पर्यावरणाची जपणूक: काक्रंबा स्मशानभूमीत शेतकरी पुत्राने स्वखर्चातून लावली दोनशे झाडे – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील ओसाड पडलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची निवाऱ्याअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन गावातील एका शेतकरी पुत्राने स्वखर्चातून स्मशानभूमीत तब्बल २०० विविध झाडांची लागवड करून ओसाड पडलेल्या स्मशानभूमीला उजाळा दिला आहे.
तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येच्या काक्रंबा गावातील स्मशानभूमीत अनेक वर्षांपासून विविध समस्यांना ग्रामस्थांना बारा महिने तोंड द्यावे लागत आहे. याकडे मात्र अकार्यक्षम ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी विरोधी मंडळीने पाच वर्षे साधे ढुंकूनही बघितले नाही. मात्र अत्यंसंस्कार वेळी वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन गावातील नंदकुमार हणमंत देवगुंडे या शेतकरी पुत्राने स्वखर्चातून स्मशानभूमीसह गावातील विविध विकास कामे करण्याचा विडा उचलला आहे. यासाठी वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या व ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलेल्या स्मशानभूमीत झाडे लावण्यासाठी प्रथम जे.सी.बी. च्या साहाय्याने खड्डे खोदून त्यामध्ये काळी माती भरून घेतली.
त्यानंतर तब्बल दोनशे विविध प्रकारची झाडे लावली असून या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात ही झाडे जगवणयासाठी या ठिकाणी बोअरवेल घेऊन या झाडाची देखभाल व संगोपन करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना या ठिकाणी नैसर्गिक निवारा तयार होणार आहे. तसेच या ठिकाणी विजेची सोय नसल्याने रात्री वेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना बॅटरीच्या साहाय्याने रस्ता काढत स्मशानभूमीत जावे लागते. त्यामुळे स्मशानभूमीत पथदिवे लावण्याचा निर्धार केला आहे. या कामावरून इतरांनाही प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
▪पाच वर्षांत न झालेली विकासकामे घेतली हाती▪
गेली पाच वर्षात ग्रा.प.ने स्मशानभूमीसह गावातील जी विकास कामे करण्याची गरज होती ती केली नाहीत. त्याकडे सत्ताधारी मंडळीसह विरोधकांनीही डाेळेझाकच केली आहे. त्यामुळेच नंदकुमार देवगुंडे यांनी गेली दोन महिन्यापासून गावच्या विकास कामाचा विडा उचलला आहे. कोणत्याही शहराचा अथवा खेड्याचा विकास हाेत असताना स्मशानभूमीच्या समस्या मात्र कायम दुर्लक्षित राहतात. त्यामुळे लोकसहभागातून होणारा विकास महत्त्वाचा ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares