ग्लायफोसेट तणनाशकवरील निर्बंधामुळे संभ्रम – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सासवड,ता. १२ ः आतापर्यंत शेतकरी स्वतःच आपल्यापरीने काळजी घेत विविध तणनाशके पिकात किंवा शेताच्या परिसरात फवारीत होते. मात्र, केंद्रीय कृषी मंत्रालयाने सर्वाधिक वापर होणाऱ्या ग्लायफोसेट या तणनाशक वापराबाबत नवे निर्बंधाचे आदेश काढल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढू लागली आहे. हे तणनाशक वापरताना ते `पेस्ट कंट्रोल ऑरेटर`च्या (पीसीओ) कडूनच हाताळले गेले पाहिजे व फवारले पाहिजे, अशी अट घातल्याने पीसीओची ग्रामीण भागात किती उपलब्धता होणार, खर्च किती वाढणार, काळाबाजार होणार का? यामुळे कृषी सेवा केंद्रातील या तणनाशकाच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांकडून शंका निर्माण झाल्या आहेत.
शेतीचे अतिवृष्टीत, रोग – कीडीने प्रचंड नुकसान झालेले असताना मजुरीचे दरही वाढलेले असताना.. तणनाशक वापरात `पेस्ट कंट्रोल ऑपरेटर`च्याद्वारे (पीसीओ) कसे काम साधायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरी वसाहती लगतच्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा ही तणनाशके वापरली जातात. त्यामुळे लोकवस्तीतील तन वाढीच्या बंदोबस्तातही हा प्रश्न निर्माण होणार आहे.
दरम्यान, शेतीकरिता किडनाशकाचे विक्रेते किंवा विकत घेणाऱ्या ग्राहकांना ग्लायफोसेट मिळणार नाही, असा समज झाला. कृषी आयुक्तालयानेही हे आदेश पुढे लागू केल्याने फर्टिलायझर्स पेस्टिसाईड्स सीड्स डीलर्स असोशिएशनचे शिष्टमंडळ यांनी नोव्हेंबरच्या प्रारंभी आयुक्तलयास निवेदन देत समस्येकडे लक्ष वेधले. दरम्यान, मानवी आरोग्य आणि जनावरांना निर्माण होणारे धोके लक्षात घेऊनच ग्लायफोसेटवर निर्बंध आले.
तणनाशक वापराचा अनुभव शेतकऱ्यांना कित्येक वर्षांचा आहे. त्यामुळे `पेस्ट कंट्रोल ऑपरेटर`च्याद्वारे तणनाशकाचा वापर करण्याची गरज कधीच भासली नाही. मग असेही म्हणावे लागेल की, केवळ वापर कसा करायचा हे माहिती असून चालणार नाही. तर ग्लायफोसेटबाबत सर्वच तांत्रिक ज्ञानबाबतही माहिती द्यायला हवी. दुर्गम भागात पीसीओ मिळणार कसे..?निर्बंध अंमलात आणण्यापूर्वी शेतकऱ्यांचा खर्च वाढणार नाही आणि सरकारने मग शेतकऱ्याला पीसीओ होण्याबाबत प्रशिक्षण व परवान्याची सोय का करू नये.
– संभाजी गरुड, कृषी पदवीधारक शेतकरी, बेलसर, ता. पुरंदर

विक्रीवर बंदी आणलेली नाही : झेंडे
केंद्रीय कृषी मंत्रालयाने किंवा राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या आदेशाबाबत गैरसमज करून घेऊ नये. ग्लायफोसेट हे तणनाशक उपलब्धच होणार नाही, हा गैरसमज काढून टाकावा. ग्लायफोसेट राज्यभर उपलब्ध आहे. त्याच्या विक्रीवर बंदी आणलेली नाही. तशा सूचना यंत्रणेच्या निरीक्षकांना दिल्यात. मात्र तणनाशकाचा वापर काळजीपूर्वक करावा. पाऊस अधिक दिवस व अतिवृष्टीचाही पाऊस जास्त पडल्याने तणाची समस्या सर्वत्रच कमी-अधिक आहे. प्रभावी तणनाशक वापरल्याशिवाय रब्बी हंगामाचे नियोजन व्यवस्थित होणार नाही. मात्र पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्समार्फत हे तणनाशक काळजीपूर्वक वापरावे, असे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रक) दिलीप झेंडे यांनी सांगितले.

02953
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares