ऊस दरासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या – Dainik Prabhat

Written by

कोपर्डे हवेली – सर्व पक्षांतील कारखानदारांची युती असल्याने कारखानदारांची ऊस दाराबाबतची एकी दिसून येते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनीही गट-तट विसरुन, सर्व राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून ऊस दरासाठी एकत्र यावे. तरच ऊसाला योग्य भाव मिळेल, असे आवाहन माजी मंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केले.
कोपर्डे हवेली ता. कराड येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित पहिल्या ऊस परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी विद्याधर चव्हाण होते. यावेळी शेतकरी नेते सचिन नलवडे, गिरीश देशपांडे, सुदाम चव्हाण, भरत चव्हाण, विनायक जाधव, विश्वास जाधव, रोहित जाधव, रविंद्र पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
श्री खोत म्हणाले, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले. या साखरसम्राट रुपी रेड्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते ऊसाचा दर बोलायला लागणार नाहीत. मायबापाच्या घामासाठी, ऊस दरासाठी शेतकऱ्यांना लढावं लागेल. इतिहास हा लढणारांचा, मर्दांचा होतो. शेजारच्या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी चांगला दर जाहीर केला असताना आपले कारखानदार बोलायला तयार नाहीत. दोन कारखान्यातील 25 किलोमीटर अंतराची अट काढून टाकल्यास साखर कारखान्यांची संख्या वाढून त्यांच्यात ऊस दरवाढीची स्पर्धा लागेल. ही शेता-भाताची लढाई आता गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी हातात घेतली पाहिजे. हा माझ्या माय-बापाचा, काळ्या आईचा लढा आहे; असे समजून सागळ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
सचिन नलवडे म्हणाले, ज्या यशवंतराव चव्हाणांनी सहकाराचा पाया रचला. सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशा दिली. त्यांच्याच नावाने सहकाराकडे बघितले जाते. परंतु, आज त्यांच्याच जिल्ह्यात वा तालुक्‍यात सहकाराच्या नावाखाली कायदा तुडवला जातोय. कारखानदार ऊसाचा दर जाहीर करत नाहीत. परंतु, कारखानदारांनी दर जाहीर न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. ऊसाला 3 हजार 500 रुपये दर दिल्याशिवाय ऊसाला कोयता लावून देणार नाही, तसेच कारखानदारांना रस्त्यावर फिरुनही देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रस्तावना सुदाम चव्हाण यांनी केली. अजिंक्‍य शेवाळे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी राजाचा पोतराजा झालायं
शेतकरी एक मोठी बाजारपेठ आहे. परंतु, त्याचा पैसा स्विस बॅंकेत न जाता तो खेडे गावात, शहरात, बाजारपेठेत येतो आणि त्याच्या अवतीभवती सर्वांकडे तो जातो. शेतकरी सुखी झाला की, त्याच्या अवतीभवतीचा संपूर्ण समाज सुखी होतो. म्हणूनच त्याला शेतकऱ्याला राजा म्हणतात. परंतु, कारखानदारांकडून त्यांची पिळवणूक होत असून अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांनी ग्रासला आहे. त्यामुळे शेतकरी आता राजा राहिला नसू तो पोतराजा झाला आहे, अशी खंत व्यक्त करत ही परिस्थिती बदलण्यासाठी व ऊसाला योग्य भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनीही गट-तट विसरून एकत्र येऊन लढा द्यायला हवा, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.
… असे होणार आंदोलन
ऊस दरासाठी पहिल्या टप्प्यात कोपर्डे हवेली येथील सिध्दनाथ मंदिर ते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळापर्यंत पायी यात्रा करण्यात येणार आहे. समाधीस्थळी “ऊसाला चांगला दर जाहीर करण्याची सुबुद्धी कारखानदारांना मिळो’ असे साकडे चव्हाण साहेबांना घालण्यात येनार्त आहे. तर दुसऱ्या टप्प्यात गोमुत्राच्या कावडी व कळश वाजत गाजत घेऊन कारखानदारांच्या घरावर आणि अंगावर शिंपडून अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही या ऊस परिषदेत देण्यात आला आहे.
गेल्या 5 वर्षांपासून ऊस दर वाढण्याऐवजी कमी होत आहे. 3200 वरुन ऊस दर 2800 वर आला आहे. ऊसापासून साखरेबरोबर कारखान्यात अनेक प्रकारचे उपपदार्थ बनवले जातात. त्याचा हिशोब कारखानदार देत नाहीत. मात्र, ऊसाला योग्य दर जाहीर न केल्यास आम्ही सर्व शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ.
– भरत चव्हाण(शेतकरी, कोपर्डे हवेली).

ईपेपरराशी-भविष्यकोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares