ग्राहक-अधिकाऱ्यांमध्ये समन्वय हवा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
swt१०३३.jpg
६१५८२
कुडाळः वीज ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रताप हुगाडे. सोबत डॉ. फड, विनोद पाटील, प्रसाद पारकर, श्रीराम शिरसाट आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
ग्राहक-अधिकाऱ्यांमध्ये समन्वय हवा
प्रताप होगाडे ः कुडाळमध्ये वीज ग्राहक मेळाव्यास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः महावितरण कंपनी ग्राहकांच्या मालकीची आहे. त्यामुळे ग्राहक आणि कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असलाच पाहिजे. ग्राहकांचे प्रश्न सामंजस्याने समजून घेत अधिकारी वर्गाने ते सोडविले पाहिजेत. वीज ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण झालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका असल्याचे मत महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी वीज ग्राहकांचे अधिकार काय, वीज अधिकार्‍यांनी ग्राहकांशी कशा पध्दतीने समन्वय राखावा, याबाबत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सिंधुदुर्ग मंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग व कुडाळ तालुका व्यापारी संघटना कुडाळ, ग्राहक पंचायत कुडाळ यांच्या सहकार्याने येथील सिद्धिविनायक हॉल येथे शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहक मेळावा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. फड, महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा व्यापारी महासंघ कार्यवाह नितीन वाळके, सचिव भूषण मठकर, कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा व्यापारी महासंघ सदस्य नंदन वेंगुर्लेकर, राजेश मराठे आदींसह संजय परब, संजय तेरेखोलकर, द्वारकानाथ घुर्ये, पी. डी. शिरसाट, प्रसाद शिरसाट, निकू म्हाडेश्वर, नीलेश धडाम, संजय भोगटे आदी उपस्थित होते.
हुगाडे पुढे म्हणाले की, "अशा प्रकारचे मेळावे तालुका, जिल्हास्तरावर होणे आवश्यक आहे. येथील वीज ग्राहकांना मुळात बिल कळत नाही. त्यामुळे तक्रारी वाढत आहेत. मिटर रिडींग न घेता महावितरण कंपनीच्यावतीने बिले काढल्याने ज्या तक्रारी येतात, त्यांचे निवारण अधिकार्‍यांकडून झालेच पाहिजे. वाढीव बिल आल्यास ग्राहकांनी मागील सरासरीप्रमाणेच वीज बिल भरून त्याबाबतची लेखी तक्रार ग्राहक निवारण मंचाकडे करणे आवश्यक आहे. कुठलाही ग्राहक नवीन वीज कनेक्शन घेत असेल तर त्याने केवळ महावितरणकडे प्रोसेसिंग फी, सर्व्हिस चार्ज व डिपॉझिटची रक्कम भरणे याशिवाय अन्य काहीही करायचे नाही. त्यापुढील सर्व खर्च कंपनीनेच करणे बंधनकारक आहे. मीटर, पोल, सर्व्हिस लाईन यासाठी ग्राहकाने कोणत्याही प्रकारचे पैसे महावितरणला भरणा करायचे नाहीत. मीटर किंवा अन्य साहित्य महावितरणकडे उपलब्ध नसल्यास आणि ते ग्राहकांनी विकत घेतले असल्यास त्याची रक्कम महावितरणने ग्राहकाला देणे बंधनकारक आहे; अन्यथा ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकता. एक घर असेल तरी महावितरणने त्या घरापर्यंत वीज मागणीनुसार नेलीच पाहिजे. त्यासाठी ग्राहकाला एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. मीटर नादुरुस्त झाल्यास त्याची तपासणी महावितरणने त्याच्या समक्ष करणे बंधनकारक आहे." निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. फड, महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी या मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
………….
चौकट
ग्राहकांनी वाचला समस्यांचा पाढा
यावेळी कुडाळ शहरासह तालुक्याती वीज ग्राहकांनी समस्यांचा पाढा होगाडे यांच्या समोर वाचला. यावेळी महावितरणचे अधिकारी विनोद विपर यांनी मोठ्या कसरतीने उत्तरे देण्याचे प्रयत्न केले. प्रसाद शिरसाट, पी. डी. शिरसाट, सदासेन सावंत, मोबीन दोस्ती आदींसह अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी महावितरणच्यावतीने विविध स्टॉल लावण्यात आले होते. या ठिकाणी तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या. काही तक्रारींचा निफटारा त्याच ठिकाणी करण्यात आला. हुगाडे यांच्या हस्ते एका महिला ग्राहकाला वीज मीटर अधीक्षक अभियंता विनोद पाटील, महासंघाचे नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर व श्रीराम शिरसाट यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
……………
चौकट
मेळाव्यात १२७ तक्रारी प्राप्त
या मेळाव्य़ात वीज देयकांच्या १७, मीटरच्या १०० आणि इतर १० अशा एकूण १२७ तक्रारी प्राप्त झाल्या. यातील नादुरुस्त मीटरच्या तक्रारी महावितरणच्या सहयोगाने तत्काळ जागेवर मीटर देऊन निकाली काढण्यात आल्या. बिलिंग व इतर तक्रारींचा निपटारा १५ दिवसांत करून ग्राहक तसेच व्यापारी संघटनेला कळविण्यात येईल, अशी माहिती तालुकाध्यक्ष शिरसाट यांनी दिली.
……………..
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares