सरकारवर भरोसा नाय; आदित्य ठाकरे – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मुंबई : घटनाबाह्य राज्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नसून हे सरकार अस्थिर असल्याने राज्यातून उद्योग बाहेर जात असल्याचा हल्लाबोल ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चढविला आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे त्याच्या गद्दारीमुळे महाराष्ट्राला फटका बसत असल्याचे शरसंधानही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधले. इतर राज्यातील मुख्यमंत्री आपल्या राज्यात उद्योगाच्या संधी शोधण्यासाठी येत असताना आपले मुख्यमंत्री मात्र इतरत्र मंडळांत फिरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
‘एअरबस’चा प्रकल्पही गुजरातमध्ये गेल्याने आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि उद्योग मंत्र्यांवर सडकून टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘ एका बाजूला शेतकरी संकटात असताना उद्योग जगतात देखील आपल्याला धक्के बसत आहेत. वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क सारखे मोठे प्रकल्प बाहेर गेले असताना आता ‘टाटा एअरबस’ सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. उद्योगमंत्री यांनी एक मुलाखतीत सांगितले होते की ‘मिहान’सोबत एअरबस प्रकल्प नागपूरला येणार. त्यांनी चुकीची माहिती का दिली? चार मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
शेतकऱ्यांसोबत उभे राहायला हवे : आदित्य
मी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर आम्ही सर्वांनी नाशिक, पुणे दौरा केला. शेतकऱ्यांची भेट घेतली, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही अधिवेशनात पायऱ्यांवर आंदोलन करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली. मात्र सरकारने ऐकले नाही. अजूनही शेतात पाणी आहे. कुठलाही मंत्री शेतात गेलेला नाही. आताच्या घडीला शेतकऱ्यांसोबत उभे राहायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
असेही दावे- प्रतिदावे
उद्योगमंत्री सामंत यांनी ठाण्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या प्रकल्पांची यादी दिली आहे. त्यात पहिला प्रकल्प आहे हा मे. सिनारमस पल्प अँड पेपर प्रा. लिमिटेड या कंपनीचा असून ही कंपनी रायगडमध्ये प्रकल्प उभारणार आहे. ही कंपनी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असे सामंत म्हणाले. परंतु या कंपनीसोबत २३ मे २०२२ रोजी आदित्य ठाकरे आणि मी दाओसमध्ये सामंजस्य करार केला होता, असे माजी मंत्री सुभाष देसाई म्हणाले. सध्याचे उद्योगमंत्री खोटे बोलत असून ते आमच्या सरकारने केलेल्या कामांचे श्रेय घेत असल्याचे देसाई यांनी नमूद केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares