शिरोळ तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
59146
फोटो ओळ-
शिरोळ : शहरात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला
………

शिरोळसह १० गावांत कडकडीत बंद
आंदोलन अंकुश : शिरोळ तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद
शिरोळ, ता. २९ ः आंदोलन अंकुश संघटनेने ऊस दराच्या व शुक्रवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुकारलेल्या शिरोळ तालुका बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिरोळ, दानोळी, अर्जुनवाड, उदगाव, यड्राव यांसह १० गावात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकरी, व्यापारी व नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. जयसिंगपूर, कुरुंदवाड, नृसिंहवाडी आदी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला नाही. उर्वरित ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
शनिवारी सकाळी आठपासून शिरटी फाट्यावर ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र आले होते. साखर कारखानदारांनी ३ हजार रुपयांपेक्षा अधिक दर जाहीर करावा, मागील हिशेब द्यावा, ही मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे. ऊसदरासाठी संघटनेने गेली आठ दिवस तालुका व परिसरातील कारखानदारांविरोधात संयमाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ऊस दराच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून कारखानदारांनी ऊसतोड सुरू केली होती. यामुळे ‘आंदोलन अंकुश’ ने आक्रमक ऊस वाहतूक रोखली होती. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून ऊस वाहतूक सुरू केली. या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुका बंदची हाक ‘आंदोलन अंकुश’ने दिली होती.

या पार्श्वभूमीवर शिरोळ-वाडी रोडवरील शिरटी फाटा येथे उपस्थित शेतकऱ्यांनी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळालाच पाहिजे’ अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
………..
रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवणार : चुडमुंगे
‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, की साखर कारखानदारांनी पोलिसांना हाताशी धरून आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवणार आहोत. साखर कारखानदारांच्याबरोबर चर्चेची तयारी आमची असून ऊस दराबाबत योग्य तोडगा निघावा, अशी आमची अपेक्षा आहे. गेल्या हंगामातील गाळप झालेल्या उसाचा, कारखान्यांनी हिशेब द्यावा. तसेच या वर्षी गाळप होणाऱ्या उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही आमची भूमिका आहे. यासाठीच आंदोलन अंकुशने हा लढा सुरू ठेवला असून शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी, ऊसदराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत ऊसतोडी घेऊ नयेत.
……..
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares