विश्लेषण : दिल्लीचा श्वास यंदाही कोंडणार? : – Loksatta

Written by

Loksatta

दत्ता जाधव
पंजाब, हरियाणात भाताचे पाचट जाळले जात असल्यामुळे दिल्ली आणि परिसरांतील लोकांचा श्वास कोंडला जातो आहे. सातत्याने ही समस्या का निर्माण होते, शेतकरी का पाचट जाळतात, याविषयी..
भाताचे पाचट का जाळतात?
पंजाब आणि हरियाणामध्ये खरीप हंगामातील भाताची काढणी सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरू झाली आहे. ही काढणी यंत्राद्वारे केली जाते. यंत्राद्वारे काढणी करताना तांदळाच्या लोंबीसह वरून खालीपर्यंतचा दीड-दोन फूट पिकाची कापणी यंत्राद्वारे होते. त्याखाली राहिलेल्या भात पिकांच्या अवशेषाला पाचट म्हटले जाते. मळणी होऊन उरलेले हे पाचट रब्बी हंगामाची तयारी करताना जाळले जाते. या ‘भाजणी’ने शेतजमीन लगेच रिकामी होते. तण आणि तणांच्या बियाही जाळल्या जातात. शिवाय काही शेतकरी जमीन भाजल्यामुळे पुढील पीक चांगले येते, असेही सांगतात. 
पाचट जाळल्याचा दिल्लीवर काय परिणाम होतो?
दिल्लीच्या सीमेनजीक असलेल्या पंजाब, हरियाणातील जिल्ह्यांत भाताचे पाचट जाळल्यामुळे निर्माण होणारा प्रचंड धूर वाऱ्यासोबत दिल्ली आणि दिल्ली परिसरावर जमा होतो. थंडीत वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे हा धूर दिल्ली आणि परिसरातून निघून जात नाही. दिल्लीतील हवा प्रदूषित होते. दाट धुके आणि धुरक्यामुळे दिल्लीत दृश्यमानता कमी होते. वाहनांचे अपघात होतात. ज्येष्ठांना श्वास घेण्यास त्रास होतो. एकंदर दिल्लीकरांचा श्वास कोंडला जातो. राजधानी दिल्लीत अक्षरश: आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते.
आताची समस्या काय?
पंजाब प्रदूषण नियंत्रण विभागाची ताजी आकडेवारी असे सांगते, की या वर्षी १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान भाताच्या पाचटांना आगी लावण्याच्या एकूण ६५० घटनांची नोंद झाली. मागील वर्षी याच कालावधीत या घटना ३२० इतक्या नोंदविल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटना दुप्पट झाल्या आहेत. अमृतसर जिल्ह्यात ४१९ घटना, तर तरण तारणमध्ये १०९ प्रकरणे आहेत. हरियाणातही शेतात आग लागण्याच्या ४८ घटनांची नोंद झाली आहे, तर हरियाणात गेल्या वर्षी ही संख्या २४ होती. कमी दिवसांत भाताचे पीक येणाऱ्या वाणांची काढणी झाल्यानंतर लावण्यात आलेल्या या आगीच्या घटना आहेत. प्रचलित वाणांच्या काढणीनंतर या घटनांत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येत्या नोव्हेंबरात काय होणार?
साधारण १५ ऑक्टोबरनंतर भाताच्या काढणीत वेगाने वाढ होते. शिवाय रब्बी हंगामासाठी शेतजमिनी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी दिल्लीतील प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. पण, या दोन राज्यांत पाचट जाळल्यामुळे दिल्लीत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हवेची गुणवत्ता खराब झाली होती. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकािस्टग अँड रीसर्च (एसएएफएआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी ४ ते १३ नोव्हेंबरदरम्यानच्या दिल्लीची हवा विषारी होण्यामध्ये पाचट जाळण्याचा वाटा ४८ टक्क्यांपर्यंत होता. यंदा ऑक्टोबरच्या मध्यापासूनच धूर निघू लागला आहे. त्यामुळे दिल्लीकरांच्या काळजीत भर पडली आहे.
आजवर काय उपाययोजना झाल्या?
दरवर्षी या समस्येमुळे दिल्लीकर हैराण होत असल्यामुळे केंद्र सरकारने, बाधित राज्यांच्या सहकार्याने भाताचे पाचट जाळणे थांबविण्यासाठी विविध उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१९ मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या प्रति एकर पंचवीस हजार रुपयांच्या एकरकमी रोख भरपाईचा समावेश आहे. परंतु, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुरेशी आर्थिक तरतूद न केल्यामुळे हा प्रयत्न टिकला नाही. भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) विकसित केलेल्या जैविक विघटक (बायो-डीकम्पोझर) सारखे काही उपाय ‘गेम चेंजर्स’ म्हणून मांडले गेले. मात्र, पंजाबमध्ये झालेल्या चाचण्यांमधून सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळे उत्साह ओसरला. कारण या विघटकामुळे शेतातील भाताचे पाचट पूर्णपणे खतामध्ये परिवर्तित होण्यासाठी सुमारे ३० दिवसांचा कालावधी लागला. यात रब्बीचे पूर्ण नियोजन कोलमडून पडण्याची शक्यता असल्यामुळे हा पर्यायही फारसा उपयोगी ठरला नाही.
केंद्र-पंजाब-दिल्ली सरकारचा प्रयत्न फसला?
पंजाबमध्ये दरवर्षी जवळपास वीस टन भाताचे पाचट तयार होते, जे शेतकरी जाळून टाकतात. दिल्लीत होणारे प्रदूषण जीवन-मरणाचा प्रश्न बनल्यानंतर दिल्ली सरकारनेही शेतकऱ्यांना पाचट जाळण्यापासून परावृत्त करण्यासाठी केंद्र आणि पंजाब सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रति एकर पंचवीस हजार रुपये मदतनिधी देण्याचे घोषित केले. त्यात केंद्राचा वाटा पन्नास टक्के आणि दोन्ही राज्ये प्रत्येकी पंचवीस टक्के वाटा उचलणार होते. पण, या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. पाचट जाळू नये, यासाठी आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आता मागे पडला आहे.
व्यवहार्य आणि संशोधनात्मक उपाय काय?
भाताचे पाचट जाळू नये, यासाठी आर्थिक मदत देणे, हा सध्या तरी व्यवहार्य पर्याय दिसत नाही. पंजाब आणि हरियाणात खरीप हंगामात भात आणि विशेष करून संकरित बासमती तांदूळ मोठय़ा प्रमाणावर उत्पादित केला जातो. या बासमती तांदळाला जगभर मागणी असते. चांगले पैसे मिळतात म्हणून शेतकरी त्याला प्राधान्य देतात. भाताचे क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांनी कडधान्ये, मका आदी पिके घ्यावीत, यासाठी जागृती करणे आवश्यक आहे. भात पिकापासून जितके उत्पादन मिळते, तितकेच उत्पादन अन्य पिकांतून मिळते, हे व्यावहारिक पातळीवर शेतकऱ्यांना पटवून देता आले पाहिजे. भाताच्या पाचटापासून कागद तयार करण्याचे कारखाने सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. पाचटापासून बायो सीएनजी निर्मिती करणेही शक्य आहे. त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. संशोधन होऊन व्यावसायिक पद्धतीने उत्पादन सुरू झाले पाहिजे.
dattatray.jadhav@expressindia.com
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares