…म्हणून आज बांधावरती जावं लागतंय, श्रीकांत शिंदेंचा नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
गेली कित्येक दिवस बांधावर जाऊन पिकांचं नुकसान पाहण्याचं काम सुरू आहे. मला वाटतं अगोदर जेव्हा दौरा झाला तेव्हा दहा मिनिटांचा दौरा होता. त्यांनी दौऱ्याची वेळही वाढवली. दहा मिनिटांचा दौरा वीस मिनिटांवरती नेला आणि वांद्रे ते वरळी इतकचं जग, संघटना, शिवसेना हे ज्यांनी मानलं आज त्यांना बांधावरती जावं लागतंय, हा बदल आहे. हा फरक आहे. हा फरक घडवून आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. इतकी वर्ष हा शिवसैनिक राबराब राबत होता, पदाधिकारी आणि नेते मंडळीही राबत होते आणि पक्षासाठी झुजत होते. परंतु आज हे वांद्रे ते बांधापर्यंत तरी पोहोचले. परंतु बांधावरती पोहोचून सुद्धा सांगतात की, मला शेतीचं काही कळत नाही. ३५ वर्ष झाले तरी तुम्हाला शेतीचं काही कळत नाही, असं म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी नाव न घेता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
डॉ. श्रीकांत शिंदेंनी सिल्लोडमध्ये आज जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सिल्लोडमधील जनतेचं प्रेम, उत्साह आणि आनंद दुसरीकडे कुठेही आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळणार नाही. अब्दुल सत्तार यांच्यावर प्रेम करणारी जनता याठिकाणी आहे. या सभेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. सिल्लोड गाजत होतं. आज या सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार होत्या. परंतु याठिकाणी आज एकच जाहीर सभा आहे आणि एक कॉर्नर सभा कुठेतरी सुरू आहे. जाहीर सभा घेण्यासाठी आम्हाला परवानगी देत नाहीत, असा पहिल्यांदा खूप गाजावाजा केला. सभा घेण्यासाठी आम्हाला आडकाठी केली जाते. परंतु आज बाजूलाच कुठतेरी कॉर्नर सभा सुरू आहे. जी कामं करणारी लोकं आहेत. ती आज तुमच्यासोबत नाहीत, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
अडीच वर्षे घरामध्ये बसून राहण्याचं काम केलं
शेतकऱ्याचं दुःख तुम्हाला समजत नसेल तर बांधावर येण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. गेली अडीच वर्षे तुमच्याकडे ताकद होती. तेव्हा तुम्ही बांधावरती आला नाहीत. हा शेतकरी तुम्हाला आठवला नाही. कोविडच्या नावाखाली स्वत:ही घरात बंद राहीले आणि लोकांनाही घरात बंद ठेवलं. अडीच वर्षे घरामध्ये फक्त बसून राहण्याचं काम केलं, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
पेंग्विन प्रेमी टोळीला गावच्या गाईचं महत्त्व कसं कळणार?
फक्त बांधावर जाऊन काम होत नाही तर शेतावर देखील जावे लागते, पायाला चिखल देखील लागावा लागतो पिकांचा स्पर्श देखील कळावा लागतो त्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांचे दुःख कळतं. परंतु या पेंग्विन प्रेमी टोळीला गावच्या गाईचं महत्त्व कसं कळणार?, तसेच नाईट लाईफचा आग्रह धरणाऱ्या काळ्या आईचं महत्त्व कसं कळणार आणि समजणार, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.
एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालाय
आज कापूस आणि मका याठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतला जातो. शेतकऱ्याचे दुःख समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत राबावं लागतं. आज आपल्याला, महाराष्ट्राला कृषीमंत्री लाभलेले आहेत ज्यावेळी कृषी मंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हापासून ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या घरांमध्ये राहण्याचं काम करतात. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचं काम कोण करत असेल तर ते कृषी मंत्री अब्दुल सत्तार आहेत. जसा आपल्याला कृषी मंत्री लाभलेला आहे तसाच एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. आज मुख्यमंत्री देखील स्वत: शेती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची दुख: काय आहेत हे शेतकऱ्यांना माहिती आहेत.
नुकसान झालंय त्यांना मोबदला देण्याचं काम हे सरकार करणार
शेतावरती गेलो असता मोठ्या प्रमाणात कपाशीचे नुकसान या भागांमध्ये झाले आहे आणि मक्याचे नुकसान देखील या भागामध्ये झाले आहे. जवळपास शंभर टक्के नुकसान हे या ठिकाणी झालंय. जे काही पंचनामे आहेत ते पूर्ण झाले आहेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोललो, त्यांनी देखील आश्वासीत केलं. ज्यांचे पंचनामे झालेत आणि ज्यांचं नुकसान झालंय त्यांना पूर्णपणे मोबदला देण्याचं काम हे सरकार करणार आहे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम हे सरकार करणार आहे, असं शिंदे म्हणाले.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी केला सत्तारांना फोन? सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश
 
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares