घोणस अळीच्या दंशाने माणूस मरतो? जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
मंगळवार १ नोव्हेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By संतोष भिसे | Published: September 23, 2022 02:18 PM2022-09-23T14:18:32+5:302022-09-23T14:19:06+5:30
संतोष भिसे

सांगली : नाव घोणस अळी असले म्हणून ती घोणस सापासारखी विषारी अजिबात नाही. समाजमाध्यमांवरुन कोणीतरी अफवेची पुडी सोडली आणि पाहता पाहता तिने महाराष्ट्र व्यापला. एरवी अंड्यातून बाहेर पडून महिना-दीड महिन्यात पतंगात रुपांतर होणारा हा सुरवंट. त्यानंतर शांतपणे जीवनयात्रा संपविणाऱ्या या अळीला समाजमाध्यमांनी भलतेच ग्लॅमर मिळवून दिले आहे. अक्षरश: तिने धुमाकूळ घातलाय.

गेल्या ५०-१०० वर्षांत तिच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. आता मात्र जणू ती शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलीय. तिच्या प्रतिकारासाठी काय करायचे याचे सल्ले देणाऱ्या स्वयंघोषित संशोधकांचा आणि सल्लागारांचा महापूर आला आहे. शास्त्रीय आणि सुयोग्य वैद्यकीय माहिती न घेता सरसकट विषारी रासायनिक औषधे मारा किंवा कीड पडलेले झाड तोडा असे फुटकळ आणि मूर्खपणाचे सल्ले दिले जात आहेत. पण जातीचा शेतकरी तिच्याविषयी जाणून आहे. शेतकऱ्यासाठी घोणस अळी नवीन नाही.  

काय आहे घोणस अळी?

फुलपाखरे आणि पतंग यांच्या अंडी, अळी/सुरवंट, कोष आणि प्रौढ अशा चार जीवनावस्था असतात. अळी किंवा सुरवंटाच्या अवस्थेतून जाताना स्वसंरक्षणासाठी त्यांना निसर्गाशी मिळते जुळते रंग घ्यावे लागतात, किंवा शत्रूच्या त्वचेला दाह, जळजळ होईल असे काटे, केस अंगावर घ्यावे लागतात. सध्या ज्याची चर्चा सुरू आहे, ते स्लग माऊथ प्रजातीच्या पतंगाचे सुरवंट आहेत. त्यांचे भडक रंग हेच आपल्याला सावधानतेचा इशारा देत असतात.

लिंब, चिक्कू, आंबा, गवत, ऊस आदी वनस्पतींवर जीवनचक्र पूर्ण करतात. ते चावत नाहीत, तर त्यांच्या त्वचेवरील उपसून येणाऱ्या केसांना स्पर्श होताच त्वचेवर जळजळ किंवा दाह निर्माण होतो. अळीच्या त्वचेत केस सैल जोडलेले असतात. कोणीतरी स्पर्श करताच लगेच त्याच्या त्वचेत घुसतात. त्यामुळे शरीरावर बारीक लाल पुरळ उठतात. खाज सुरु होते. लाल चट्टे, जळजळ असा त्रास सुरु होतो. अनेकदा शेतकरी अशा प्रसंगी झेंडूचा पाला चुरडून त्याचा रस लावतात, १५-२० मिनिटांत दाह शमतो. आग होणाऱ्या भागावर बर्फाने शेकल्यामुळेही आराम मिळतो असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अळीचा स्पर्श झालेल्या भागावर चिकटपट्टी चिकटवून जोरात खेचल्यानेही त्वचेत रुतलेले केस निघून जातात. अर्थात, ज्यांना दमा असेल, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यांनी जवळच्या रुग्णालयात जाऊन प्रतिबंधात्मक उपचार घेणे इष्ट राहते. औषधेही वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. शेतात काम करताना जागेची नीट पाहणी करून घ्यावी. अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत.
अळीचे नाव घोणस असले, म्हणून ती सापासारखी तीव्र विषारी आहे असे मानायचे कारण नाही. स्वत:च्या संरक्षणासाठी प्रत्येक प्राणी निसर्गत: काहीतरी जुगाड करतो, तोच प्रकार आहे. ही अळी अजिबात विषारी नाही. ती दंशही करत नाही. तिच्या दंशाने माणूस मेल्याचे एकही उदाहरण महाराष्ट्रात नाही. आता अफवा थांबवाव्यात. – अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली.
 
घोणस अळीविषयी घाबरण्याचे कारण अजिबात नाही. तिला स्पर्श होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ती विषारी नाही. तिच्या शरिरावरील केस टोचल्याने दंश झाल्याची भावना होते. तिच्या स्पर्शाने माणूस मरत नाही. – डॉ. मनोज माळी, महात्मा फुले कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares