धान्य वितरण व्यवस्था कोलमडली – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
59532
मडुरा ः सर्व्हर डाऊन व नेटवर्क समस्यांमुळे रास्त धान्य दुकानात ग्राहकांची झालेली गर्दी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

धान्य वितरण व्यवस्था कोलमडली
बांद्यात सर्व्हर डाऊन; ऐन दिवाळीत शेकडो ग्राहक धान्यापासून वंचित
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ ः मडुरा, रोणापाल, पाडलोस गावांसाठी असलेल्या मडुरा रास्त दराच्या धान्य दुकानात ई-पॉस मशिनचा सर्व्हर अनेक दिवसांपासून डाऊन असल्यामुळे धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. याचा मोठा फटका तीन गावांतील शेकडो रेशनकार्डधारकांना बसला. महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वस्त धान्य न मिळाल्याने लाभार्थी दिवाळीमध्ये धान्यापासून वंचित राहिले आहेत. दररोज ग्राहक दुकानात चकरा घालून खाली हाताने परत जात आहेत. मडुरा स्वस्त धान्य दुकानात सोमवारी दुपारपर्यंत ४५ टक्के कार्डधारकांना धान्य वितरित करण्यात आले तर ५५ टक्के कार्डधारक वंचित राहिले.
मडुऱ्यात स्वस्त धान्याचे वितरण करण्यासाठी असलेली बायोमेट्रीक प्रणाली आठ दिवसांपासून कोलमडली आहे. परिणामी, रेशनकार्डधारकांना धान्य मिळत नसून, स्वस्त धान्य दुकानांसमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित करण्यात येणारे स्वस्त धान्य विकत घेण्यासाठी ई-पॉस मशिनवर नोंदणी करावी लागते. आधारकार्डच्या आधारे बायोमेट्रीक प्रणाली पूर्ण झाल्याशिवाय धान्य मिळत नाहीत; पण, मागील आठ दिवसांपासून बायोमेट्रीक प्रणालीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन वितरण कोलमडले आहे. धान्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह सर्वसामान्यांना तासनतास दुकानाच्या समोर थांबावे लागले. काहींच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यात यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे धान्य पुरवठा ठप्प झाला आहे. जिल्हाभरात अशीच परिस्थिती आहे. याबाबत स्थानिक स्तरावरुन पुरवठा विभागाकडे वाढत्या तक्रारी आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन समस्या राज्यातच सुरू असल्याचे कारण पुढे करण्यात येते. ग्रामीण भागातील ग्राहकांना तर विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चार-पाच किलोमीटर पायपीट करुन संपूर्ण दिवसभर धान्य दुकानावर हेलपाटे मारावे लागत आहेत. मुळात धान्य प्रत्येक महिन्याच्या १५ तारीख नंतरच दुकानात येत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून धान्य दुकानांना मुदतवाढ मिळण्याबाबतच्या सूचना मिळणे गरजेचे आहे. तरच ग्राहकांमधील संभ्रमावस्था दूर होईल. दरम्यान, रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधून धान्य मुदतवाढ करून द्यावी अशी मागणी केली. तसा वरिष्ठस्तरावर आपला प्रयत्न असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
—————–
कोट
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ज्या कार्डधारकांना धान्य मिळाले नाही, त्यांना पुढील नोव्हेंबर महिन्यात धान्य मिळणार आहे. सर्व्हर समस्येमुळे कुणीही धान्यपासून वंचित राहणार नाही.
– संतोष परब, चेअरमन, मडुरा विकास सोसायटी
—————-
कोट
राज्यात सर्व जिल्ह्यात सर्व्हरची समस्या आहे. शासनाकडून निश्चितपणे धान्य पुरवठा करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करू नये.
– श्रीधर पाटील, तहसीलदार
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares