मेन राजराम दीपक केसरकर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
‘मेन राजाराम’ बंद करणार नाही
पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती; मात्र शेतकरी बझारची जागा लीजवर घेणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३ : भवानी मंडपातील मेन राजाराम हायस्‍कूल कदापीही बंद केले जाणार नाही. मात्र, ही शाळा दुरुस्‍ती करावी, यासाठी सल्‍लामसलत केली जात आहे. शाळेतील मुलांची पटसंख्या कमी असून, ज्युनियर कॉलेजची पटसंख्या मोठी आहे. या मुलांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. ज्युनियर कॉलेजसाठी जागा शोधण्यास सांगितले असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्‍ह्यातील वारकऱ्यांचा पंढरपूर येथे अपघाती मृत्यू झाला. संबंधित वारकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्‍वन करण्यासाठी मंत्री केसरकर कोल्‍हापुरात आले होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयावर भूमिका मांडली.
ते म्‍हणाले, ‘‘महालक्ष्‍मी अंबाबाई मंदिराचा परिसर सुंदर केला जाईल. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना सर्व सुविधा देण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्‍न सुरू आहेत. यासाठी शेतकरी बाजारची जागा लिजवर घेऊन परिसर सुसज्‍ज केला जाणार आहे. या परिसरात आठ सरकारी कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये ऐतिहासिक इमारतीत आहेत. त्यांच्यासाठी एकत्रित पर्यायी व्यवस्‍था केली जाणार असून, या ठिकाणी आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र केले जाईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.’’
.
ठळक चौकट
पालकमंत्री केसरकर यांनी केलेल्या घोषणा
-पुढील वर्षी दसऱ्यासाठी १ कोटी
-जुन्या राजवाडा हेरिटेज पार्क
-छत्रपतींच्या समाधीचा विकास केला जाईल
-शाहू मिल येथे स्‍कील विद्यापीठ स्‍थापण्याचा विचार
-शेंडापार्कला जागा त्याचा विकास करणार
-शेंडा पार्क येथे ३४ हेक्‍टरवर आयटी पार्क
-उच्‍च न्यायालय खडंपीठासाठी जागा देणार
-जिल्‍हा क्रीडा संकुल उभारणार
-जिल्‍हा ग्रंथालय स्‍थापन करणार
-नवीन प्रशासकीय संकुल बांधणार
-वखार महामंडळाच्या जागेवर गोडावन बांधणार
-करवीर पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारत
-प्री एनडीए ॲकॅडमी स्‍थापन करणार
-शहर, जिल्‍ह्यातील १६ तालमींची दुरुस्‍ती
-कॉफी टेबल बुक ‍प्रसिद्ध करणार
-राधानगरीला पर्यटन नगरी बनवणार

चौकट
‘त्या’ प्रकरणात कोणी वेगळा
रंग देऊ नयेः मंत्री केसरकर
शहरातील एका अल्‍पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत आमदार नीतेश राणे यांनी आंदोलन केले. याबाबत विचारले असता मंत्री केसरकर म्‍हणाले, ‘‘अशा प्रकरणात जेव्‍हा काही स्‍टेटमेंट केले जाते तेव्‍हा ते खरं आहे का याची खात्री केली जाते. त्यांनी केलेल्या स्‍टेटमेंटप्रमाणे काही वस्‍तुस्‍थिती आढळून आलेली नाही. सामाजिक सलोखा राखणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात कोणी वेगळा रंग देऊ नये, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.’’

चौकट
मेन राजारामबाबत बंद दाराआड चर्चा
दरम्यान मेन राजाराममध्ये यात्री निवास करण्याबाबत चर्चा सुरू होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्घ झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक संस्‍था, संघटनांनी निवेदने देत आंदोलनाचा इशारा दिला. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री केसरकर यांनी सर्किट हाऊस येथे शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. विभागातील माहिती बाहेर कशी जाते, अशी विचारणाही त्यांनी केली असल्याचे सांगण्यात आले. तसेच शाळेसाठी जागा शोधण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares