आंदोलनाचा अडथळा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
परतीच्या पावसानंतर आता आंदोलनांचा अडथळा
गळीत हंगामाचा प्रश्‍न; संघटना-कारखाना चालकांत समन्वयासाठी हवा पालकमंत्र्यांचा पुढाकार
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : जिल्ह्यातील गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. तीन ते चार साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी सुरू झाली असतानाच आता एकरकमी एफआरपी अधिक काही रक्कम दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा विविध शेतकरी संघटनांकडून दिला जात आहे. त्यामुळे परतीच्या पावसातून सावरलेला गळीत हंगाम आंदोलनांत अडकू नये; यासाठी साखर कारखाने आणि संघटनांनी तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकरी संघटना आणि कारखाना चालकांमध्ये समन्वय घडविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे.
जिल्ह्यात अतिवृष्टी, महापूर आणि त्यानंतर परतीच्या पावसातून जीवदान मिळालेला उसाची वेळेत तोडणी झाली पाहिजे. पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. आता गळीत हंगाम सुरु करण्यासाठी योग्य वेळ आहे. त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी आपआपल्या साखर कारखान्यांची ऊसतोडणी सुरु केली आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन पहिला हप्ता ३००० ते ३१०० पर्यंत जाहीर केला आहे. अजूनही काही कारखाने दर जाहीर करुन कारखाने सुरु करत आहेत. मात्र, साखरेव्यतिरिक्त मिळणाऱ्या उपपदार्थांचा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश यासह विविध संघटना रस्त्यावर उतरत आहेत. वास्तविक कारखान्यांनी गतवर्षीची काही देणी तत्काळ दिली पाहिजेत. तसेच, पुढील हप्ता किती असणार, याची चर्चा करावी लागणार आहे.
—————
चौकट
तातडीने बैठक व्हावी…
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यंदाचा हंगाम सुरळीत आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी संघटना आणि कारखाना चालकांची बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर ही चर्चा घडवावी आणि कारखाने सुरळीतपणे सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares