देश-विदेश अन् महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसींच्या घरावर हल्ला
कथित एसआरए घोटाळा प्रकरणात शिवसेना नेत्या किशोरी पेडणकेर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आज त्यांची चौकशी झाली, यानंतर आता उद्या देखील त्यांची चौकशी होणार आहे.
महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांच्या कॅलिफोर्निया येथील घरावर एका व्यक्तीनं हल्ला केला आहे. घरात घुसून त्यानं पॅलोसी यांच्या पतीला मारहाण केली. यामध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ठाकरे गटाकडून उद्या उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आलेली आहे. पीक विमा कंपनी भरपाई देत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. जोपर्यंत विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही ५३१ कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. पाडळी गावात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. आ. कैलास पाटील यांचं पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे.
राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि नियंत्रण वैद्यमापन अधिकारी डॉ. रविंद्र सिंघल यांची स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भेट घेतली. राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे ॲानलाईन करण्याची मागणी केली. राज्यातील साखर कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात काटामारी सुरू असून यामुळे शेतकरी , वाहतूकदार व तोडणी मशिनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
नागपूरमध्ये होणारा टाटाचा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील संताप व्यक्त केला. ८ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने कंपनीसोबत करार केला होता. तरीही हा प्रकल्प गुजरातला जातोच कसा? दरवेळी काहीतरी कारण सांगतात, दुसरा प्रकल्प आणू म्हणतात. हे नेमकं चाललंय काय? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने काँग्रेसने आंदोलन केलं आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
मुंबईतील बोरीवली येथील वझिरा नाका परिसरातील एका तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत 4-5 वाहने मलब्याखाली अडकली आहेत. सुदैवाने कुणालाही यात दुखापत झालेली नाही.
कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र मोक्का कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गजा मारणेला वाई येथून ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं होतं.
'एअरबस'बाबत मुख्यमंत्र्यांनी बोलण्याची गरज आहे. पुन्हा एक प्रकल्प राज्याबाहेर गेलेला आहे. ही गंभीर बाब आहे. परंतु याचं खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा डाव असल्याचा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केलाय.
रवी राणा विरुद्ध टीका करताना बच्चू कडू यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा कडून बच्चू कडूवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, तर राजापेठ पोलिसांनी विरुद्ध बच्चू कडू विरुद्ध महिलांची बदनामी केल्याप्रकरणी 501 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
रवी राणा यांनी १ नोव्हेंबर आत पुरावे सादर करावे. अन्यथा हिजडा घोषित करेल अशी भाषा वापरली आहे. त्यामुळे महिला अमरावतीत आक्रमक झाल्यात. महिलांविषयी अपशब्द वापरणे योग्य नसल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने एफडीविरोधात हायकोर्टाता धाव घेतली आहे.
मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट अचानक हॅक झाले आहे. याबाबतची माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, याबाबत लवकरचं अधिक माहिती दिली जाईल, त्यानंतरच रेल्वे पोलिसांच्या ट्विटकडे लक्ष द्या. या प्रकरणी तपास सुरु असून, अकाऊंट लवकरात लवकर पूर्ववत केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा सत्ताधारांवर निशाणा साधला. वेदांत नंतर टाटा एअरबस प्रकल्प तिकडे गेला. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमी अपयश का येतय? असा सवाल उपस्थित केला आहे.
विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यापुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. राजकारणात कार्यकर्त्यांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगावर आरोप करणं समाजवादीचे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना महागात पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरील पुरावे, कागदपत्रे अखिलेश यादव यांच्याकडे मागितले आहेत, यादव हे पुरावे देतील का, निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारत आणि रशियामध्ये चांगलं नातं असून, कोणत्याही मुद्द्यावरुन मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं.
अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. भाजपने उमेदवारी मागे घेतली असली, तरी अद्याप अनेक अपक्ष उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही पोटनिवडणूक रद्द करणयात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 583 रुपये आहे.
टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना काढून टाकलं आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares