अवंतिका लेकुरवाळे : समाजकारणातून राजकारणात – MSN

Written by

राजेश्वर ठाकरे
नागपूर : लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार राजकीय नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवण्यापेक्षा आपणच राजकारणात येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारणात उडी घेणाऱ्या काँग्रेस नेत्या व जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे या ग्रामीण भागातील पक्षाचा उच्चशिक्षित चेहरा म्हणून पुढे आल्या आहेत.
हेही वाचा… रामचंद्र तिरुके : कुशल संघटक
चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील जवराबोडी येथे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व उच्च शिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या अवंतिका यांची राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. मात्र महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्याची आवड होती. विवाहानंतर नागपुरात आल्यावर कचराघर, मालकी हक्काचे पट्टे, शेतीसाठी पाणी या मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांकडे त्यांना जावे लागत होते. हे त्यांच्या मनाला रुचले नाही. सर्वसामान्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी नेत्यांकडे वारंवार जाण्यापेक्षा आपणच राजकारणात येऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी का पाठपुरावा करू नये, असे त्यांना वाटू लागले. याच भावनेतून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकांविषयी आस्था व त्यांच्यासाठी काम करण्याची तळमळ बघून काँग्रेसने त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या वडोदा (ता. कामठी) या जि.प. सर्कलमधून विजयी झाल्या. त्यांनी तीन विषयात पदव्युत्तर पदवी, बी.एड. आणि व्यवस्थापनातील पदविका घेतली आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सोबतच प्रारंभी एका खासगी शिकवणी वर्गात काम केले. नंतर स्वत:चे वर्ग सुरू केले. नंतर शाळाही काढली. हे करताना जोडीला सामाजिक आंदोलन सुरू ठेवले.
हेही वाचा… मनोज मोरे : प्रस्थापितांशी संघर्ष
नागपूर जिल्ह्यातील तरोडी येथे एका सामान्य कुटुंबात विवाह होऊन आल्यानंतर त्यांना आंदोलनाला अधिक धार मिळाली. २००२ मध्ये वाठोडा परिसरातील १७ कुटुंबीयांच्या घरांसाठी लढा दिला. त्यापूर्वी पुरुषोत्तम शहाणे यांच्या नेतृत्वाखालील १९९७ मध्ये झालेल्या कत्तलखान्याच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनात त्या सक्रिय सहभागी होत्या. १७ मध्ये त्या शेतकऱ्यांचे पाणी खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला देण्याच्या विरोधात उपोषण केले. हे आंदोलन गाजले होते. येथूनच त्यांचा राजकारणात प्रवेश सुरू झाला. २०१७ मध्ये कामठी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. सध्या त्या जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आहेत. त्या राजकारणात येऊन जनतेच्या प्रश्नावर धडाडीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी नागपूर जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे. अभिन्यास विकासकांनी अनधिकृत भूखंड विकून सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा मुद्दा लावून धरत आहेत. त्यातील काहींना रक्कम परत मिळवून दिली आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares