्ये त्रुटी, व्याकरणाच्या चुका अशा कारणामुळे शैक्षणिक विश्‍वच ढवळून निघाले आहे. सरकारच्या विरोधात जाताना लेखक, कवींनी आपले साहित्य पाठ्यपुस्तकातून मागे घेण्यासाठी सरकारवर पत्रांचा भडिमार केला. त्यानंतर पाठ्यपुस्तके नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली. विविध माध्यमांवर उपलब्ध करून दिली. सोबत चुका दुरुस्त करून त्याची स्वतंत्र पुस्तिका देण्याचे जाहीर केल्यानंतरच हे आंदोलन थांबले. हिजाबबंदीचा विषयही सरकारला नीटपणे हाताळता आला नाही. उडुपीच्या महाविद्यालयात सुरू झालेला हा प्रश्‍न राज्यभर पसरला.
उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात दावे-प्रतिदावे झाले. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्या विषयावरून सरकारचे हात पोळून निघाले आहेत. पीएसआय परीक्षेतील गैरव्यवहाराने तर सरकारची पूर्णतः नाचक्की झाली. यावरून जर काँग्रेसने रान उठवले नसेल तर नवलच. विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पदयात्रेदरम्यान भाजप तथा सरकारला कोंडीत पकडले. पत्रकार परिषदा, आंदोलने, रास्ता रोकोच्या माध्यमातून सरकारची गोची केली. दरम्यान, पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आलेल्या सिद्धरामय्या यांच्या वाहनांवर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकली. यावर स्पष्टीकरण देता देता सरकारच्या नाकीनऊ आले. प्रकरण फारच तापण्यापूर्वी तातडीने आजी-माजी मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी लागली, हे मुद्देही पदयात्रेदरम्यान सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी वेळोवेळी जनतेसमोर मांडले.
राज्य विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. भाजपला दक्षिणेत सर्वांत प्रथम कर्नाटकाने यश दाखवले. कर्नाटकाच्या माध्यमातून दक्षिणेतील तेलंगण, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण कर्नाटक वगळता इतर राज्यांत भाजपला फारसे काही हाती लागलेले नाही. त्यामुळे आता कर्नाटक भाजपसाठी महत्त्वाचे ठरले आहे. त्यातूनच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप ‘जनसंकल्प’ यात्रेतून डागडुजी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; पण प्रयत्न फारच तोकडा आहे. ‘वेळ कमी आणि सोंगे फार’ अशी अवस्था भाजपची, परिणामी सरकारची झाली आहे. त्यावर भाजप पक्षश्रेष्ठी काय उपाय शोधतात, ते पाहावे लागेल.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares