झाडे तोडली, मुहूर्ताकडे लक्ष – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
झाडे तोडली, मुहूर्ताकडे लक्ष!
संकेश्‍वर-बांदा महामार्ग; तूर्त खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने समाधान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : बहुचर्चित संकेश्‍वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी संकेश्‍वर ते आंबोली या ९५ किलोमीटरमधील १२०० झाडे तोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, प्रत्यक्ष हायवेचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार, अशी सुरू असलेली चर्चा हवेतच असून आता हायवेच्या मुहूर्ताकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्याला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची चर्चा अनेक वर्षापासून सुरू होती. अखेर गतवर्षीच्या अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. त्याची निविदा प्रसिद्ध करून राजस्थानची कंपनीही निश्‍चित झाली आहे. रस्त्याचा सर्व्हेसुद्धा पूर्ण झाला आहे. त्यानुसार रस्त्याच्या आडवे येणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात आली. हायवेचा पत्ता नसताना आधी झाडांवर कुऱ्हाड चालवल्याने पर्यावरण प्रेमींतून नाराजी व्यक्त झाली. संकेश्‍वरपासून आंबोलीपर्यंतच्या अंतरात १२०० हून अधिक झाडे तोडण्याचे नियोजन केले आहे. हे काम अंतिम टप्प्यातही आहे. मात्र हायवेचे काम कधी सुरु होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हायवे होणार म्हणून अस्तित्वातील रस्त्याच्या डागडुजीकडेही दुर्लक्ष झाले होते. परिणामी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक छोटे मोठे अपघातही होत राहिले. पावसाळ्यात तर वाहनधारकांची मोठी कसरत झाली. समाज माध्यम आणि जनमाणसातून नाराजीची प्रतिक्रिया सुरू झाल्याने पाऊस थांबल्यानंतर आता डांबरीकरणाने खड्डे मुजविले जात आहेत. यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. एकीकडे रस्त्याची डागडुजी आणि दुसऱ्या बाजूला हायवेच्या कामाची प्रतीक्षा अशामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. संकेश्‍वरपासून आजऱ्यापर्यंत भूसंपादन नसल्याचे सांगण्यात येते. परंतु याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांत अजूनही चिंतेचे वातावरण आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली काही घरे मात्र बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजरा ते आंबोलीपर्यंतची नागमोडी वळणे काढून रस्ता सरळ करण्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्‍न सध्या गाजत आहे.
—————
चौकट…
भरपाईचा खुलासा हवा
रस्त्यासाठी बाधित होणारे शेतकरी व नागरिक अजूनही भूसंपादन व घरांच्या बदलत्यातील भरपाईबाबत संभ्रमात आहेत. बाधित क्षेत्रासाठी दहापट मोबदलण्याची मागणी महामार्ग बाधित शेतकरी संघटनेने केली आहे. त्यासाठी संघटनेकडून विविध माध्यमातून आंदोलन, जनजागृती सुरु करण्यात आली आहे. प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन भरपाई व त्यांच्या अन्य प्रश्‍नासंदर्भात खुलासा करण्याची गरज आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares