शेतकरी, कामगारांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढून घेताहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल – My Mahanagar

Written by

You subscribed MyMahanagar newsletter successfully.
Something went wrong. Please try again later.
नांदेड – हा देश तपस्वींचा आहे, महापुरुषांबरोबरच शेतकरी, कष्टकरी हेसुद्धा तपस्या करत आहेत पण मोदींच्या राजवटीत त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही. स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतीच्या औजारांवर, खतांवर कर लावला आहे. देशात पैशाला काही कमी नाही. शेतकरी, कामगार यांच्या खिशातून मोदी खो-याने पैसे ओढून घेत आहेत आणि दोन-चार उद्योगपतींना देऊन टाकतात पण शेतक-यांना कर्जमाफी मिळत नाही, असा घणाघाती हल्ला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केला.
नवा मोंढा मैदानावर जाहीर सभेसाठी भव्य व्यासपीठ बनवण्यात आले होते. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राहुल गांधी व मान्यवर नेत्यांनी अभिवादन केले.
जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, नोटबंदींचा निर्णय चुकला तर मला चौकात फाशी द्या असे मोदी म्हणाले, डोळ्यात अश्रूही आले पण नोटबंदी अपयशी ठरली, काळा पैसा संपला का ? पंधरा लाख रूपये आले का ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत. पंधरा लाख जसे गायब झाले तसेच हे उद्योगही गायब झाले.
यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देशात आज द्वेषाचे बिज पेरले जात आहे. समाजा-समाजात, जाती धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. महात्मा गांधी, पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद या सर्वांनी विविधतेत एकता हीच देशाची खरी ओळख सांगितली व जपली. देशातला तरुण नोकरीसाठी भटकत आहे पण मोदी सरकार त्यांना नोक-या देत नाही. देशात 30 लाख सरकारी जागा रिक्त आहेत पण नियुक्ती पत्र केवळ 75 हजार लोकांनाच दिली, कुठे गेले दरवर्षी 2 कोटी रोजगार ? आज देश तोडण्याचे काम सुरू असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्यासाठी निघाले आहेत. काँग्रेसला शिव्या दिल्याशिवाय भाजपाचा दिवसच जात नाही. सकाळ झाली की त्यांचा दिवस शिव्यानेच सुरू होतो. तुम्हाला शिव्या देणारे हवे आहेत का देशाची सेवा करणारे हवे आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला.
नाना पटोले म्हणाले की, ही पदयात्रा फक्त काँग्रेस पक्षाची नसून देश जोडण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाची आहे. देशासाठी लढणारा गांधी परिवार आहे. या कुटुंबाने देशासाठी दोन बलिदान दिली आहेत. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून तरुणांना नवा संदेश दिला आहेत. पहाटे उठून ते चालत आहेत, यातून एक सुदृढ भारत निर्माण होईल. शेतकरी, सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन राहुल गांधी देशभर पदयात्रा करत आहेत.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, आज एका अभूतपूर्व घटनेचे आपण साक्षीदार झालो आहोत. राहुल गांधींच्या पदयात्रेला जनता उत्स्फूर्त पाठिंबा देत आहे. ते एकतेचा संदेश घेऊन निघाले आहेत. महात्मा गांधींच्या दांडी यात्रेवरही टीका केली होती पण देश त्यांच्या पाठीमागे उभा राहिला व क्रांती घडली. भारत जोडो यात्राही क्रांती घडवेल. या पदयात्रेने देशात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे. देशाचा इतिहास लिहिताना राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा सुवर्ण अक्षरांनी लिहीली जाईल.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशिर्वाद घेऊन राहुल गांधी पुढे निघाले आहेत. जनतेच्या समस्या ते ऐकून घेत आहेत. नांदेडमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. सर्व समाज घटकांच्या लोकांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. आव्हानांना न डगमगता थेट भिडणारे नेते राहुल गांधी आहेत. देशातील आजची राजकीय परिस्थिती गंभीर आहेत, गलिच्छ राजकारण सुरू असून राजकीय स्तर खालावला आहे. विरोधकांचे गळे कापण्याचे काम केले जात आहे. देशात एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. देशात लोकशाही टिकली पाहिजे यासाठीच भारत जोडो यात्रा निघाली आहे. देशात अनेक समस्या आहेत, महागाई, बेरोजगारी प्रचंड मोठी समस्या आहेत. सामान्य जनता भरडली जात आहे पण त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, या देशात वर्षानुवर्षापासून विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत, गंगा जमुना तहजीब देशात होती पण 2014 पासून चित्र बदलले असून गंगा जमुना तहजीबला नख लावण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्राला थोर समाजसुधारक व महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राला एक विचार आहे, संस्कृती आहे. 2014 नंतर नवा भारत उदयास आला आहे. मुलींनी कोणते कपडे घालावेत हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहेत.
यावेळी राहुल गांधी यांचा शेतकरी फेटा बांधून व बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोंगडं, काठी तसेच संविधान व विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी व्यासपीठावर ठेवलेला नगारा वाजवून सभेची सुरुवात करण्यात आली.
आजच्या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी वेणुगोपाल, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंह, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे ,माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, बंटी पाटील, खा. रजनी पाटली, खा. कुमार केतकर, खा. सुरेश धानोरकर, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी, आ. अमर राजूरकर, डी. पी. सावंत, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एस. सी विभागाचे सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, संपतकुमार, हुसेन दलवाई, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओंना न्यायालयाचा दणका, नेमकं प्रकरण काय?
 
ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares