कणकवलीत तीन वर्षांत ५७२ सिंचन विहिरी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
60281
सिंचन विहिरीचा लाभ भेटलेला एक लाभार्थी.

कणकवलीत तीन वर्षांत ५७२ सिंचन विहिरी
नव्या लाभार्थींचा शोध; रोजगार हमीतून ३ लाखाचे अनुदान
तुषार सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ४ ः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर प्रकल्प सुरू केला असून यासाठी लाभार्थींचा पुन्हा एकदा शोध सुरू झाला आहे. कणकवलीत तीन वर्षांमध्ये ५७२ सिंचन विहिरींचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे सलग ६० गुंठे जागा असेल अशा शेतकऱ्याला या सिंचन विहिरीचा लाभ घेता येणार आहे.
शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, म्हणून राज्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतविहीर प्रकल्प सुरू केला आहे. मागील तीन वर्षांमध्ये या विहिरी प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यामध्ये ६३ ग्रामपंचायती अंतर्गत आतापर्यंत ५७२ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. चालु आर्थिक वर्षांमध्ये ७० पैकी २८ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यापूर्वीच्या प्रकल्पापैकी ३३ सिंचन विहिरींची कामे प्रगतीवर आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर प्रस्ताव थेट ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे पाठवल्यानंतर गटविकास अधिकारी अशा प्रस्तावना मंजुरी देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे किमान ६० टक्के सलग क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्याला सातबारा आणि आठचा उतारा सादर करून सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार करायचा आहे. यासाठी ग्रामसभेचा ठराव महत्त्वाचा आहे. विहिरीसाठी तांत्रिक पाठबळ शासनस्तरावरून पुरवले जाते. भूजल सर्वेक्षण आणि लघुपाटबंधारे विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागते. वैयक्तिक लाभाच्या शेतविहिरीसाठी शासनाकडून तीन लाखाचे अनुदान दिले जाते. यामध्ये ४० टक्के रक्कम ही मजुरीवर खर्च करावी लागते तर ६० टक्के रक्कम ही साहित्यासाठी खर्च करावी लागते. गावातील मजूरांची नोंदणी ग्रामपंचायतीकडे असावी आणि जॉब कार्ड असावे. अशा शेतकऱ्यांना रोजगाराच्या हमीचा हा प्रकल्प आहे. वैयक्तिक लाभाची ही सिंचन विहीर ४ मीटर रुंद आणि ४० फूट खोल बांधता येते. यासाठी जांभ्या दगडाचा वापर करावा लागतो. सिमेंट काँक्रीटची विहिरीला मान्यता दिली जात नाही. ग्रामसभेने तयार केलेल्या आराखड्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली मागणी करणे अनिवार्य आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतरच सिंचन विहिरीचा प्रकल्प पंचायत समिती स्तरावर मंजूर केला जात आहे. ग्रामपंचायतस्तरावर सध्या लाभार्थींचा शोध सुरू झाला आहे. मागील २०१८ पासून या सिंचन विहिरीमध्ये अनेक अडचणी आल्या. त्या दूर करण्यासाठी शासनाने वेगवेगळे प्रयत्न करून आता नव्याने शेत विहिरीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार त्या गावात सिंचन विहिरीला मंजुरी दिली जात आहे.
———
अनेकांना एकत्रित संधी
ज्या शेतकऱ्यांचे ६० गुंठे जमीनक्षेत्र एकत्रित नसेल अशा शेतकऱ्यांना त्यांच्या लगतच्या शेतकऱ्याला यात सहभागी करता येणार आहे. नव्या निकषानुसार लगतच्या शेतकऱ्यांची किमान ८ गुंठे जागा असावी. असे एकापेक्षा चार शेतकऱी ज्यांची जमीन लगतच्या क्षेत्रात मिळूण ६० गुंठे बसेल, अशा शेतकऱ्यांना एकत्रितपणे सिंचन विहीर प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करता येणार आहे. त्यालाही शासनाकडून मंजूरी दिली जात आहे.
———-
लोकसंख्येवर आधारित मंजूर विहीर
लोकसंख्या ः विहीर मंजूरी
०-१५०० ः ५
१५००-३००० ः १०
३०००-५००० ः १५
५००० पेक्षा अधिक ः २०
————
कोट
शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर योजना फायदेशीर आहे. शासनाकडून ३ लाख अनुदान मिळते. मात्र, यासाठी सलग ६० गुंठे क्षेत्र आवश्क आहे. या जिल्ह्यात शेतजमनी तुकड्या तुकड्यांची आहे. त्यातच अनेक हिस्सेदार लाभार्थी असल्याने बक्षीसपत्र करता येत नाही. त्यामुळे ६० गुंठ्याची सलग जमीन क्षेत्राची अट ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचण ठरत आहे. लाभार्थीचे सलगक्षेत्र न धरता एका परिसरात किमान ६० गुंठे क्षेत्र किंवा कमीक्षेत्राचा निकष या योजनेसाठी लागू केल्यास प्रत्येक गावत सिंचन विहिरीचा लाभ शेतकऱ्यांनी मिळून शकतो.
– विजय राणे, शेतकरी, सातरल
————-
कोट
राज्याने शंभर टक्के अनुदानावर आधारित सिंचन विहीर प्रकल्प वैयक्तिक शेतकऱ्यांच्या लाभासाठी तयार केलेला आहे. या प्रकल्पाचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सिंचन विहीर प्रकल्पांमध्ये सहभागी व्हावे.
– अशोक कोकाटे, कनिष्ठ सहाय्यक अधिकारी, रोजगार हमी योजना
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares