‘वनवासा’त आंबा, काजु कलमांमुळ आर्थिक ‘बहर’ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
संदीप साळवे : जव्हार
पालघर जिल्ह्यात भातलावणीची कामे उरकली की आदिवासींची पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरू होते. पण या गोष्टीला अपवाद आहे ,जव्हार तालुक्यातील वनवासी हे गाव. ज्या वनवासी गावात एकेकाळी बाप आपली मुलगी देण्यास तयार होत नसे, कारण त्या गावात पाण्याच्या समस्यांपासून रस्ते व दळणवळणाच्या समस्या आणि रोजगाराची वानवा होती. पण हे गाव ‘बायफ’ संस्थेच्या मदतीमुळे कलम बनविणारे गाव’ असे ओळखले जाऊ लागले आहे. यामुळे या गावाचा कायापालट होऊन शेती क्रांती घडून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला आहे.
पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासी बांधव शेती, मजुरी यापासून उदरनिर्वाह करीत आहेत. अशातच जव्हार शहरापासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘वनवासी’ या गावात गरिबी आणि अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेले होते. येथील शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर आणि निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहत भात शेतीची कामे करत होते. पण यामुळे त्यांना अत्यंत अल्प उत्पन्न मिळत होते. पण १९९३ साली जव्हार तालुक्यात बायफ संस्था सुरू झाली. या संस्थेने अनेक गावांतील मोजक्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना आंबा व काजू या रोपांची कलमे देण्याचे काम केले. साधारणपणे १९९७ साली बायफ या संस्थेकडून जव्हार तालुक्यातील वनवासी या गावाची निवड करण्यात आली. तेव्हा या गावातील काशिनाथ गावित व मोहन किरकिरा या दोन शेतकऱ्यांना आंब्याची २०, काजूची ३० तर पेरूची १० अशी कलमे दिली. या कलमांचे संवर्धन करण्यासाठी संस्थेने वर्षांला ८०० रुपयेही दिले, त्यानंतर १९९८ साली संस्थेने याच शेतकऱ्यांना १२८ बंगलोरी मोगऱ्याची रोपे ही फुलशेती हा जोडधंदा करण्यात येऊन आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून देण्यात आली. मोगरा लागवडीतून सात महिन्यांत या शेतकऱ्यांनी दिवसाला एक किलोपर्यंत मोगऱ्याचे उत्पादन मिळायला सुरुवात केली. या फुलांची विक्री तालुक्याच्या ठिकाणी करून त्यांना प्रति किलो ४० ते ५० रुपये एवढा बाजार भाव मिळाला. यातून आर्थिक भरभराटीला सुरुवात झाली.
सन २००४ साली संस्थेने मोगरा व आंबा या रोपांचे कलमे तयार करण्याचे प्रशिक्षण या दोन शेतकऱ्यांना दिले. प्रशिक्षण घेतल्यानंतर २००५ या सालापासून त्यांनी स्वत:ची कलमे स्वत: बनवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी जवळपास मोगरा व आंबा या झाडांची साधारणपणे ३५० कलमे तयार करून जवळच्या बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री केली. त्यांना यातून मोगरा कलमाला ३ रुपये व आंब्याच्या कलमासाठी १७ रुपये एवढा भाव मिळाला. गावातील इतरांनीही हे सगळे चित्र पाहिल्यानंतर तेही याकडे हळूहळू वळायला लागले. मोगरा व आंबा यांच्या कलम शेतीतून मिळणारा आर्थिक नफा पाहता साधारणपणे २०१० ते २०११ या कालावधीमध्ये वनवासी हे गाव पूर्णपणे या शेतीकडे वळाले.
……
वर्षाला पाच लाख कलमांची विक्री
वर्षांपोटी या गावात जवळपास आंब्याची एक लाख ते पाच लाख कलमे तयार करून त्यांची विक्री केली जाते. या कलमाची किंमत प्रति कलम ७० ते ८०, तर दोन वर्ष असल्यास १४० ते १५० रुपये मिळतात, या ठिकाणी केशर, राजापुरी, सुवर्ण रेखा, हापूस इत्यादी जातीचे आंबा कलमे तयार केली जातात. तसेच मोगऱ्याची बंगलोर जातीची कलमे तयार करून कलमांची विक्री केली जाते. या कलमाची किंमत प्रति कलम ९ रुपये एवढी मिळते.
….
वनवासी गावात सर्व प्रथम दिवंगत देवराम किरकिरे यांना वाडी प्रकल्पाच्या माध्यमातून परिवर्तनशील शेती सुरू केली. यात यश देखील प्राप्त झाले, आज जिल्हाभरात सर्वाधिक कलमे ही आमची गावातून बनविली जात आहेत.
प्रतीक्षा किरकिरे, प्रगत शेतकरी, वनवासी

मोगरा व आंबा यांच्या कलम बांधणीतून आम्हाला वर्षांपोटी चांगले उत्पन्न मिळते, शिवाय स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असल्याने आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमची मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत.
मोहन किरकिरे, शेतकरी

संपूर्ण गावात वर्षांला मोगऱ्याची, आंब्याची, काजूची व पेरूची लाखो कलमे बनवून विक्री केली जात आहेत, त्यामुळे वनवासी गावात वार्षिक उलाढाल ही चांगली होत आहे.

काशीनाथ गावित, शेतकरी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares