शाहूवाडीत २७ सहकारी सेवा संस्थांच्या निवडणूका महिन्याभरात – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शाहूवाडीतील २७ संस्थांच्या
निवडणुका महिनाभरात
शाहूवाडी, ता. ३०ः तालुक्यातील २७ सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. महिनाभरात या निवडणुका होतील, अशी माहिती तालुक्याचे सहायक निबंधक व्ही. जी. जाधव यांनी दिली. ते म्हणाले, ‘तालुक्यात सध्या एकूण २३६ विविध सहकारी संस्था आहेत. त्यापैकी १४२ संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. आता ३१ मार्च २०२१ रोजी मुदत संपलेल्या २७ सेवा संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी संबंधित संस्थांकडून माहिती घेण्यात येत आहे. त्यानंतर महिनाभरात या संस्थांच्या निवडणुका होतील. निवडणुका होणाऱ्या संस्थांमध्ये ‘क’ प्रवर्गाच्या १५, ‘ड’प्रवर्गाच्या १०,‘ब’ प्रवर्गाच्या २ संस्था आहेत.
………..
‘कोथळीतील अवैध दारूविक्री बंद करा’
हळदी ः कोथळी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीमार्फत अनेकवेळा दारूविक्री बंदीबाबत ठराव करूनदेखील गावातील दोन व्यक्ती बेकायदेशीर दारूविक्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून गावातील दारूविक्री पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, कोथळी ग्रामपंचायतमार्फत अनेकवेळा गावसभेत गावातील दारूविक्री बंद करण्याबाबत सर्वानुमते ठराव केले आहेत, तरीही गावात दारूविक्री होत आहे. परिणामी गावात व्यसनाधीनता वाढत आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, माजी उपसरपंच मनोहर कवडे, भरत आमते, नामदेव कांबळे, तानाजी पोवार यांच्या सह्या आहेत. या निवेदनाची प्रत माहितीसाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडेही पाठवली आहे.
……….
01511
बिद्री : शिवसेनेने रास्ता रोको केला.
….
शिवसेनेचा बिद्रीत रास्ता रोको
बिद्री : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बिद्री (ता.कागल) येथे रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाप्रमुख विजय देवणे यावेळी म्हणाले, ‘यंदा पडलेला परतीचा पाऊस हा ढगफुटीसारखा होता. या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी कंगाल झाला आहे. सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.’ यावेळी सहसंपर्कप्रमुख सुरेश चौगले, जिल्हा समन्वयक जयसिंग टिकले, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, अविनाश शिंदे, अशोक पाटील, भिकाजी हळदकर, नागेश आसबे, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
…..
2416
सिद्धनेर्ली : ऊसतोडणी मजुरांना फराळ वाटप करण्यात आले.

सिद्धनेर्लीत ऊसतोडणी मजुरांना फराळ वाटप
सिद्धनेर्लीः येथील समाज विकास केंद्र संचालित स्वामी विवेकानंद अभ्यासिका, निसर्ग व पर्यावरण संघटना यांच्या वतीने ग्रामस्थांकडून फराळ गोळा करून ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २०० कुटुंबांना चिवडा, लाडू, करंजी, चकली असा फराळ व छोट्या मुलांसाठी २०० बिस्कीट पुडे वाटप केले. यावेळी उद्योजक एकनाथ पाटील, उमेश मगदूम, स्वप्नील माने, मधुकर येवलुजे, समर्थ लोहार, सिद्धेश लोहार, समीर कांबळे यांच्यासह स्वामी विवेकानंद अभ्यासिका आणि निसर्ग व पर्यावरण संघटनेचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, राजर्षी शाहू अभ्यासिकेच्या वतीनेही ऊस तोडणी मजुरांना फराळ वाटप केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares