जितेंद्र आव्हाडांवर मनसेची टीका, 'आव्हाड हे अफझल खानाचे प्रवक्ते' – BBC

Written by

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
फोटो स्रोत, Facebook
1) हर हर महादेववरुन मनसे विरुद्ध राष्ट्रवादीत जुंपली
‘हर हर महादेव’ चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता विविध संघटनांकडून या चित्रपटावर आक्षेप घेतला जातोय.
विशेष म्हणजे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कृतीला मनसेने विरोध केला असून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना अफझल खानाचे प्रवक्ते आणि मुंब्र्याचे नवाब म्हटले आहे. तसेच शो बंद पडल्यानंतर प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली असा आरोप खोपकरांनी केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढल्यानंतर काही प्रेक्षकांकडून मॅनेजरकडे तिकीटाचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मॅनेजर आणि काही प्रेक्षकांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडलेला शो पुन्हा सुरु करा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. त्यानंतर हा शो अविनाश जाधवांनी सुरु देखील केला.
2) वरळीत पोटनिवडणूक करा, मग कळेल मशाल आहे की चिलीम – आशिष शेलार
“अंधेरी पूर्वच्या निकालानंतर मशाल भडकली, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी दिनांक सांगावी, वेळ सांगावी. वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची हिमंत दाखवावी.
"भाजपा कार्यकर्ते आमनेसामने लढून उद्धव ठाकरेंच्या सेनेची मशाल आहे की चिलीम हे दाखवून देतील,” असं आहान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Facebook
जागर मुंबईचा सभेत आशिष शेलार बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, “मी 25 वर्ष जनतेच्या विश्वासावर निवडून आलेला राजकारणी आहे. या काळात तिकीट द्या म्हणणारे अनेक राजकारणी पाहिले. पण पक्षाने दिलेले तिकीट व्यापक हितासाठी मिळालेले तिकीट परत देणारे मुरजी पटेल हे आगळेवेगळे नेते आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे.”
पक्षाने सांगितल्यानंतर त्यागासाठी तयार राहण्याची वृत्ती भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे, असंही शेलार म्हणाले. “जागर मुंबईचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काहीजणांच्या पोटात मुरडा सुरु झालाय. विरोधी पक्षाची टोळी मतिमंद झालीये. जागर मुंबईचे अभियान केवळ भाजपाला मत द्या, एवढ्यापुरते नाही. कुणा एकाला महापौर बनवायचे आहे, यासाठी देखील हे अभियान नाही. मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी हा जागर आहे,” असं शेलारांनी सांगितलं.
3) काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा – बंगळुरू कोर्ट
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ‘भारत जोडो’ यात्रेचं आयोजन केलं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढण्यात आली आहे.
आता ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचलीय. काँग्रेसच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सोशल मीडियात निर्माण झालं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
फोटो स्रोत, Twitter/Bharat Jodo
दुसरीकडे, बंगळुरू येथील न्यायालयानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भारत जोडो यात्रेतील व्हिडीओमध्ये ‘केजीएफ-2’ चित्रपटातील संगीत वापरल्याने न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. तात्पुरत्या काळासाठी ही खाती ब्लॉक करण्यात यावीत, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय.
‘एमआरटी म्युझिक’ कंपनीने काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराईट) आरोप कंपनीने केला होता.
याप्रकरणी यशवंतपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसने बेकायदेशीरपणे चित्रपटातील संगीत वापरल्याचं प्रथमदर्शनी न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे.
4) आदित्य ठाकरेंकडून नितीन देशमुखांना भर सभेत मिठी मारत अभिनंदन
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘शेतकरी संवाद’ यात्रेद्वारे दौऱ्यावर आहेत. अकोल्यातून सुरू झालेली ही यात्रा बुलडाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यातही पोहोचणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
फोटो स्रोत, Twitter
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं असल्याचं आश्वस्त केलं. आदित्य ठाकरे यांनी आमदार नितीन देशमुख यांना मिठी मारत त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर नितीन देशमुखांनी आदित्य ठाकरेंना पदस्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
अकोल्यात झालेल्या संवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानत शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या बांधावर जात असलो, तरी आजही सभा नितीनजींसाठी आहे, आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून ते लढतायत. ज्यांनी स्वतःला विकलं नाही, मान सन्मान विकलं नाही, अशा व्यक्तीला मिठी मारायला आलोय, हे प्रेम आणि हा विश्वास असतो.”
5) एकनाथ शिंदेंनी सर्व समर्थक आमदारांना मुंबईत बोलावलं
एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांमध्ये मुंबईत सर्व समर्थक आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
फोटो स्रोत, Twitter
नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनंही केली आणि सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाद वाढल्यानंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कान टोचले. अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले. त्यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांना फोन करुन माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहिररीत्या माफी मागितली.
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares