आंदोलन: श्रमिक संघटनेचा राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राहुरीतील श्रमिक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांबाबत राहुरी तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चेकऱ्यांच्या वतीने महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, महापूर, वादळ यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेत जमिनी लागवडीलायक राहिलेल्या नाहीत. या सर्व बाबीची दखल घेऊन तत्काळ सरसकट सर्व बाधितांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर उपाययोजना करून दिलासा देणे आवश्यक आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय आतबट्ट्याचा होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला.
सरकारने शेती उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या नाहीत. केंद्र सरकारने संपूर्ण शेतीमालास स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देण्यात येईल, असे वचननाम्यात जाहीर केले. मात्र, अद्याप अंमलबजावणी नाही. शेतमालास किमान आधारभूत किंमत देण्यात यावी. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विनाअट सरसकट प्रतीएकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतीपंपाचे सरसकट वीजबिल माफ करण्यात यावे, शेती वीज पुरवठा थकबाकीमुळे खंडित करण्याची योजना थांबावी, ऊस उत्पादकास एक रक्कमी एफआरपी देऊन मागील वर्षाची एफआरपी अधिक पाचशे रुपये देण्यात यावे, सर्व बँकांना कर्ज वसुलीसाठी तगादा न करण्याचे आदेश देण्यात यावेत, या मागण्या करण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares