बळीराजा महोत्सव – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
10559
संविधान टिकविण्यासाठी व्यापक लढा उभारावा
डॉ. भारत पाटणकर; बळीराजा महोत्सव समितीतर्फे कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६. : संविधान टिकविण्यासाठी व्यापक लढा उभारणे म्हणजेच समतावादी बळीराजाचे राज्य आणणे होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले.
बळीराजा महोत्सव समितीतर्फे आयोजित बळीराजा महोत्सवात ‘बळीराजा संस्कृती व आजचा समाज’ विषयावर ते बोलत होते. यावेळी सरलाताई पाटील, रघुनाथ कांबळे, गौतम कांबळे यांना बळीराजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समितीचे अध्यक्ष उमेश पोवार अध्यक्षस्थानी होते. गंगावेस येथे कार्यक्रम झाला.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, श्रमिक यांना संपवण्याचे कट कारस्थान राजसत्तेकडून होत आहे. भारताची समताधिष्टीत असलेली राज्यघटना मोडीत काढली जात आहे. या स्थितीत नागरिकांनी दक्षता असणे आवश्‍यक आहे. बळीराज्यात श्रमाला प्रतिष्ठा होती. स्त्री–पुरूष समानता होती. शेतीचा विकास व कुटुंबात महिलांचे स्थान मोठे होते.’’
ते म्हणाले, ‘‘तसेच नवीन शैक्षणिक धोरणामुळे वीस पटसंख्येपेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करणे म्हणजे ग्रामीण जनतेला शिक्षण नाकारणे आहे. याद्वारे पुन्हा एकदा एकलव्य व शंबूक तयार होणार आहेत. आजचे भारत जोडो आंदोलन बहूजनांची एकता वाढवणारे आहे.’’
आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते मिरजकर तिकटी येथे बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून शोभा यात्रेस सुरवात झाली. खासबाग मैदान, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, पापाची तिकटी मार्गे गंगावेश असा शोभायात्रेचा मार्ग राहिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवराज नाईकवाडे, व्यंकाप्पा भोसले, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अश्विनकुमार वागळे, प्राचार्य जी. पी. माळी, चंद्रकांत यादव, अतुल दिघे, बाबा पार्टे, बाबूराव कदम, बाळासाहेब भोसले, बबन रानगे, सुखदेव सुतार, युवराज सुतार, शफीक देसाई, राजेंद्र मगदूम, प्रा. अशोक पाटील, पैलवान बाबाराजे महाडिक, रमेश कामत उपस्थित होते. समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. टी. एस. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ज्ञानेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र जाधव यांनी आभार मानले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares