Solapur : भीमाच्या आखाड्यात खासदार महाडिकांच्या विरोधात उतरणार तरी कोण? – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
भीमा सहकारी साखर कारखान्याची यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार आहे. निवडणूक जाहीर झाली तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. प्रत्यक्ष मतदान ज्या वेळी होणार आहे, त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सत्तेवर आहे. मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याच्या बांधावर असलेल्या भीमा कारखान्याच्या निवडणुकीने या तिन्ही तालुक्‍याचे राजकारण ढवळून काढले आहे. दोन विधानसभा मतदार संघावर परिणाम करणारी भीमा कारखान्याची एक निवडणूक निकाला दिवशी अनेकांना उघडे पाडणार हे निश्‍चित.
ज्या कारखान्यात संचालक म्हणून काम करत होते, त्याच कारखान्याच्या विरोधात जनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन केले होते. आंदोलन केलेले देशमुख उमेदवारांच्या यादीत नाहीत. परंतु उमेदवारांच्या प्रचारात अग्रेसर आहेत. त्यांच्या आंदोलनावर कारखान्याच्या माजी कामगारांनी आक्षेप अन् संशय घेतल्याने लहान पोरांसारखी हातात दगडं घेण्याची वेळ देशमुखांवर आली. या घटनेत कोण उघडे पडले? याची चर्चा भीमा पट्ट्यात चवीने चाखली जात आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता भाजपची कारखान्याचे चेअरमन भाजपचे, कारखान्याच्या विरोधात पॅनेल करणारे माजी
आमदार प्रशांत परिचारकही भाजपचे, काही दिवसांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चेत अडकलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील. यामुळे भीमाच्या आखाड्यात खासदार महाडिकांच्या विरोधात उतरणार तरी कोण?, कारखान्याचे संचालक बिनविरोध निवडले जातील अशीच शक्‍यता होती. कारखान्याची निवडणूक लावली कोणी? हे देखील आगामी काळात समजणार आहे. कारखान्यासाठी फक्त पंधराच अर्ज आले पाहिजेत,
अशी आत्मविश्‍वासाने घोषणा करणारे चेअरमन महाडिक त्यांचे चिरंजीव विश्‍वजीत महाडिक यांच्यासह प्रचारात अडकल्याने त्यांचाही अंदाज चुकला आहे. विश्वजित महाडिक यांच्या रूपाने भीमा पट्ट्याला नवा युवा चेहरा मिळाला आहे. दरम्यान, खासदार महाडिकांचे कोल्हापुरातील विरोधक काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या निवडणुकीत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. आमदार पाटील दोन दिवसांपूर्वी धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकूळ शुगरच्या साखर पोते पूजनासाठी आले होते. "भीमा''चा आखाडा तापला असताना या आखड्याकडे कानाडोळा करून आमदार सतेज पाटील निघून गेल्याने "त्यांचं नक्की काय ठरलंय'' याचीही उत्सुकता लागली आहे.
तात्या तुम्ही नक्की कोणाचे?
२००९ मध्ये मोहोळ मतदार संघ राखीव झाला आणि २०११ मध्ये भीमा कारखाना सुधाकरपंत परिचारक व राजन पाटील यांच्या हातातून गेला. राखीव मतदार संघाचे पहिले आमदार आणि तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे त्यावेळी म्हणाले, कदाचित हा माझा पायगुण असेल. २०१४ मध्ये ढोबळेंच्या आमदारकीची जागा रमेश कदम यांनी घेतली. २०१५ मध्ये रमेश कदम तुरुंगात गेले अन् २०१६ मध्ये भीमा कारखाना पुन्हा महाडिक यांच्या ताब्यात गेला. त्यामुळे रमेश कदम कोणाचे? हे तालुक्‍याला उशिराने कळले. मोहोळचे आताचे आमदार यशवंत माने कोणाचे आहेत? याची उत्सुकता सर्वांना आहे. भीमा कारखान्याचा मी सभासद नाही, मग मी प्रचारात का जायचे? विधानसभेला मला सर्वांचीच मदत लागते, अशी भूमिका आमदार माने यांनी घेतल्याने ते नक्की कोणाचे? याची उत्सुकता सर्वांनांच आहे. महाडिक खासदार झाल्यानंतर भीमा कारखान्यावरील सत्काराला उत्तर देताना म्हणाले होते, मोहोळच्या आमदारांना माहिती नाही का?, पंढरपुरातील गावांतून त्यांना कोणी लीड दिला. खासदार महाडिकांचे हे वाक्य आणि आमदार यशवंत मानेंची शांत राहण्याची भूमिका याचे कनेक्शन आता समजत आहे.
उमेश पाटील ओपन, अभिजित पाटील क्‍लोजच
भालके परिवाराच्या ताब्यात असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन घडविणारे विठ्ठलचे चेअरमन भीमाच्या निवडणुकीत कोणासोबत आहेत? हे अद्यापही त्यांनी जाहीर केले नाही. अभिजित पाटील भाजपचे की राष्ट्रवादीचे हे जसं गुपित आहे तसचं गुपित त्यांच्या भीमाच्या भूमिकेबाबतही आहे. भगीरथ भालके यांनी महाडिकांची साथ पसंत केली आहे, प्रशांत परिचारक यांच्याशी अभिजित पाटलांचा संघर्ष आहे. विठ्ठल परिवाराचे प्रमुख म्हणून अभिजित पाटील कोणासोबत जातील याचा मोठा परिणाम भीमाच्या निवडणुकीवर होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी उघड भूमिका घेत चेअरमन महाडिक यांच्यासोबत गेले आहेत. उमेश पाटील यांचा आणि भीमाचा काय संबंध असा विषय जरी उपस्थित होत असला तरीही खासदार महाडिकांची भूमिका आक्रमक शैलीत मांडण्यासाठी उमेश पाटील महाडिकांना उपयुक्त मानले जात आहेत. मोहोळच्या आगामी राजकारणात समविचारींची मोट बांधण्यासाठी उमेश पाटलांना या निवडणुकीतून मिळालेले भीमा पट्ट्याचे ग्राऊंड बेरजेच्या राजकारणाचे धोतक मानले जात आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares