आंदोलन: कांदा भावासाठी लिलाव बंद पाडत शिवसेनेचे तीव्र आंदोलन – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आवक झाली होती. लिलाव सुरू होताच १८०० रुपये क्विंटलच्या सुमारास भाव काढण्यात आला. जिल्ह्यात आणि राज्यात ३५०० ते ३८०० भाव असताना नगरमध्ये १८०० बाजार भावाने लिलाव होत असल्याने शेतकरी संतप्त झाले. शिवसेना नेते संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मात्र लिलाव प्रतिक्विंटल ३२०० च्या आसपास करण्यात आले.
नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत सोमवारी सुमारे ८० हजार गोणी कांद्याची आवक झाली होती. पण लिलावास १८०० रुपये क्विंटलने सुरुवात झाली. इतर बाजार समित्यांत ३५०० ते ३८०० पर्यंत लिलाव सुरू होते. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी सुरू असणारे लिलाव बंद पाडले. काही शेतकऱ्यांनी शिवसेना नेते आणि जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना फोन करून बोलावून घेतले. कार्ले शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कौटुंबिक तेरावा विधी अर्धवट सोडून घटनास्थळी हजर झाले. कार्ले यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शेतकरी, व्यापारी, मार्केट कमिटीचे सचिव अभय भिसे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर सेवक निखिल वारे सर्व शेतकरी यांच्या समोरच चर्चा केली. कांदा वाहतूक करणारे टेम्पोवाले यांना काही अाडते कमिशन देतात.
काही अाडते स्वतःच कांदा कमी भावात घेऊन नंतर व्यापाऱ्यांना विकतात. त्यातून शेतकऱ्यांची लूट होते अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. नगरसेवक निखिल वारे यांनीही यावेळी शेतकऱ्यांची बाजू खरी असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर कमी भावात गेलेला कांदा शेतकरी यांना मान्य नसल्याने त्याची जबाबदारी मार्केट कमिटीने घ्यावी, अाडत्याने स्वतः माल कमी भावाने घेऊ नये, तसेच अाडत्याने कांदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवाल्यांना कमिशन देत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सानप, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी शिवसेनेचे नगर उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट, संदीप जगताप, सचिन सातपुते यांच्यासह सुमारे दोन ते अडीच हजार शेतकरी उपस्थित होते. नगर बाजार समितीने राज्यातील आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमधील चालू लिलाव बाजारभाव शेतकऱ्यांना दिसतील अशी डिजिटल व्यवस्था करावी. म्हणजे व्यापाऱ्यांवर वचक राहील. आंदोलनानंतर भाव ३५०० पर्यंत वाढले, याचा अर्थ लूट होत होती हे दिसून येते, असे संदेश कार्ले यांनी सांगितले.
३२०० रुपयांपर्यंत कांद्याला भाव
सुरुवातीला काही कांदा गोण्या कमी प्रतीच्या असल्याने बाजार भाव कमी निघाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी लिलाव बंद पाडले. आंदोलनामुळे उशिरापर्यंत लिलाव सुरू होते. दिवसभरात ३२०० च्या आसपास लिलाव बाजारभाव राहिला, असे नगर बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares