जागर सुसंस्काराचा: मी साने गुरुजी बोलतोय कार्यक्रमात विद्यार्थी भारावले – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालना तर्फे आयोजित बालदिन ते साने गुरुजी जयंतीदिन ‘जागर सुसंस्काराचा‘ या कार्यक्रमात सोमवारी कवी उमेश घेवरीकर यांचा ‘ मी साने गुरुजी बोलतोय ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात खरा तो एकचि धर्म, ‘बलसागर भारत होवो, ‘हसा मुलांनो हसा’ अशा विविध प्रार्थनेसह वर्तमानकाळात साने गुरुजींच्या विचारधारेची अपरिहार्यता अधोरेखित झाल्याने विद्यार्थी भारावले.
शहरातील योगेश्वरी कॉलनीतील स्व.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मनिषा देव होत्या. अभिवाचन कार्यक्रमात कवी उमेश घेवरीकर यांनी साने गुरुजींच्या विचारधारेवर आधारित अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे केले. पंढरपूर येथील मंदिर प्रवेश असो,की शेतकरी आंदोलन यासह कारागृहातील प्रसंगाचे वर्णन करणारे कथानकाने विद्यार्थ्याना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप इंगोले यांनी केले. शिक्षिका संपदा काटे यांनी आभार मानले. बालदिनी आयोजित कार्यक्रमात दुपारी १. ३० वाजता भाग्यनगर परिसरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ईश्वर वाघ हे होते. कार्यक्रमास साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुहास सदाव्रते, रामदास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात कवी घेवरीकर यांनी अभिवाचन कार्यक्रमातून आजच्या जमान्यात सत्य आणि संवेदनशीलता जोपासत मार्ग निवडला तर यशाचा महामार्ग सापडतो,असा सल्लाही उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. एक तासाच्या कार्यक्रमात कवी घेवरीकर यांनी मुलांसमोर साने गुरुजींच्या मूल्यसंस्कार विचाराचा जीवनपट मांडला होता. संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्याची मोठी उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares