रायगड अवतीभवती – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
रायगड अवतीभवती
चौल-आंबेपूरमध्ये भातपीक पाहणी
रेवदंडा, ता. १० (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील चौल-आंबेपूरमधील राकेश मढवी या शेतकर्‍याच्या शेतावर अंकुर सिड्सतर्फे (नागपूर) श्री १०१ भातपीक वाणाविषयी भातपीक पाहणी करण्यात आली. या वेळी शेतावरच मार्गदर्शन करण्यात आले. वाणाविषयी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक दीपक पाटील यांनी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करताना सांगितले, वाण पावसात न पडता तग धरून राहते. अधिक फुटवे असलेले भात-दाणे परिपूर्ण भरलेले असल्याने उत्पादनात वाढ होते. साधारण १३५ ते १४० दिवसांत वाण तयार होत असल्याने शेतकरी वर्गाला निश्चितच फायदा होतो. या कार्यक्रमाला परिसरातील विक्रेते; तसेच शेतकरी उपस्थित होते.
रेवदंडा : शेताची पाहणी करताना दीपक पाटील.
रोह्यात मराठी रंगभूमी दिनानिमित्त दशावतार प्रयोग
रोहा (बातमीदार) : मराठी नाट्यविश्वात नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ ''मराठी रंगभूमी दिन'' साजरा केला जातो. याच दिनानिमित्त रोहा शहरात श्री अभंग सेवा मंडळ, भाटे सार्वजनिक वाचनालय व दशावतारी नाट्यप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भाटे सार्वजनिक वाचनालयात दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. यासाठी सावंतवाडी येथून श्री देवी माउली दशावतारी नाट्य मंडळाने ''शिर्डी माझे पंढरपूर'' हा नाट्यप्रयोग सादर केला. नाट्यप्रयोगाबद्दल प्रतिक्रिया देताना मान्यवरांनी अशा नाट्यप्रयोगांचे वारंवार आयोजन केले पाहिजे आणि कोकणातील हा प्रयोग आपल्या जिल्ह्यातही सर्वदूर पोहचला पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी नाट्यमंडळाला रोहेकरांतर्फे नटराजाची मूर्ती भेट देण्यात आली. या नाटकात स्थानिक बालकलाकार शुभ्रा आठवले हिने लक्ष्मीची भूमिका साकारली. प्रयोग यशस्वी होण्यासाठी अभंग सेवा मंडळाचे हेमंत ओक, उदय ओक, विवेक बापट भाटे वाचनालयातर्फे किशोर तावडे आणि नाट्यप्रेमी स्वप्नील परांजपे, चैतन्य आठवले, विशाल धुरी व मोहनकाका धुरी यांनी अथक प्ररिश्रम घेतले.
रोहा : मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्य मंडळाला नटराजाची मूर्ती भेट देताना मान्यवर.
सद्दाम दफेदार यांच्याकडून रस्तादुरुस्ती
रोहा, ता. १० (बातमीदार) : जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सद्दाम दफेदार यांनी स्वखर्चाने नागोठणे हुजरा मोहल्ल्यातील ६०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करून एक आदर्श निर्माण केला आहे. रस्ता डांबरीकरणामुळे हुजरा मोहल्ला चकाचक झाला असल्याने नागरिकांनी दफेदार यांचे आभार मानले. या रस्त्याचे उद्‍घाटन सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ८) करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील विविध ठिकाणच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने नागरिकांकडून केंद्र व राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. नागोठण्यातील एका युवकाने स्वखर्चाने नागोठणे हुजरा मोहल्ल्यातील उर्दू हायस्कूलसमोरील जुना जकात नाका ते तक्क्याच्या मोरीपर्यंतचा ६०० मीटर रस्त्याची दुरुस्ती केली. सद्दाम दफेदार हे आपले वडील फरमान दफेदार यांच्याप्रमाणे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या वेळी नागोठणे शहराध्यक्ष अशपाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, अब्बास पानसरे, शब्बीर पानसरे, रियाझ दफेदार, अझीम मुल्ला, नागोठणे शहर काँग्रेस युवक अध्यक्ष फैय्याज पानसरे, रोहा तालुका युवक उपाध्यक्ष नसीम इलामी आदींसह मोहल्ल्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
रोहा : रस्त्याचे उद्‍घाटन करताना नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक.
पेण येथे आपची आढाव बैठक
पेण, ता. १० (वार्ताहर) : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नुकतीच आढावा बैठक पेण येथील विश्रामगृहात पार पडली. या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने आपही रायगड जिल्ह्यात आढावा बैठक घेत आहेत. पेण येथे झालेल्या आढावा बैठकीला अलिबाग अध्यक्ष मनोज घरत, सचिव अॅड. जयसिंग शेरे, उपाध्यक्ष हरीचंद्र शिंदे, खजिनदार अशोक उपाध्याय, पेण विधानसभा प्रभारी संजय थळे, खालापूर विधानसभा प्रभारी डॉ. रीयाज पठाण, संतोष भगत, चिमाजी शिंदे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
खारपाले ते आळंदी पायी दिंडी सोहळा
पेण (बातमीदार) : सद्‍गुरू गणेश नाथ महाराज यांच्या कृपाछत्राखाली आणि सद्‍गुरू स्वामी हरिश्चंद्र महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खारपाले येथील गुरुकुलातून सोमवारी (ता. १४) दिंडीचे प्रस्थान होणार आहे. आळंदीत गेल्यावर आळंदी ते पंढरपूर पायी वारी माऊलीच्या सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे. गौरवलेली ही दिंडी तरुण सुशिक्षित साधकांच्या सहभागाने व भाविकांच्या सहभागाने चित्ररथासह समाज प्रबोधन करत आळंदीपर्यंत प्रवास सुरू करतील. प्रवासादरम्यान दररोज प्रवचन, कीर्तन व भजन, हरिपाठ करून दिंडी चालणार आहे. सर्व भाविकांनी मंडळातील साधकांनी बहुसंख्येने दिंडीत सहभागी होऊन पायी वारीचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
गोवेलेमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन
माणगाव (वार्ताहर) : शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद व विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामाचा धडाका सुरू आहे. गोवेले कुंभारवाडा येथील राधाकृष्ण मंदिराचे भूमिपूजन आणि गावातील गणपती मंदिराजवळील संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. कुंभारवाडी येथील राधाकृष्ण मंदिराचे भूमिपूजन करून या मंदिरांसाठी मला खारीचा वाटा उचलता आला आहे. अशा गोवेले पंचक्रोशीतील विविध समस्या सोडवून गावाचा विकास करण्याचे भाग्य मला मिळते, याचेच समाधान आहे. हारकोल ते गोवेले आणि गोवेले ते चांदोरे या २० किलोमीटर रस्त्यासाठी लागणारा निधी देऊन रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करेन, असे आश्वासन गोगावले यांनी उपस्थितांनी दिले. गणपती मंदिराजवळ संरक्षक भिंतीचे भूमिपूजन करून त्याचेही काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. पंचक्रोशीतील कोणतेच गाव, वाडा विकासापासून मागे राहू नये, असा माझा मानस आहे. या वेळी दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपसभापती सुजित शिंदे, शरीफ हार्गे, ज्ञानदेव पदरत, सदाशिव धांगडे, मढेगावचे सरपंच कालप, आनंद शिंदे, महिला संघटिका शिंदे, सरपंच दिव्या जाधव, उपसरपंच संतोष मेस्त्री, पांचाळ, माणगाव तालुका शिवसेना शिंदे गटसंपर्कप्रमुख जयेश सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
माणगाव : आमदार भरत गोगवले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

बोंडशेत ते आळंदी पायीवारी दिंडीचे प्रस्थान!
माणगाव (वार्ताहर) : हिमालय तपस्वी गुरुवर्य वै. नाक्ती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, गुरुवर्य वै. सीताराम पवार महाराज यांच्या प्रेरणेने रायगडभूषण गुरुवर्य एकनाथ पवार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. १५) सकाळी ९ वाजता टाल मृदंगाच्या गजरात बोंडशेत ते आळंदी पायी वारी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. वारकरी भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन केले आहे. दिवसेंदिवस वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणाऱ्या बोंडशेत ते आळंदी पायीवरी दिंडीचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. प्रस्थानापासून आळंदीत आगमन होईपर्यंत या मार्गावरील अनेक दानशूर दाते चहापाणी, अल्पोहार, भोजन तसेच मुक्काम इत्यादी वारकऱ्यांची व्यवस्था मनोभावे करताना दिसून येतात. अशा या आधुनिक/विज्ञान युगात वारकऱ्यांमध्ये अग्रेसर ठरणाऱ्या पायीवरी दिंडीचा बोंडशेत येथील प्रस्थान सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन आदिनाथ वारकरी संप्रदाय बोंदडशेत मंडळाने केले आहे.
माणगाव : टाल मृदंगाच्या गजरात बोंडशेत ते आळंदी पायी वारी दिंडी मंगळवारी निघणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares