बोलाविली बैठक: जिल्हाधिकारी बैठक हा सोपस्कार, जुमानत नाहीत साखर कारखानदार – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
उसाला पहिली उचल २५०० रुपयांची मिळावी, यासाठी जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेट घेत आहे. सलग तिसऱ्या वर्षीही उसाचे दर न ठरताच कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. आतापर्यंत १४ कारखान्यांनी गाळप सुरू केले असले तरी अद्याप एकाही कारखान्याने दर जाहीर केला नाही.
दरम्यान, शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे साखर कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. शेतकरी संघटना आक्रमक झाल्या की जिल्हाधिकारी हे बैठक बोलावतात, परंतु साखर कारखानदार हे जराही जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी बैठक केवळ सोपस्कार ठरत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील पाच ते सहा कारखान्यांनी २५०० तर इतर कारखान्यांनी १८०० ते २२०० रुपयांपर्यंत दर दिला होता. एरवी शेतकरी हिताची भाषा करणारे साखर कारखानदार जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दर जाहीर करण्यास कितपत दाद देतील, हा खरा प्रश्न आहे.
मागील वर्षी अतिरिक्त उसामुळे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात कारखाने जूनपर्यंत सुरू ठेवावे लागले होते. यंदाही ऊस अतिरिक्त आहे. जिल्ह्यात १४ कारखाने सुरू झाले असले तरी अद्याप कारखानदारांची ऊसदराबाबत एकही बैठक झाली नाही. काही सहकारी कारखाने वगळता इतर कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. मोळी टाकण्याच्या कार्यक्रमातच दराची घोषणा केली जाते, पण यंदा कारखानदार चिडीचूप आहेत.
“लोकमंगल’समोर आंदोलन
दक्षिण सोलापूर | गेल्या हंगामातील थकीत द्या, चालू हंगामाचा दर जाहीर करा, अशी मागणी करीत शेतकरी संघटनांनी भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्यावर शनिवारी ठिय्या आंदोलन केले. यामध्ये दक्षिणसह मंगळवेढा व कर्नाटकातील शेतकरी सहभागी झाले.
या वेळी भंडारकवठे युवा शेतकरी प्रथमेश पाटील म्हणाले, २०१८-१९ या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी लोकमंगलला ऊस दिला. त्यांचे प्रतिटन ३०० प्रमाणे थकीत बिल मिळावे. मागील २०२‍१-२२ च्या गळीत हंगामात परिसरातील इतर कारखान्यांनी २५०० रुपये प्रतिटनाप्रमाणे ऊस बिल दिले. परंतु लोकमंगलने २००० रुपयांप्रमाणे बिल जमा केले आहे. उर्वरित ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. तसेच चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन ३००० प्रमाणे भाव द्यावा. त्याचा पहिला हप्ता २५०० द्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र करू. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तरताज पाटील म्हणाले, लोकमंगल कारखाना चांगला चालावा, याबद्दल आमचे दुमत नाही. परंतु उसाला कमी भाव देऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नये, अशी मागणी केली. या आंदोलनात बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, विठ्ठल पाटील, मायप्पा जंगलगी, सरपंच चिदानंद कोटगोंडे, सोमशंकर पाटील, बापूराव पाटील, भीमाशंकर बबलेश्वर, निंगप्पा गुजरे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष बिळेनी सुंटे आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares