कोरडवाहू जमिनीत सीताफळ उत्पादन फायदेशीर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
बेल्हे, ता. १३ : आणे (ता. जुन्नर) येथील शेतकरी रामदास पांडुरंग आहेर हे आपल्या दीड एकर कोरडवाहू जमिनीत कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळ फळपीक लागवडीतून, दरवर्षी योग्य व्यवस्थापन करून काही लाखात उत्पन्न मिळवत आहेत. यावर्षी सतत पर्जन्यवृष्टी होऊनही कोरडवाहू जमिनीत सीताफळ शेती फायदेशीर ठरत असल्याचे रामदास आहेर यांनी दाखवून दिले आहे.
नारायणगावचे कृषी विज्ञान केंद्र व सीताफळ बागायतदार महासंघ यांनी वेळोवेळी घेतलेल्या कार्यशाळांमुळे आहेर यांना सीताफळ छाटणी, खते व औषध व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन मिळाले. यामुळे त्यांना सीताफळ पीक व्यवस्थापनाचे तंत्र चांगले अवगत झाले आहे. याकामी त्यांना त्यांचे पुत्र व सीताफळ बागायतदार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप आहेर यांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर ९ फूट बाय १३ फूट या अंतरावर सीताफळ लागवड करून, दीड एकर क्षेत्रात एकूण सहाशे झाडे लावलेली आहेत.
आतापर्यंत त्यांना प्रत्येक झाडामागे सरासरी २० किलो सीताफळ उत्पादन मिळत असून, कमीत कमी ५० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. प्रतिझाड एक हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते असा त्यांचा दावा आहे. इतर पिकांच्या तुलनेत सीताफळ पिकाला मेहनत कमी लागते व उत्पादन खर्चही कमी येतो. कमी पाणी असले तरीही ठिबक सिंचन पद्धतीने सीताफळ उत्पादन घेता येते. जुन्नर तालुक्याच्या पठार भागावर या पिकासाठी सुयोग्य जमीन व वातावरण आहे.
सध्या सीताफळ पिकाला प्रतवारीनुसार प्रतिकिलो ५० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्यांची मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकाला चांगली मानवत आहे. यावर्षी सतत पाऊस असूनही जमिनीत पाणी साचून राहिले नाही. दरम्यान इतर ठिकाणी मोठी पर्जन्यवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले, मात्र याठिकाणी पाणी साठून राहण्याची समस्या जाणवली नाही. तसेच पीकही चांगले जोमदार आले
– रामदास आहेर, सीताफळ उत्पादक
सीताफळ पिकाच्या योग्य नियोजनासाठी तसेच या पिकाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी, सीताफळ बागायतदार संघ कायम प्रयत्नशील आहे.
-प्रदीप आहेर, पुणे जिल्हा अध्यक्ष, सीताफळ बागायतदार संघ
01610
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares