रस्ता दुरवस्थेस उपअभियंता जबाबदार – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
60390
वैभववाडी ः तळेरे-गगनबावडा महामार्गालगत लावलेले निषेधाचे फलक.

‘रस्ता दुरवस्थेस उपअभियंता जबाबदार’
करूळ घाटप्रश्नी निषेध फलक; छायाचित्रासह मोबाईल नंबरही दिल्याने चर्चेस उधाण
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ ः करूळ घाटरस्त्यांच्या वाताहातीला उपअभियंतेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचा पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायिकांनो निषेध करा, असे फलक तळेरे-गगनबावडा महामार्गालगत आज झळकले. या फलकावर उपअभियंता अतुल शिवनिवार यांचा फोटो आणि मोबाईल नंबर देखील आहे. मात्र, हे फलक नेमके कुणी लावले? हे समजू शकलेले नाही.
दोन दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांची पाहणी केली. या दौऱ्यांत उपअभियंता शिवनिवार सहभागी झालेले नाहीत. प्रकृती अस्वस्थामुळे ते दौऱ्यात सहभागी झालेले नाहीत, अशी माहिती कार्यकारी अभियंत्यांनी चर्चेदरम्यान दिली होती. परंतु, करूळ घाटरस्ता नादुरूस्तीला तेच जबाबदार आहेत, असाच एकूण सूर कार्यकर्त्याकडून दौऱ्यादरम्यान ऐकायला मिळाला होता.
आज तळेरे-गगनबावडा महामार्गालगत उपअभियंता शिवनिवार यांचे छायाचित्र लावून फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर तळेरे-गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची वाताहत करणाऱ्या उपअभियंता शिवनिवार यांचा जाहीर निषेध पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायीकांनो करा, असा मजुकर आहे. याशिवाय त्यांचा मोबाईल नंबर देखील फलकावर असून ‘जनहितार्थ जारी’, असा उल्लेख त्यावर करण्यात आलेला आहे. कोकिसरे रेल्वेफाटकावर मोक्याच्या ठिकाणी हे फलक लावण्यात आलेले आहेत. याशिवाय घाटरस्त्यापर्यत अनेक ठिकाणीही असे फलक लावण्यात आले आहेत. ही बॅनर नेमके कोणी लावले? हे मात्र समजू शकलेले नाही.
————
कोट
तळेरे-गगनबावडा महामार्गाच्या दुरूस्तीचे ४ कोटीचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले होते; परंतु, त्याला विभागीय कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर आता पुन्हा एक एक कोटीची तीन अंदाजपत्रके तयार करून पाठविली आहेत. याशिवाय खड्डे भरण्याचे अंदाजपत्रक तयार केले असून ७ नोव्हेंबरला त्यांची निविदा प्रकिया होणार आहे. खड्डे बुजविणे आणि गरजेनुसार पूर्ण रस्त्यावर डांबरीकरण करणे, अशी कामे यातून करण्यात येणार आहेत. आम्ही सातत्याने रस्ता दुरूस्तीसाठी प्रयत्न करीत आहोत. तरीही माझा फोटो आणि निषेधाचे फलक लावले आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती वरिष्ठांना दिली आहे. त्याबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.
– अतुल शिवनिवार, उपअभियंता, महामार्ग प्रधिकरण
———–
घाटरस्ता पाहणीचा स्टंट
कशासाठी? ः लोके
आमदार नितेश राणेंवर टीका
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः घाटरस्त्यांची पाहणी, अधिकाऱ्यांना दमबाजी करून देखील रस्त्यांची करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांची दुरावस्थाच होत असेल तर आमदार नितेश राणे हे दरवर्षी घाटरस्त्यांची पाहणीचा स्टंट कशासाठी करतात? असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी उपस्थित केला आहे.
नादुरूस्त करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांची आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. त्या पाहणी दौऱ्यावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख लोके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीका करताना म्हटले आहे की, ‘‘आमदार राणे यांचा करूळ आणि भुईबावडा घाटरस्त्यांचा पाहणी दौरा हे एकप्रकारचे वार्षिक झाले आहे. गेल्या वर्षीही त्यांनी घाटरस्त्यांची पाहणी केली होती. अधिकाऱ्यांना १५ दिवसांत काम झाले पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबीही दिली होती; परंतु, प्रत्यक्षात काम झालेच नाही. उलट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाट रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करावे लागले होते. करूळ घाटात गेल्या वर्षी दोन कोटीचा निधी खर्च झाला तरी देखील त्या रस्त्यांची यंदा दुरवस्था झाली आहे. बेनामी ठेकेदारीचा हा परिणाम असल्याची टीका लोके यांनी केली आहे. त्यामुळे आमदार राणेंनी कितीही स्टंट केले तरी त्याचा प्रत्यक्षात काम होण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. हा रस्ता दर्जेदार व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, मात्र त्यादृष्टीने ते कधीही प्रयत्न करीत नाहीत. अनेक बेनामी ठेकेदार त्यांच्याच पक्षात आहेत. त्यांना आळा घातला तर कामे अधिक चांगली होतील. आठ वर्षांत तालुक्याच्या खुंटलेल्या विकासास आमदार राणेच कारणीभूत आहेत. विकासकामांपेक्षा राज्याच्या विविध भागात जाऊन माध्यमासमोर स्टंटबाजी करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांना विकासाशी काहीही देणघेण नाही, हे जनतेला समजलेले आहे. परंतु, जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून तालुक्यातील जनतेला अपेक्षा आहेत. त्यांनी या दोन्ही घाटरस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यावे, अशी आमची मागणी आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares