मैदानात लढा: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली आ. गडाख मैदानात – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे नेवासा तालुक्यातील कपाशी, सोयाबीन, कांदा, तूर, ऊस, मका यासह सर्वच पिकांचे नुकसान झालेले असून यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे महसूल व कृषी यंत्रणेने सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे व गडाख एकत्र आले आहेत. दोहोंनीही बेलपिंपळगाव येथे ही घोषणा केली.
अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊन देखील पीक विमा कंपन्यांकडून अवघे पाचशे ते हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांची क्रूर चेष्टा विमा कंपन्यांकडून सुरू आहे. पंचनामे झालेल्या व होणाऱ्या सर्वच पिकांचे शेतकऱ्यांना तातडीने भरीव अनुदान द्यावे, विमा कंपन्यांनीही नुकसान झालेल्या पिकांना सरसकट भरीव विमा अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन आंदोलन करू, असे आमदार गडाख म्हणाले.
बांधकाम कामगारांसाठी असलेल्या मध्यान भोजन योजनेचा शुभारंभ आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते शनिवारी बेलपिंपळगाव येथे करण्यात आला. बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेली मध्यान भोजन योजना राबविण्यासाठी सहकार्य करू व योग्य पद्धतीने राबवू, असा आशावाद आमदार गडाख यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी मुरकुटे म्हणाले, आमदार गडाख व मी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, शेतकऱ्यांची थट्टा करू नये. बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान भोजन योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुरकुटे यांनी केले. याप्रसंगी प्रा. कार्लस साठे यांनी बेलपिंपळगाव व परिसरातील विविध रस्ता कामे मार्गी लावून शेतकऱ्यांची व नागरिकांची गैरसोय दूर केली, याबद्दल आमदार शंकरराव गडाख यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश छल्लारे यांनी केले. याप्रसंगी पुंजाराम पटारे, सकाहरी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दिगंबर शिंदे, वसंत रोटे, चंद्रशेखर गटकळ, कृष्णा शिंदे, अमोल कोकणे, बाळासाहेब तऱ्हाळ, बाबासाहेब भांड, बाळासाहेब शेरकर, बाळासाहेब शिंदे, वसंत शेरकर, किशोर गारुळे, भीमजी साठे, सुभाष सरोदे, बंडू चौगुले, कुंडलिक सरोदे, किरण साठे, आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी नेहमी आग्रही व प्रयत्नशील
शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी मी नेहमी आग्रही व प्रयत्नशील आहे. यापुढील काळात नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जर शासनाने मदत केली नाही, तर पुढील काळात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू, असे आमदार शंकरराव गडाख यांनी म्हणताच शेतकऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares