झोपेशिवाय आयुष्य नीट जगता येऊ शकतं का? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
आपण अत्यंत धावपळीचं आयुष्य जगत असतो. करण्यासारखं खूप काही असतं.
नोकरी, लोकांना भेटणं, कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवणं, ई-मेल, फेसबुक पाहणं, मोबाईल आणि OTT प्लॅटफॉर्मला चिकटून राहणं वगैरे वगैरे.
आपल्या वेगवान आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात. पण त्यासाठी वेळ मात्र पुरत नाही.
जास्तीत जास्त गोष्टी करण्याच्या प्रयत्नात एक गोष्ट मात्र कमी होताना दिसत आहे. ती म्हणजे आपल्या झोपेची वेळ.
कोणत्याही मित्राला आपण विचारतो, कसं काय, बरंय का?
बहुतांश वेळा ऐकायला मिळतं, “थकलो आहे.”
झोपेच्या कमतरतेमुळे जगभरातच चिंता व्यक्त केली जात आहे. एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार झोपेच्या कमतरतेमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला वार्षिक चार खर्व डॉलरचं नुकसान सोसावं लागत आहे.
थकव्याचा आपल्या झोपेशी खूप खोलवरचा संबंध आहे. पण झोप घेतल्याशिवाय माणूस ताजातवाना राहू शकतो का, हा खरा प्रश्न आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमधील सहायक प्राध्यापक डेव्हिड सॅमसन म्हणतात, “सुमारे सात महिने मी रात्रभर जागून काम करायचो. एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला तुमचं लक्ष्य प्राप्त करायचं असेल तर तुमच्यात ती चिकाटी असायला हवी.”
डेव्हिड सॅमसन विद्यार्थी दशेत असताना त्यांनी आपल्या झोपेचा त्याग केला होता. आता ते जैवशास्त्रज्ञ म्हणून दुर्गम जंगलांचे दौरे करतात.
एप प्रजातीचं वानर किती झोपतं याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सुमारे दोन हजार तासांच्या व्हीडिओंचं विश्लेषण केलं.
डेव्हिड यांना क्रमिक विकास आणि झोप यांच्यातील संबंध तपासून पाहायचा आहे.
एप वानर 9 ते 16 तासांची झोप घेतं. डेव्हिड सॅमसन यांनी या माहितीच्या आधारावर एक समीकरण तयार केलं. मानवी विकासाची प्रक्रिया इतर वानरांपेक्षा वेगळी नसल्यास किती तासांची झोप त्यांना आवश्यक असेल, याचा त्यांना अनुमान वर्तवला आहे.
डेव्हिड सॅमसन म्हणाले, “माणसाला 24 तासांत किमान 10.3 तासांची झोप आवश्यक आहे. मात्र आपण तेवढी झोप घेत नाही. आपली झोप सरासरी 6 ते 7 तासांची आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
झोप महत्त्वाची असते.
डेव्हिड सांगतात, गाढ झोप अनेक अर्थांनी महत्त्वाची असते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी, भावनांवर नियंत्रण राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
डेव्हिड सॅमसन यांच्या अभ्यासानुसार, हा बदल 18 लाख वर्षांपूर्वी झाला होता. आपले पूर्वज झाडावरून उतरून खाली राहू लागले होते. त्यामुळे त्यांना झाडावरून पडण्याची भीती नव्हती. झोपडी आणि आगीच्या शोधामुळे झोप आणखी गाढ झाली.
कमी वेळ झोपण्याचा एक अर्थ म्हणजे आपल्याला इतर कामे करण्यास अधिक वेळ मिळतो. एक प्राणी म्हणून यामुळे उत्पादनक्षमता वाढली.
डेव्हिड सॅमसन यांनी आपल्या पूर्वजांच्या झोपेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी फिटबिट नामक एका मॉनिटरचा प्रयोग केला. टाझांनियातील एका जातीसमूहाच्या लोकांच्या हाताला हे उपकरण बांधलं गेलं.
डेव्हिड सॅमसन म्हणाले, “ते रात्री 6 ते साडेसहा तास झोपतात. तर दिवसा काही वेळेसाठी डुलकी घेतात. 24 तासांत एकूण मिळून ते 7 तासांची झोप घेतात, असं आपण म्हणू शकतो.”
फोटो स्रोत, Getty Images
झोपेत काही अडथळा येतो का, असा प्रश्न डेव्हिड सॅमसन यांनी टांझानियाच्या लोकांना विचारला. उत्तर होतं, “नाही.”
डेव्हिड यांनी मादागास्करच्या शेतकऱ्यांचंही निरीक्षण केलं. ते लोकही सरासरी 7 तासांचीच झोप घेत होते. मात्र तेथील 60 टक्के लोकांनी झोपेबाबत तक्रार केली.
डेव्हिड म्हणतात, “मादागास्करचे शेतकरी वेळापत्रकाचं पालन काटेकोरपणे करतात. विशिष्ट वेळी जागतात, ठरलेल्या वेळी काम करतात. नंतर ठरलेल्या वेळीच झोपी जातात.”
दुसरीकडे, टांझानियाच्या लोकांची शैली वेगळी आहे. याविषयी सॅमसन म्हणतात, “त्यांच्या जीवनात लवचिकता आहे. विशेषतः त्यांच्या कामांच्या वेळांच्या संदर्भात. त्यांना झोपेविषयक समस्या नाहीत. त्याच्याशीही कुठे ना कुठे त्याचा संबंध आहे.”
औद्योगिकीकरणानेसुद्धा मानवी झोपेवर परिणाम झाला आहे.
अमेरिकेच्या व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतील प्रा. रॉजर इकर्च हे 1980 च्या दशकाच्या मध्यात औद्योगिकीकरणापूर्वीच्या नाईट लाईफवर एक पुस्तक लिहित आहेत. हा तोच काळ होता, जेव्हा वीज नव्हती.
आपण पूर्वी ज्या पद्धतीने झोप घेत होतो, तशीच झोप आता घेत आहोत. म्हणजे एकाच वेळी आपण झोप पूर्ण करतो, असं रॉजर इकर्ज यांचं मत होतं. पण अभ्यासादरम्यान वेगळीच माहिती समोर आली.
इकर्च म्हणतात, “मला फर्स्ट स्लीप म्हणजेच झोपेच्या पहिल्या टप्प्याबाबत माहिती मिळाली. तसंच दुसऱ्या टप्प्यातील झोपेबद्दलही माहिती कळली. लोक अर्ध्यारात्री उठतात आणि ज्या गोष्टींचा विचार करू शकतो, ती सगळी कामे करू शकतो.”
रॉजर इकर्च यांनी केलेल्या अभ्यासात टप्प्याटप्प्यात घेतल्या जाणाऱ्या झोपेबाबत माहिती मिळाली. ते सांगतात, चार्ल्स डिकेंस यांच्यापासून ते टॉलस्टॉय यांच्यापर्यंत युरोपातील प्रत्येक प्रमुख कादंबरीकाराने झोपेच्या या पॅटर्नचा उल्लेख केला आहे.”
लोक पहिल्या आणि दुसऱ्या झोपेदरम्यान जे करतात, त्यामुळे जास्त रंजकता निर्माण होते. रॉजर इकर्च म्हणतात, “ही लोकांसाठी ही ध्यानधारणेसाठीची योग्य वेळ होती. ते आपण पाहिलेल्या स्वप्नाबाबत विचार करतो. त्यांच्याकडे अशी कोणतीच दुसरी वेळ नव्हती ज्यामध्ये इतकी शांतता असते.”
इतका अंधार, एकांतवास, गर्भधारणा करण्यासाठी हे अगदी प्राईम टाईमप्रमाणे आहे. 16 व्या शतकातील फ्रान्सचे फिजिशियन झुबैर यांच्या शब्दांत सांगितलं तर या वेळी युगुलांना प्रणयादरम्यान जास्त चांगला अनुभव आणि आनंद मिळतो.”
फोटो स्रोत, Getty Images
रॉजर इकर्च यांच्या मते, “केवळ दोन टप्प्यांमध्ये झोप पूर्ण करून घेणाऱ्या लोकांना थकवा जाणवतो असं नाही तर आजारपण आणि वातावरणातील समस्यांमुळे अनेक जण झोप पूर्ण करू शकत नाहीत.” 19 व्या शतकात झोपेशी संबंधित सवयी बदलण्यास सुरुवात झाली. इथूनच दोन टप्प्यात झोपण्याची सवय लागत गेली.
औद्योगिक क्रांतीच्या काळात वेळ ही पैशापेक्षाही जास्त मौल्यवान होत गेली. कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता यांना महत्त्व दिलं जाऊ लागलं.
लवकर उठण्याची मोहीम याच काळात राबवण्यात आली. रॉजर इकर्च म्हणतात, “लोकांना लवकर उठवण्यासाठी त्यावेळी अलार्मवालं पलंग बनवण्यात आलं होतं. अलार्मचा गजर वाजल्यानंतर पलंगाच्या खालची बाजू आपोआप खाली जायची. खालील बाजूस थंड पाण्याचा टब ठेवलेला असायचा. झोपलेल्या व्यक्तीचे पाय पाण्यात जाऊन तो आपोआप जागी व्हायचा.” हे एकमेव तंत्रज्ञान नव्हतं. तर औद्योगिक विकासासासाठी झोपेशी लढा देण्यासाठी कृत्रिम प्रकाशासारख्या अनेक गोष्टी सुरू झाल्या.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रा. मॅथ्यू वॉकर म्हणतात, “मी बोलत असताना लोकांना झोप आल्यास किंवा त्यांनी जांभई दिल्यास मी नाराज होणार नाही.”
प्रा. वॉकर यांनी झोपेबाबत जवळपास सगळा अभ्यास केला आहे. त्यामुळे झोपेची पद्धत कशी बदलत गेली, याबाबत त्यांना माहीत आहे, असं ते म्हणतात.
ते सांगतात, “1940 च्या दशकात लोक प्रत्येक रात्री 8 तासांपेक्षा काही तास जास्त झोपायचे. आधुनिक युगात आपली झोप घटून 6.7 किंवा 6.8 तासांची झाली आहे. 70 वर्षांत आपल्या झोपेत लक्षणीय घट झाल्याचं दिसून येत आहे. सुमारे 20 टक्के घट या टप्प्यात झाली.”
प्रौढांची झोप कमी होण्याची सध्याच्या आधुनिक जगात अनेक कारणे आहेत. कॅफीन आपल्याला जागवतं. अल्कोहोल स्वप्न पडण्यापासून रोखतं.
खरं तर चांगली झोप मिळण्यासाठी खूप साऱ्या सुविधा आता उपलब्ध आहेत. चांगल्या गाद्या, वातानुकूलित घर आहे पण वातावरणावर नियंत्रण मिळवण्यात आपण कमी पडत आहोत.
मॅथ्यू वॉकर म्हणतात, “लोकांना आश्चर्य वाटेल, पण याचं एक कारण सेंट्रल हिटिंग आणि सेंट्रल एअरकंडिशनिंग आहे. सूर्य मावळल्यानंतर तापमान कमी होतं, उगवला की वाढतं.”
तापमानातील या बदलाची जाणीव शरीराला होत असते. मात्र आपण नैसर्गिक संकेतांपासून दूर चाललो आहोत. तंत्रज्ञानामुळेही फरक पडतो. केवळ कृत्रिम प्रकाशच नव्हे तर अनेक उपकरणांच्या वापराने झोपेवर परिणाम होतो.”
ते पुढे सांगतात, “LED मधून निघणारा निळ्या रंगाचा प्रकाश मेलॅटोनिन नामक संप्रेरक स्त्रवण्यापासून रोखतं. याच संप्रेरकातून तुम्ही कधी झोपायला हवं, याचा संदेश मिळत असतो. याशिवाय आपण जास्त काम करावं, असा एक आर्थिक आणि सामाजिक दबावही असतो.”
प्रा. वॉकर यांच्या मते, सातपेक्षा कमी तास झोप घेण्याचे आरोग्यावरील परिणाम दिसू लागतात. विकसित जगात आपल्याला कर्करोग, लठ्ठपणा, मधुमेह, तणाव, आत्महत्येची इच्छा होणं आदी आजारांची लक्षणे दिसून येतात. त्याचा झोपेशीही संबंध आहे.”
त्यांच्या मते, सुमारे 65 टक्के लोकांना जास्त झोपायचं असतं. 1980 च्या काळात 30 टक्के लोक असं बोलत असत. कारण त्यावेळी लोक जास्त झोप घेत असत.
फोटो स्रोत, Getty Images
लेखिका जेसा गँबल म्हणतात, “जास्त झोपण्याचा संबंध आपल्या दीर्घायुष्याशी आहे.” झोप आणि स्वप्न गायब होत असताना एकेदिवशी मानवाला झोपेची गरज उरणार नाही का, असं गँबल यांना वाटतं.
नॅन्सी क्रेस यांचं एक पुस्तक वाचताना त्यांना हा विचार आला. त्या म्हणतात, त्यांनी एका अशा जगाची रचना केली आहे, ज्यातील कनिष्ठ पातळीतील लोकांनाच केवळ झोपेची गरज असायची. त्यांच्यावर राज्य करणाऱ्या लोकांनी आपल्या गुणसूत्रांमध्ये बदल करून झोपेची आवश्यकता नाहीशी केली होती.”
हे वाचून मला वाटतं की खरंच असं करण्यासाठी अनेक लोकांचा प्रयत्न सुरू आहे.
शास्त्रज्ञ या दिशेने काय करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी गँबल माहिती घेत आहेत.
जर, झोप ही निरर्थक गोष्ट असली असती तर आपल्या विकासात तिची कोणतीच आवश्यकता नाही. आपल्याला कमी वेळ झोपायचं असेल तर आपण घेत असलेली झोप अतिशय गाढ असली पाहिजे.
फोटो स्रोत, Getty Images
त्यासाठी पिंक नॉईसचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे रेडिओ ऐकत असताना स्टेशन बदलून दुसरं लावत असताना येणारा खर-खर असा आवाज.
गँबल यांच्या मते, तुम्ही सलग हा पिंक नॉईस ऐकला तर ते तुम्हाला झोपेपर्यंत पोहोचवू शकतं. यामुळे सकाळी तुम्ही जास्त ताजेतवाने होऊन उठू शकाल.” गँबल म्हणतात, “चुंबकाच्या साहाय्याने मेंदूपर्यंत विद्युत ल
हरी पोहोचवणं मला भीतीदायक वाटतं. पण कदाचित ते प्रभावीही ठरू शकतं. मात्र अजून हा प्रयोग पूर्णपणे प्रयोगशाळेपुरताच मर्यादित आहे.
मात्र, पिंक नॉईज निर्माण करणारी उपकरणे लवकरच बाजारात दाखल होतील, असं त्यांना वाटतं. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या झोपेचा त्याग करण्यास आपण तयार असतो. मात्र आर्थिक आणि सामाजिक बदलांमुळे आपल्या झोपेवर नक्की परिणाम झाला आहे.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या बळावर झोप आणखी एक-दोन तास कमी करण्याबाबत संशोधन सुरू आहे. पण कदाचित भविष्यात जागते पणातच झोपेची भरपाई होऊ शकेल, असंही होऊ शकेल.
आगामी काळात तशा पद्धतीचं संशोधन होऊही शकतं. पण तोपर्यंत आपल्याला शांत झोप घेऊन चांगली स्वप्न पाहत राहणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे.
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares