अंकुश ने ऊस वाहतूक रोखली, कार्यकर्त्यांची पोलिसांनी केली धरपकड – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
धनाजी चुरमुंगे यांना पोलिस घेऊन जात असताना झालेली झटापट.
…………….
‘आंदोलन अंकुश’ने ऊस वाहतूक रोखली
पोलिस – कार्यकर्त्यांमध्ये झटापट : आज शिरोळ तालुका बंदची हाक

शिरोळ, ता. २८ः गेल्या हंगामातील गाळप उसाचा हिशेब द्या व या वर्षीचा दर जाहीर करा, या मागणीकरिता ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी शिरोळमध्ये गुरुवारी रात्रीपासून ऊस वाहतूक रोखली. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ऊस वाहतूक रोखण्यावरून, शिरोळ पोलिस व ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन,ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर कारखान्यास पाठवले. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून ‘आंदोलन अंकुश’ने शनिवारी शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे.
गुरुदत्त, जवाहर व शरद साखर कारखान्याने शिरोळ तालुक्यात ऊसतोडी सुरू केल्या होत्या. गेले चार दिवस आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून कोयताबंद आंदोलनाबाबत प्रबोधन केले जात होते. तथापि, काही शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांच्या ऊसतोडी स्वीकारल्या होत्या. गुरुवारी रात्री नऊ वाजल्यापासून ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात केली होती. सुमारे दोन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने गुरुदत्त साखर कारखान्याची वाहने अधिक होती. कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली असली तरी कोणत्याही वाहनाची तोडफोड केली नव्हती. ड्रायव्हरांना चहा, पाणी जेवणाची सोय केली होती.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास, ज्या शेतकऱ्यांचा ऊस रोखण्यात आला होता, त्या शेतकऱ्यांनी शिरोळ पोलिसांकडे धाव घेतली. आम्हाला कारखान्यांना ऊस पाठवायचा आहे, आमची वाहने सोडा, अशी मागणी केल्याने, शिरोळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी धनाजी चुडमुंगे संबंधित शेतकऱ्यांना आंदोलनाचा हेतू सांगत असताना, काही वाहनधारकांनी वाहने घेऊन जाण्यास सुरुवात केली. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते वाहनांच्या आडवे पडल्याने काही काळ गोंधळ उडाला. यावेळी पोलिस व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. चुडमुंगे यांच्यासह प्रमुख चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाहनांमध्ये कोंबून ठाण्यामध्ये आणले. दुपारी अडीचच्या सुमारास चुडमुंगे यांच्यासह ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, प्रवीण माने, महेश जाधव, उदय होगले, अमोल गावडे, भूषण गंगावणे, कृष्णात माने देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.
………………..
‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू केले आहे. शेतकरी, वाहनधारक, ऊसतोड मजूर या सर्व घटकांचा विचार केल्यास साखर कारखाने वेळेवर सुरू ठेवणे गरजेचे आहे. गुरुदत्त शुगरने २९०३ रुपये इतका दर घोषित केला असला, तरी भविष्यात एफआरपीनुसार जो फरक निघेल तो देण्यात येणार आहे.

– विजय जाधव, मुख्य शेती अधिकारी
………

‘शांततेच्या मार्गाने वाहने अडवली. ड्रायव्हरांच्या संध्याकाळच्या जेवणाची सोय केली. सकाळी चहा-नाश्ता दिला. झोपण्याकरिता पांघरूणे दिली. याचा व्हिडीओ आमच्याकडे आहे. हे सर्व करूनही एका वाहन चालकाने आमच्यावर गुन्हा दाखल केला. यामुळे म्हणावे लागेल हे कलियुग आहे, खऱ्याला न्याय नाही. तथापि, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कितीही गुन्हे दाखल केले तरी आमचा लढा चालूच राहील.
– धनाजी चुडमुंगे, प्रमुख, आंदोलन अंकुश
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares