LIVE Update: माणिकबाग परिसरात आता वाहतूक कोंडी,वाहतूक संथ गतीने – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सिंहगड रस्ता परिसरातील माणिक बाग येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहेत. वाहतूकअतिशय संथ गतीने पुढे सरकत आहे. पुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे तसेच या ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी एकत्र आले आहेत.
बारामती तालुक्यातील मधील वडगाव निंबाळकर येथून एक तरुण १० महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. काही दिवसानंतर या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मात्र पोलिसांना आरोपी सापडत नव्हता. मात्र आज या आरोपीना पकडण्यात यश आलं आहे. या तरुणाचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. येत्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध ब्रिजभूषण सिंह असा सामना आता रंगू शकतो.
वेदांता प्रकल्प कोणामुळे गेला? अशा आरोप-प्रत्यारोपाला राज्यात उधाण आलं आहे. 'खोटं न बोलता फडणवीसांनी राज्यात गुंतवणूक आणावी' असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
अमिताभ बच्चन यांना आतापर्यंत सामान्य पोलिसांची सुरक्षा देण्यात आली होती. पण आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय
महाराष्ट्र केसरीचा आखाडा कोण भरवणार यावरूनच आता कुस्ती संघटनांमध्ये वादाचा फड रंगला असल्याचे दिसून येत आहे. यंदा पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यादरम्यान शरद पवार अध्यक्ष असलेली पण बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवणार असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. अवैध उत्खनन प्रकरणात हेमंत सोरेन यांना हे समन्स ईडीने पाठवलं आहे. सोरेने यांना उद्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरात बेकायदेशीरपणे बिल्डिंगच्या टेरेसवर रुफ टॉप पद्धतीने तब्बल ८२ हॉटेल्स चालवली जातात. काही ठिकाणी तर कारवाई झाल्या नंतर सुद्धा हॉटेल पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. अश्या हॉटेलमध्ये आगीच्या घटना घडल्यानंतर पालिकेने सर्व हॉटेल्स याना नोटिस पाठवल्या होत्या मात्र त्या नंतरही हॉटेल्स सुरु ठेवणाऱ्या फक्त ३९ हॉटेल्स वर पालिकेने कारवाई केली आहे. काल पुण्यातील लुल्ला नगर भागात अशाच एका हॉटेल मध्ये भीषण आग लागली होती. सुदैवाने या मध्ये जीवितहानी झाली नाही मात्र आगीच्या घटना शहरात वारंवार घडत आहेत. यामुळे अशा इमारतींना मोठा धोका आहे
कोल्हापुरात लव्ह जिहादचा प्रकार घडली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापुरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. प्रकरणात दिरंगाई होत असल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नीलेश राणे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.
रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण होत असल्यामुळे भिडे पुल ते म्हात्रे पुल (मेहेंदळे गॅरेज चौक) हा नदी पात्रातील रस्ता ८-१० दिवस राहणार बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिका ते मेहेंदळे गॅरेज असा हा नदीपत्रातील रस्ता अनेकांसाठी सोयीचा असल्याने हजारो दुचाकीस्वार याच रस्त्याचा वापर करत असतात. मेहेंदळे गॅरेज जवळील असलेला रस्ता राजपूत वस्ती असल्यामुळे अरुंद होता यामुळे संध्याकाळी इथे मोठी वाहतूक कोंडी होत होती. रजपूत वस्ती मध्ये सध्या सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण होताच डांबरीकरण आणि रस्त्यायचे रुंदीकरण केले जाईल. यामुळे हा रस्ता पुढील ८ ते १० दिवस बंद राहील, अशी माहिती वी.जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख यांनी दिली
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पुण्यात लेटरवॉर सुरुच असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी बीआरटी मार्ग बंद करा असं पत्र पालिकेला दिले होतं. या पत्राला पीएमपीएमएने विरोध केला आहे. प्रवाशांना जलद वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेले कोणतेही बीआरटी मार्ग बंद करू नयेत, अशी मागणी पीएमपीएमएल ने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.बीआरटी मार्ग बंद करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी महापालिकेस पत्र दिल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बीआरटी मार्ग खाजगी वाहनांसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, महापालिकेने पीएमपी प्रशासनास पत्राद्वारे बीआरटी मार्ग बंद करण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर हे मार्ग बंद करू नये, असे पत्र पीएमपीकडून आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. मार्ग बंद करण्याऐवजी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एसटी बस, स्कूल बस, रुग्णवाहिका, अग्निशमक वाहनांना मार्गातून मुभा देण्यास हरकत नसल्याचे पत्रात म्हटले आहे
तांत्रिक बिघाडामुळे लोकल रखडली,
पनवेल स्टेशनवर तुफान गर्दी
ऐन सकाळी चाकरमान्यांचे हाल, स्टेशनवर लोकांची उडाली झुंबड
काल पुण्यात शिवशाही बसला आग लागली. चालकाच्या प्रसंगवधानांमुळे जीवितहानी टळली. त्याचप्रमाणे आजही नाशिकमध्ये शिवशाहीने पेट घेतला. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
बॉलिवूड अभिनेत्री पूजा भटही काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. सध्या ही यात्रा तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे पोहोचली असून तेथे पूजा भटही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत सामील झाल्या आहेत.
बाजारात आवक वाढल्यामूळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. टोमॅटो 80 रुपयांवरुन दर 25 ते 30 रुपयांवर घसरला आहे. राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दादरमध्ये झालेल्या या एलपीजी सिलेंडर स्फोटामध्ये तीन जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींवर जवळील सायन रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये निर्वाह भत्ता चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे. सारथी आढावा बैठकीत निर्णय घेतला. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. शिक्षण पूर्ण करता यावे. त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी निर्वाह भत्ता दिला जातो. आता त्याच निकषानुसार मराठा समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक निर्वाह भत्ता दिला जाणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares