इंजोळेच्या शिवारात दरवळ देशी काळ्या जिरग्याचा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
00308
इंजोळे (ता. पन्हाळा) : काळा जिरगा भात पिकाबरोबर शेतकरी तानाजी कोंडे.

इंजोळेच्या शिवारात दरवळ
देशी काळ्या जिरग्याचा

उत्तम महाडिक : सकाळ वृत्तसेवा
देवाळे, ता. ८ : इंजोळे (ता. पन्हाळा) येथील तानाजी कोंडे यांनी आपल्या शेतात काळा जिरगा या देशी व औषधी वाणाच्या भाताचे पीक घेतले आहे. सतत शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारे कोंडे यांनी काळा जिरगा या भाताचे औषधी गुण ओळखून यावर्षी रासायनिक खताचा वापर न करता फक्त शेणखत वापरून हे भात पीक घेतले आहे.
देशी वाण टिकविण्यासह वेगळा प्रयोग करून उत्पन्नवाढीच्या दृष्टीने कोंडे यांनी शेतात काळा जिरगा या भाताची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी लाटगाव (ता. आजरा)मधून बियाणे उपलब्ध केले. पहिल्यांदाच केलेल्या या बियाण्याचे पीक चांगले आले. औषधी गुणधर्मामुळे या भाताला बाजारात चांगली मागणी आहे. या भातात मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. जे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करतात. पचनसंबंधित तक्रारीही यामुळे दूर होतात. यात एंथोसायनिन नामक अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोगसारख्या रोगांपासून बचाव करतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, अशी आरोग्य क्षेत्रातील जाणकार या भाताची महती सांगतात. या दृष्टीने या भात लागवडीचा प्रयोग केल्याचे कोंडे यांनी सांगितले.
————–
कोट
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनींचा पोत खराब होत चालला आहे. अन्नपदार्थांची सात्त्विकता कमी होते. रासायनिक कीडनाशकांचे अंश पिकांमध्ये, पर्यायाने अन्नात राहत असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे भविष्यात देशी वाणांच्या संवर्धनाची आवश्‍यकता भासेल. त्यासाठी माझीही झडपड आहे.
– तानाजी कोंडे, शेतकरी, इंजोळे
————–
कोट
पन्हाळा परिसरात भरपूर पाऊस व पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी काळा जिरगा भातपीक घेण्यासाठी हरकत नाही. याचे उत्पादन कमी असले तरी औषधी गुणधर्मामुळे भाताला दर चांगला आहे.
– तानाजी पाटील, तालुका कृषी पर्यवेक्षक, पन्हाळा
————
दृष्टिक्षेपात
– देशी वाण टिकविण्याचा प्रयत्न
– परिसरातील जास्त पाऊस व पोषक वातावरणामुळे पीक चांगले
– पिकासाठी बियाणे आजऱ्यातून
– भाताचा बियाण्यांसाठी वापर करणार
– भाताला सध्या १२५ रुपये प्रतिकिलो दर
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares