Bharat Jodo : भारत जोडो यात्रेवरून लक्ष विचलित करण्यासाठी घडवल्या 'या' घटना? – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
७ नोव्हेंबरपासून राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. पण त्याच वेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरुन लक्ष विचलित करण्यासाठी राज्याच्या राजकारणातही मोठ्या राजकीय घटना घडलेल्या दिसताहेत. आता या घटना मुद्दामहून घडवण्यात आल्या की निव्वळ योगायोग आहे, असा प्रश्न उपस्थित होतोय. (Rahul Gandhi News in Marathi)
हेही वाचा: हिंदुत्व म्हणजे 'फेअर अँड लव्हली क्रीम' नाही की…; कन्हैय्या कुमार यांंचं वक्तव्य
७ नोव्हेंबरच्या रात्री राहुल गांधी महाराष्ट्रात आले आणि तोच राज्याच्या राजकीय वर्तुळात गदारोळ माजवणाऱ्या घडामोडींना सुरुवात झाली. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत राज्यात भारत जोडो यात्रा असतानाच त्यादिवशी दुसऱ्या काय मोठ्या घटना घडल्या किंवा घडवल्या गेल्या ते पाहा…
पहिला दिवस – ७/११/२२
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस आणि महाराष्ट्रात घडल्या ३ घटना
१. सत्तारांचे सुप्रियाताईंबद्दल आक्षेपार्ह शब्द
२. आदित्य ठाकरे- श्रीकांत शिंदे सिल्लोडमध्ये समोरासमोर
३. जितेंद्र आव्हाडांचं हर हर महादेव चित्रपटाविरोधात ठाण्यात आंदोलन
राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात आली. आणि त्याच दिवशी सकाळी कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरुन राज्यात रान पेटवून दिलं. राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. याच दिवशी संध्याकाळी सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरेंचा शेतकरी संवाद आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार होती. त्यामुळे ते दोघेही सिल्लोडमध्ये आमनेसामने आले होते. आणि त्याच दिवशी रात्री राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाविरोधात विवियाना मॉलमधील सिनेमागृहात राडा केला.
हेही वाचा: Jitendra Awhad : आव्हाडांनी पूराव्यासह सांगितलं चित्रपटाला विरोध का? म्हणाले मारहाणीशी…
दुसरा दिवस – ८/११/22
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस आणि महाराष्ट्रात घडल्या या घटना
हर हर महादेव चित्रपटावरुन पेटलेलं रान शमवण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली
याच दिवशी सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या सत्तारांविरोधात राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ थेट राज्यपालांच्या भेटीला गेलं आणि इथे सत्तारांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आग्रही झालेली दिसली.
हेही वाचा: Bharat Jodo : नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठं? १० हजार फेटेधारी भारत जोडोमध्ये दाखल
तिसरा दिवस – ९/११/22
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस आणि महाराष्ट्रात घडल्या या घटना
१. संजय राऊतांची तुरुंगातून सुटका
एकीकडे महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा असताना दुसरीकडे खासदार संजय राऊतांचा जामीन मंजूर झाला. त्यामुळे १०३ दिवसांनंतर राऊत आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. त्यामुळे हा संपूर्ण दिवस राऊतांचा जामीन ते सुटका या बातम्यांनीच गाजला आणि सगळीकडे राऊत-राऊत राऊतच ऐकायला मिळालं
हेही वाचा: Shivsena: कीर्तिकरांना म्हातारपणात म्हातारचळ लागलंय; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची जहरी टीका
चौथा दिवस – १०/११/22
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा चौथा दिवस आणि महाराष्ट्रात घडल्या या घटना
१. अफजल खान कबरीशेजारील अतिक्रमणाचा वाद
२. संजय राऊत-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट
३. दिपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा
एकीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते, त्याच दिवशी सकाळी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरु झालं. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला. १०३ दिवसांनी सुटलेल्या संजय राऊतांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर तिकडे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरेंवर आरोप करत लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यामुळे माध्यमांमध्येही मिशन अफजल खान कबर आणि दिपाली सय्यद प्रकरण गाजलेलं दिसलं.
पाचवा दिवस – ११/११/२२
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा पाचवा दिवस आणि महाराष्ट्रात घडल्या या घटना
१. जगदंब तलवारीचा मुद्दा मुनगंटीवारांनी काढला
२. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी
३. जितेंद्र आव्हाडांना अटक
११ नोव्हेंबरची सकाळ उजाडली आणि तिकडे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी ब्रिटनमधून जगदंब तलवार परत आणण्याविषयी आशा बोलून दाखवली. कारण सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक आहेत. त्यामुळे जगदंब तलवारीचं राजकारण रंगत ना रंगतं तोच दुपारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. निमित्त होतं ते ७ नोव्हेंबरच्या विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणाचं. त्यानंतर सर्व माध्यमांचं लक्ष वेधलं गेलं ते ठाण्याकडे आणि मग शिवसेना नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले त्याची किरकोळ बातमीदारी झाली पण दिवस गाजवला तो आव्हाडांच्या अटकेनं
हेही वाचा: Himachal Election : हिमाचलमध्ये 65.50 टक्के मतदान; आता लक्ष निकालाकडे
सहावा दिवस- १२/११/२२
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा सहावा दिवस आणि महाराष्ट्रात घडल्या या घटना
राहुल गांधींची भारत जोडो यात्रेनं नांदेडमधून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. पण हा दिवसही आव्हाडांनीच गाजवला. कारण आव्हाडांना न्यायालयानं जामीन न देता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा ठाणे कोर्टात कायदेशीर घडामोडींना वेग आला.
तर, मागील ५-६ दिवस भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना या घटना घडल्या की घडवल्या गेल्या या विषयी प्रत्येकानं आपापल्या सद्सद् विवेक बुद्धीनं विचार करावा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares