संतप्त सूत्रधारांच्या काळात नव्या परिभाषेची ‘यात्रा’… – Loksatta

Written by

Loksatta

गणेश देवी
काही दिवसांपूर्वी सर्व टीव्ही वाहिन्यांवर, माथेफिरू श्वान विरुद्ध संतप्त नागरिकांच्या झुंजीची चर्चा रंगली होती. हा खरोखरच एक चांगला विषय आहे. मी श्वानप्रेमींपैकी एक आहे आणि श्वानांच्या सहवासात मी काही आनंदाचे क्षण अनुभवले आहेत. पाळीव असोत किंवा भटके, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे. तथापि, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी नागरिक जाणून घेत असताना टीव्ही वाहिन्यांनी अशा चर्चेमध्ये अमूल्य वेळ दवडणे हे नकळत की लक्ष विचलीत करण्यासाठी आहे हे काही दडून राहिलेले नाही. पाळीव किंवा भटक्या, अनेक टीव्ही वाहिन्यांनी हा आडवळणाचा मार्ग शोधला, हीच टीव्ही वाहिन्यांची स्थिती स्पष्ट करणारी पुरेशी बोलकी टिप्पणी आहे. हे सर्व अशा वेळी घडले जेव्हा रुपयाची अधिकच घसरण झाली होती, अवकाळी पावसाने उभ्या पिकांची नासाडी केली होती, बिल्किस बानो प्रकरणातील दोषी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले होते, जागतिक भूक अहवालात देश अनेक अंकानी खाली घसरला होता, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळण्याची किमान अपेक्षा असलेल्या एका भागात सर्वाधिक उपस्थिती दिसून आली होती. महत्त्वपूर्ण माहिती थोपवून धरून नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये जणू कडेकोट भिंतीचे स्वरूप इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्राप्त केले आहे. वेगवेगळ्या वाहिन्यांचे ‘टीआरपी’ जाणून घेण्याचा कोणताही विश्वसनीय आणि विश्वासार्ह मार्ग आपल्याकडे नाही; परंतु टीव्ही वृत्तवाहिन्या पाहणारे बहुतांश लोक बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी अन्य मार्गांकडे वळले आहेत हेही स्पष्टपणे दिसत आहे. मुद्रित माध्यमे यापेक्षा काही वेगळी आहेत का? याचं उत्तर दुर्दैवानं नाही असे आहे. ज्या पुरातन उद्देशाने वर्तमानपत्रे अस्तित्वात आली, त्याच्या पूर्ततेसाठी असलीच तर केवळ लहान स्थानिक वर्तमानपत्रे, अव्यावसायिक प्रकाशने छापली जात आहेत.
विद्यमान सरकारच्या राजवटीच्या काळात केवळ प्रसारमाध्यमेच नव्हे, तर लोकशाहीचे इतरही अनेक स्तंभ मोडकळीस आले आहेत, ही बाब आता लपून राहिलेली नाही. यामध्ये केवळ सरकारसाठी काम करणाऱ्या, सरकारसोबत काम करणाऱ्या आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या संस्थांचा समावेश नाही. त्यात भारतीय लोकशाहीचा निर्विवादपणे, ताठ कणा असलेली पक्ष व्यवस्थाही समाविष्ट आहे. ज्या प्रकारे बोली लावत किंवा प्रलोभने दाखवत, धमकावत आणि भीती निर्माण करत ‘निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शोधात’ भाजप मार्गस्थ झाला आहे, त्यावरून निवडून आलेल्या प्रतिनिधींना नागरिकांच्या समस्या आणि हितासाठी आवाज उठवण्याचा अधिकार देणाऱ्या राज्यघटनेच्या सत्त्वाची त्यांना कितीशी पर्वा आहे तेच दिसून येते. एकदा सत्तास्थापना झाल्यावर आणि निवडणुक विधी संपल्यानंतर, लोकांसाठी आणि देशासाठी काम करण्यासाठी आपण आहोत याचेच बहुतेक शासनकर्त्यांना विस्मरण होत आहे.
सर्वात वाईट म्हणजे एकदा का निवडणुकीचा उपचार संपला की लोकांचे प्रतिनिधित्व करण्याच्या अधिकाराचा ते स्वतःहून त्याग करत आहेत. कोणत्याही दोन निवडणुकीमधील पाच वर्षांचा कालावधी सामान्यतः – ‘नागरी सुट्टी’ समजली जात आहे. हे शब्द कठोर असतीलही, परंतु, डोळ्यावर पट्टी बांधलेले नागरिक आणि जवळजवळ कर्णबधिर प्रतिनिधींनी, एकत्र मिळून राज्यघटनेच्या आत्म्याची थट्टा मांडली आहे. भारताची ही स्थिती आहे आणि खरीखुरी लोकशाही आणि संविधानाचा आत्मा पुनर्संचयित करण्याची साधने वर्तमान राजवटीत कोमात गेल्याचे दिसत आहे.
भारत जोडो यात्रेने या कोमासारख्या अवस्थेतून लोकांना जागृत करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. माध्यमांनी कमी लेखण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी, रोज हजारोंच्या संख्येने लोक स्वेच्छेने त्यात सहभागी होत आहेत. या दीर्घ पल्ल्याला प्रारंभ झाला तेव्हा, अगदी भाजपच्या विचारसरणीचे समर्थन न करणाऱ्या वर्तुळातूनही आणि इतर अनेकांनी प्रतिकूल भाकिते केली होती. परंतु ३,००० किलोमीटरच्या यात्रेचा पूर्वार्ध पूर्ण होत असताना आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. भारत जोडो यात्रेने प्रचंड नैतिक भांडवल गोळा केले आहे. भाजपच्या प्रतिमा निर्मिती यंत्रणेने राहुल गांधींच्या बनवलेल्या तथाकथित छबीप्रमाणे ते नाहीत, हे लोकांना कळून चुकले आहे. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर, अत्यंत संवेदनाक्षम आणि प्रत्येकाविषयी तळमळ असलेली एक अतिशय मानवतावादी व्यक्ती म्हणून ते समोर आले आहेत. त्यांच्या खांद्यावर चढून बालक मजेत बसू शकते; त्यांचा हात धरून वृद्ध स्त्री सन्मानाने त्यांच्याबरोबर चालू शकते, मुली त्यांच्या सान्निध्यात मोठ्या भावाचा स्नेह अनुभवू शकतात. कोणतेही प्रचारतंत्र इतर कोणालाच देऊ शकणार नाही अशी प्रतिमा या संपूर्ण सार्वजनिक दृष्यातून त्यांनी संपादन केली आहे. माध्यमे आणि उजव्या विचारसरणीचे भारलेले अनुयायी हे मान्य करोत किंवा नकोत, आज राहुल गांधी एक लक्षणीय व्यक्तिमत्व बनले आहेत, भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक नेत्रदीपक दर्शन. यात्रेचा सौंदर्यानुभव, दृश्यमानता, मोहकता आणि द्वेषरहित वातावरणामुळे यात्रेने कमावलेले नैतिक भांडवल अधिक गहिरे झाले आहे.
विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी यांना मोठ्या संख्येने यात्रेमध्ये सहभागी होताना मी पाहिले आहे. यात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय, पूर्वी काँग्रेससोबत जाण्यास विरोध करणारे नागरी समाजाचे कार्यकर्ते आणि लेखक, कलाकार, गायक, चित्रपट निर्माते अभूतपूर्व उत्साहाने यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेने सामाजिक निधीही संपादन केला आहे. याचा सर्वाधिक लक्षणीय परिणाम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. वर्षानुवर्षे त्यांच्याकडून राष्ट्रीय नेतृत्वाशी संवादाच्या संधीची मागणी होत होती. काँग्रेस पक्षातील दिग्गजांशी खांद्याला खांदा भिडवताना ते दिसत आहेत. त्यांचे मनोबल कधी नव्हे इतके उंचावले आहे. या सगळ्यामुळे काही राजकीय बळही निर्माण झाले आहे. यात्रेने कमावलेली नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय समृद्धी म्हणजे भारतीय राजकीय क्षेत्र अनुभवत असलेल्या महा परिवर्तनाची नांदी आहे.
हे परिवर्तन ‘पक्षीय’ नाही…
राहुल गांधी संपूर्ण यात्रेदरम्यान प्रांजळ आणि स्पष्टवक्ता राहिले आहेत. राज्यातील आगामी निवडणुकांशी यात्रेचा काहीही संबंध नाही, हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यांनी त्याचे वर्णन सातत्याने ‘तपस्या’, आत्मनिरीक्षण आणि आत्मशोधासाठीची परिक्रमा असे केले आहे. भारताला जवळून जाणून घेण्यासाठीचा प्रवास असेही त्याचे वर्णन त्यांनी केले आहे. यात्रेतील त्यांचे साथीदारही राजकारणावर भाष्य न करता राजकारणाला वेगळ्या उंचीवर नेण्याविषयी बोलत आहेत. एकत्रितपणे आकारत ते एका नव्या राजकीय परिभाषेला साकार करत आहेत. भारताची फाळणी आणि पाकिस्तानच्या जन्माचा सातत्याने निर्देश करणारी वक्रोक्तीपुर्ण, फुटीरतावादी वक्तव्ये आणि जातीयवादात गुरफटलेल्या पक्षीय राजकारणाच्या भाषेपासून ते खूप दूर आहेत. यातील चर्चा- व्याख्यानांमध्ये प्रेम, चिंता, करुणा आणि निरागसता आणि आत्म-शोधाची रूपके जागोजागी आढळतात. काही आठवड्यानंतर ही यात्रा संपेल. प्रसारमाध्यमांनी यात्रेला तिचे पूर्ण श्रेय जर का दिले तर ते एक आश्चर्यच असेल. तथापि, त्यात सहभागी झालेले, त्याचे समर्थन करणारे, त्यात सहभागी झालेल्या कुणाशीही संवाद साधणारे, सारेच, राजकारण आणि सार्वजनिक जीवनाबद्दल वेगळ्याच उच्चारशैलीत, मतभेद, तिरस्कार आणि द्वेष यांपासून कोसो दूर असलेल्या उच्चारशैलीत बोलू लागतील. नव्या मतप्रवाहाचे वातावरण निर्माण झाले असेल, लोकशाही आणि भारताची संघराज्य रचना आणि विविधता जिवंत ठेवण्यात नवीन स्वारस्य निर्माण झाले असेल. या यात्रेने भारताच्या राजकीय जीवनात एक नवीन पान उघडले आहे, असे मी अगदी नि:संशयपणे म्हणतोय, असे पान जे स्वातंत्र्यलढ्याची कहाणी पुढे चालू ठेवेल आणि आगामी काळात ती अपेक्षित पूर्णत्वास नेईल.
मोहनदास करमचंद गांधींनी तो परिणाम एकदा साधला होता. त्याची पुनरावृत्ती अतिशय आगळ्या स्वरूपात जगाच्या दृष्टिसमोर उलगडत असण्याचा हा कालखंड आहे.
लेखक वाङमयीन समीक्षक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत.
मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares