विश्लेषण: नागपुरात मेट्रो असताना ‘नियो मेट्रो’ची गरज किती? – Loksatta

Written by

Loksatta

-चंद्रशेखर बोबडे
शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागपूरमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे. शहरालगतच्या छोट्या गावांना व शहरांना जोडण्यासाठी रेल्वे रुळावरून धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे गेला आहे. आता शहरात नियो मेट्रो सुरू करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एकाच शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रोच्या विविध पर्यायांचा प्रयोग करणारे कदाचित नागपूर हे देशातील मोजक्या शहरांपैकी एक असावे. मात्र तरीही प्रश्न उरतो तो या सेवांच्या फायदे आणि प्रयोजनांचा. याची खरच गरज आहे का?
काय आहे नियो मेट्रो प्रकल्प? 
नियो मेट्रो ही अत्याधुनिक, किमान ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरण अनुकूल वाहतूक व्यवस्था आहे. नियो मेट्रो विजेवर धावणारी तरीही टायरची चाके असणारी आहे. नियो मेट्रोच्या एका कोचमध्ये साधारणत: १८० ते २५० प्रवासी बसू शकतात. यासाठी लागणारे सर्व साहित्य भारतीय बनावटीचे असावे असा आग्रह केंद्र सरकारने राज्य सरकारकडे धरला आहे. मेट्रो प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा नियो मेट्रोचा खर्च कमी असल्याने त्याला प्राधान्य दिले जात आहे. केंद्र सरकारने २०१९ मध्ये सर्व छोट्या शहरांत नियो मेट्रो प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी नाशिक शहराची निवड केली होती. त्यानंतर पुणे व आता नागपूरमध्ये नियो मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातही ही सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
नागपुरात नियो मेट्रोच्या प्रकल्पाचे स्वरूप काय?
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात ४३ किलोमीटर परिघातील गावे जोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. या दुसऱ्या टप्प्यात कन्हानपासून हिंगण्यापर्यंत आणि बुटीबोरी औद्योगिक वसाहतीपर्यंत मेट्रो नेण्याचे नियोजन आहे. आता या मार्गावर मेट्रोऐवजी नियो मेट्रोचा प्रयोग केला जाणार आहे. सध्या या गावांमधून मोठ्या संख्येने तरुण शिक्षणासाठी शहरात येतात, छोटे शेतकरी त्यांचा शेतमाल शहरात आणतात. त्यांच्यासाठी नियो मेट्रो लाभकारक ठरू शकते.
मग सध्याच्या मेट्रो सेवेचे काय?
नागपूरमध्ये सध्या खापरी व हिंगणा मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. कामठी आणि भंडारा रोडवरील मार्गिकांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर शहराच्या चारही दिशा मेट्रोद्वारे जोडल्या जातील. यामुळे सध्या असलेला सार्वजनिक वाहतुकीवरील भार कमी होणार असून खासगी वाहने वापरणाऱ्यांची संख्या कमी होईल. सध्या नागपूर मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ही पन्नास हजारांपर्यंत पोहोचली आहे. चारही मार्ग सुरू झाल्यावर ती एक लाखापर्यंत जाईल, असा महामेट्रोचा अंदाज आहे. मेट्रो सेवा ही शहरांतर्गत प्रवासासाठी तर नियो मेट्रो ही शहराबाहेरील छोट्या गावांना जोडण्यासाठी असल्याने दोन्हींचे फायदे सारखेच आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार केला तर या दोन्ही सेवा आवश्यक ठरतात.
ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाचे भवितव्य काय असेल?
शहरांतर्गत वाहतुकीसाठी मेट्रो तर शहराला लागून असलेल्या गावांना जोडण्यासाठी नियो मेट्रो प्रकल्पाचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे शहरालगतच्या १०० किलोमीटर परिसरातील छोट्या शहरांसाठी ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. तीनही मेट्रोंचे मार्ग व कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत. १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या छोट्या शहरातून नागपुरात येण्यासाठी जलद गतीने धावणारे साधन सध्या नाही. एस.टी.ला मर्यादा असल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. ब्रॉडगेज मेट्रोमुळे ही समस्या दूर होणार आहे. हा प्रकल्प सध्या केंद्राच्या मान्यतेसाठी थांबलेला आहे.
तीनही मेट्रोतील फरक काय?
शहरांतर्गत वाहतुकीसाठी सुरू केलेली मेट्रो ही तिच्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र मार्गिकेवरून धावते. मार्गिका उभारणीसाठी प्रचंड प्रमाणात खर्च येतो. जमीन अधिग्रहणाची समस्या निर्माण होते व यातून प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागतो. नियो मेट्रोसाठी कॉरिडोर तयार करावा लागतो. तिचा खर्च मेट्रोच्या तुलनेत कमी असतो. ब्रॉडगेज मेट्रो ही रेल्वेच्या रुळावरूनच धावते. त्यासाठी फक्त डबे वेगळे बनवावे लागतात. 
नागपूरकरांचा फायदा काय ?
मुंबई, पुण्यानंतर लोकसंख्येत राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नागपूर शहरात मेट्रो सुरू होण्यापूर्वी फक्त शहर बस हाच एकमेव पर्याय  होता. मोडकळीस आलेल्या शहर बसेसमुळे शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली. त्यातून प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. मेट्रो सुरू झाल्यावर अंशत: का होईना नागरिकांना दिलासा देणारे चित्र निर्माण झाले. नियो असो वा ब्रॅाडगेज मेट्रो यामुळे स्पर्धा वाढणार असून त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares