अभिनेत्री सविता मालपेकरांचा सवाल: CM शिंदे फक्त ठाण्याच्या कलाकारांसाठी निर्णय घेणार की महाराष्ट्रातील कलाक… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मुख्यमंत्री फक्त ठाण्याच्या कलाकारांसाठी निर्णय घेणार आहेत की महाराष्ट्रातील तमाम कलाकारांसाठीही निर्णय घेणार आहेत, असा घाणाघात अखिल भारतीय मराठी नाट‌्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्तीच्या पदाधिकारी व ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केला आहे.
कलाकारांचे प्रश्न कोण मांडणार?
नाट्य परिषद नाशिक शाखेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मापलेकर यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. त्या म्हणाल्या की कलाकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावले होते. आमच्या काही लोकांनी आपापल्या पोळ्या भाजण्याचे प्रश्न मांडले. फिल्मसिटीचे रस्ते, गार्डन वगैरे. कलाकारांचे प्रश्न कोण मांडणार? का नाही मिळत कलाकारांना भूखंड, ८ दिवसांची औषधेही येत नाही असे पेन्शन दिले जाते. २५ हजार रुपये का दिले जात नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावले तेव्हा बरोबरचे लोक सांगतात त्यांना ताप आहे, ते आजारी आहेत. मग आम्हा कलाकारांना बोलावलेच कशाला. तुम्ही बरे असताना बोलवा ना.
आमचे कामे होत नाही
मालपेकर म्हणाल्या, सरकार दरबारी जेव्हा आपण प्रश्न घेऊन जातो तेव्हा मंत्री फक्त माना डोलवतात. मग सरकार मागचं असो हे असो की, आणखी कोणाचे असो. कामं होत नाहीत. या आधीचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी काहीही केलं नाही. वाईट वाटतं त्यांच्या वडिलांनी कलाकारांच किती भलं केलं. त्यांना कलाकारांची जाण होती. आताचंही सरकार फार काही करत नाही.
मराठी कलाकारांचे आंदोलन का नाही?
मापलेकर म्हणाल्या, कलारांना पेन्शन देताना ग्रेड ठरवली जाते. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तुम्ही कसं ठरवता हा ए ग्रेड तो बी ग्रेड. सगळे कलाकार सारखंच काम करतात. त्यामुळे त्यांना पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळायला हवी हा मुद्दा मी मांडला. मात्र त्यावरच काय तर तळागाळातील कलाकारांच्या प्रश्नांवर अद्याप काहीही झालेलं नाही, होतही नाही. कारण मराठी कलाकारांची एकी नाही, त्यांची युनियन नसल्याने आवाज उठवला जात नाही. शेतकरी आंदोलन करतात, मराठा आंदोलन होतं, कलाकार का नाही करत आंदोलन. कारण एकत्र नाही. त्यामुळे आपला आवाज सरकार दरबारी पोहोचत नाही.
मुंबई, मध्यवर्तीचे शाखेचे अध्यक्ष झोपेत
मापलेकर म्हणाल्या, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे जसे काम चालते तसे मुंबईचे अजिबातच नाही. ती मध्यवर्ती शाखा असून बेवारशी आहे. त्यालाही आता ३ वर्षे झाली. कारण परिषदेचे अध्यक्ष सध्या झोपलेले आहेत. झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला जागं करणं अवघड असतं. ४५ लोकांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवला. पण तरी त्यांना जाग येत नाही. राष्ट्रवादी सेलकडून कोविड मदत म्हणून कलाकारांना देण्यासाठी ४० लाख रुपये मिळाले होते. प्रत्यक्षात फक्त ८५ जणांना मदत मिळाली. ९०० कलाकार नोंदणीकृत आहेत. ७०० बॅकस्टेजचे आहेत. ३५० कार्यरत आहेत. असे असताना मग हा पैसा गेला कुठे? हा प्रश्न इतर कलाकार अध्यक्षांना का विचारत नाहीत.
…अन्यथा भरडले जाऊ
मापलेकर म्हणाल्या, येत्या ६ महिन्यात परिषदेच्या निवडणुका आहेत. मात्र परिषदेचे प्रकरण न्यायालयात आहे. एक-दीड महिन्यात हा प्रश्न सुटेल असे सांगण्यात येते. जर तसे झाले नाही तर आंदोलन करावं लागेल. फक्त मिटींगा घेऊन काहीच होत नाही. रंगभूमी पूर्ववत करण्यासाठी आपल्यालाच पाऊल उचलावं लागेल. त्यासाठी जागं व्हायला हवं. ठोस काहीतरी करायला हवं. अन्यथा आपण भरडले जाणार आहोतच असेही मालपेकर यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares