Wet Drought : ओला दुष्काळप्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचे नियोजन – Agrowon

Written by

नगर : अखिल भारतीय किसान सभेच्या (Akhil Bhartiya Kisan Sabha) महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला सोमवारी (ता. ३१) नगर जिल्ह्यातील अकोले येथे सुरुवात झाली. बुधवार (ता. २) पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, (Dr. Asok Dhawle) केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते आ. जे.पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह ६५ राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रभरातून २३ जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडण्यात आलेले ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
अधिवेशनात सलग तीन दिवस ओला दुष्काळ, शेती संकट व ज्वलंत शेतकरी प्रश्नांवर विचार विनिमय करून शेतकरी आंदोलनाच्या वाटचालीची पुढील दिशा निश्चित करणार आहेत. सकाळी शहरातून शेतकऱ्यांची रॅली काढली. त्यानंतर महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे जाहीर सभा घेण्यात आली. किसान सभेचे नेते डाॅ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, जे. पी. गावित, आ. विनोद निकोले, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख व अर्जुन आडे यांनी संबोधित केले.
केंद्रातील मोदी सरकारही सातत्याने शेतकरीविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे धोरण राबवीत आहे. देशभर यामुळे शेती संकट अधिक तीव्र होत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. एक वर्षभराच्या ऐतिहासिक व विजयी शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले. पण शेतकऱ्यांना कायदेशीर व रास्त आधारभाव, कर्जमाफी, सर्वंकष पीकविमा योजना, वाढीव पेन्शन, सिंचन, वीज, रेशन व अन्नसुरक्षा असे अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत.
दुसरीकडे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व इतर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करणे हे सुद्धा जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर देशाची राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-सामाजिक न्याय यांचे संरक्षण आणि संवर्धन हे आज कळीचे प्रश्न बनले आहेत. किसान सभेच्या अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करून लढ्याची पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
सरकारचा केवळ घोषणा, दिखावेपणा
राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांची तयार झालेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभर ३६ लाख हेक्टर वरील पिके बरबाद झाली आहेत. शेतकऱ्यांना अशा आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या मनात सरकारच्या या दुर्लक्षाच्या विरोधात तीव्र संताप खदखदत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares