सत्ताधाऱ्यांना मदतीबाबत जाब विचारा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शिरूर, ता. २९ : ‘‘अवकाळी पावसाने बळीराजाची दाणादाण उडवल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी फिरत असताना आता सत्ताधारीही बांधावर येतील. पण, ते नुसते मोकळ्या हाताने पाहणी करायला आले; तर त्यांना बांधावर फिरू देऊ नका, मदतीबाबत जाब विचारा,’’ असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
वाघाळे (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांशी बैठकीच्या निमित्ताने ठाकरे यांनी थेट रस्त्यावरच बसकण मारली. या परिसरातील दोनशे ते तीनशे हेक्टर शेतशिवारात अद्याप पाणी आहे. या चिखलात सत्ताधाऱ्यांना घेऊन जायला हवे, असे सांगताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जरूर या भागात यावे. आता आम्ही येऊन गेल्याचे कळल्यावर ते येतीलच. पण, येत असतानाच त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश घेऊन यावेत. बांधावर मोकळे जाऊन उपयोग नाही. सत्ताधारी आले की, शेतकरी विचारतीलच द्यायला काय आणले आहे ते. म्हणून त्यांनी नुसते बघायला येऊन नये. हे काही पर्यटन नाही, हे देखील ध्यानात घ्यावे, असेही ते म्हणाले.
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या तीन महिन्यात नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता आणखी वाट पाहणार आहात का? प्रत्येकवेळी विरोधी पक्षाने आंदोलन करणे, सरकारला धारेवर धरणे गरजेचे आहे का? सभा घेऊनच या गोष्टी सांगितल्या पाहिजे का? प्रशासन, शासन म्हणून संवेदनशील होऊन या मूलभूत मागण्यांबाबत तातडीने मदत पोचेल हे का बघत नाही, असे सवाल ठाकरे यांनी राज्य सरकारला केले. निवडणूका असल्या की सर्वजण बांधावर येतात. आज मदतीची गरज आहे तेव्हाही आले पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
पन्नास खोक्यातून आमदारांचा दुष्काळ हटला असेल. पण सामान्यांचे, शेतकऱ्यांचे काय. आम्ही पोटतिडकीने हेच सरकारला विचारतोय पण दखल घेतली जात नाही. मजामस्ती, राजकारण बाजूला ठेवून आता कृषिमंत्र्यांनी गंभीर व्हावे. ते जिथे जातील तिथे गमती करतात. जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीविषयी, शेतकरी मदतीविषयी विचारण्याऐवजी भलतेच विचारतात. ते कृषिमंत्री नसून स्वखुशीमंत्री झालेले दिसतात.
– आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares