ऊस वाहतूक रोखण्यावरून आंदोलन अंकुश व कारखाना समर्थक यांच्यामध्ये झटापट – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
60762
….
‘आंदोलन अंकुश’ – कारखाना समर्थकांमध्ये झटापट
शिरटी फाटा येथे वातावरण तणावपूर्ण ः दोन कार्यकर्त्यांना मारहाण
शिरोळ, ता. ५ः ऊस वाहतूक रोखण्यावरून ‘आंदोलन अंकुश’चे कार्यकर्ते व कारखाना समर्थक यांच्यामध्ये झटापट झाली. यामुळे शिरटी फाटा येथे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
येथील दत्त साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ रविवारी सकाळी झाला. यामुळे ऊस वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होती. ‘आंदोलन अंकुश’ने कोयता बंद आंदोलन जाहीर केले आहे. मात्र, शेतकरी ऊसतोडी घेत आहेत. यामुळे शिरटी फाट्यावरती ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी वाहने अडवण्यास सुरुवात केली. यावरून शेतकरी तसेच कारखानदार समर्थकांची ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांशी वाहतूक रोखण्यावरून शाब्दिक खडाजंगी झाली. यामध्ये झटापट होऊन दोन कार्यकर्त्यांना मारहाण झाली.
यानंतर ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी शिरोळ पोलिसांना घटनास्थळी बोलावून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यास सांगितले. यामध्ये चार वाहनधारकांच्याकडे कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
या घटनेनंतर खासदार धैर्यशील माने कार्यक्रमानिमित्त शिरोळमध्ये आल्याची माहिती मिळाली असता, धनाजी चुडमुंगे यांच्यासह ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी खासदार माने व आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांची भेट घेतली. लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्ही ऊस दरावर तोडगा काढण्याकरिता साखर कारखानदार यांच्यासमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी केली. आमदार यड्रावकर यांनी बघू, असे सांगून ते निघून गेले. तथापि खासदार माने यांच्याशी बोलताना चुडमुंगे म्हणाले, ‘तुम्ही या विभागाचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्या. शेतकऱ्यांना न्याय द्या. ऊसदरावर तोडगा काढा. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत.’ यावर खासदार माने म्हणाले, ‘जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून बैठक घेण्याचा प्रयत्न करू.’
…..
‘शरद, जवाहर, गुरुदत्त, पंचगंगा व दत्त साखर कारखाना यांनी जाहीर केलेला दर शेतकऱ्यांना मान्य नाही. गेल्या वर्षीचा हिशेब जोपर्यंत साखर कारखाने देत नाहीत व या वर्षीचा दर ३१०० रुपये जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत ‘आंदोलन अंकुश’चे आंदोलन सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस तोडी स्वीकारू नयेत.

धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश
…………
‘आंदोलन अंकुश’च्या कोयता बंद आंदोलनाला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद नाही. शेतकरी उत्स्फूर्तपणे साखर कारखान्याच्या तोडी घेत आहेत. शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्याला पाठवायचा आहे. तथापि ‘आंदोलन अंकुश’कडून बेकायदेशीरपणे वाहने अडवली जात आहेत. यामुळे शेतकरी, वाहनधारक व ऊसतोड मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
शिवाजीराव माने -देशमुख, शेतकरी, शिरोळ
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares